५ सप्टेंबर हा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.
अनेक वर्षं हा दिवस शिक्षक दिवस म्हणून देशभर | साजरा होतो. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनात देशभरातल्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचे गौरव होतात. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते. रविवारी झालेल्या कार्यक्रमात ज्या अनेक शिक्षकांचे गौरव राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले, त्यातले एक | अगदी ठळक उठून दिसणारे नाव होते, अन्वर हुसेन यांचे! हुसेन मूळचे बंगालमधले. पश्चिम बंगालमधल्या ज्या १२ शिक्षकांना काल राष्ट्रपती भवनात गौरविण्यात आलं, त्यातले ते एक. बरद्वान जिल्ह्यातला ऑरग्राम छतुसपल्ली बाय मदरसा हे त्यांच्या शाळेचं नाव. तीन दशके, म्हणजे नेमके बोलायचे तर १९७७ सालापासून, ते हा मदरसा चालवताहेत. मदरशाची सुरूवात झाली अवघ्या ३४ विद्यार्थ्यांनिशी. आज ही संख्या वाढतवाढत हजाराच्यावर गेली आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की त्यातले सुमारे ६४ टक्के विद्यार्थी हे जन्माने हिंदू आहेत. अलीकडच्या काळामध्ये मदरशांभोवती एक संशयाचे, गूढतेचे वर्तुळ उभे राहिले होते. या मदरशामधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा संबंध शालेय पाठ्यपुस्तकी शिक्षणाशी लावण्याऐवजी तो दहशतवादी प्रशिक्षणाशीच अधिक लावला जात होता. पण अन्वर हुसेन यांनी मदरशाच्या कामकाजात अधिकाधिक लक्ष घालायला सुरूवात केल्यापासून ही संशयाची, गूढतेची वर्तुळे हळूहळू दूर व्हायला लागली आहेत. हुसेन यांनी शिक्षणाची गंगा त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली, ज्यांना त्यांच्या कौटुंबिक आर्थिक स्थितीमुळे शिक्षण घेणे शक्यच नव्हते. अन्वर हुसेन यांनी पायी जाऊन साद गावोगाव घातली. मुलांना हात धरून शाळेपर्यंत आणले, त्यांच्या पालकांशी संपर्क साधला, त्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले, त्यांच्याकरता शिक्षणाची सारी साधने विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली, आणि प्रयत्न फळाला आले. पालक तयार झाले. स्वाभाविकपणेच मदरशातील विद्यार्थी नोंद गुणोत्तराच्या पटीत वाढत गेली. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाला पश्चिम बंगाल सरकारनेही तेवढीच मोलाची साथ दिली. त्यांच्या या प्रयोगाची कहाणी बंगालबाहेरच्या जगाला सर्वप्रथम कळली ती एक्स्प्रेस वृत्तसमूहामुळे. गेल्या जानेवारीतच एक्स्प्रेसने या मदरशाचे वृत्त दिले आणि साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. हुसेन यांचा मदरसा तेव्हा माध्यमिक शालेय शिक्षणाच्या स्तरापुरातच मर्यादित होता. आता त्यात भर पडली आहे उच्च माध्यमिक शिक्षणाच्या तुकड्यांची. तेव्हाच्या ८८३ च्या संख्येत हिंदू विद्यार्थी होते ५५५, आणि आता हजाराचा आकडा ओलांडून १०७८ वर पोचलेल्या विद्यार्थी संख्येत हिंदू विद्यार्थी झाले आहेत जवळपास सातशे. या विद्यार्थ्यांसाठी आता अकरावी-बारावीचे विज्ञान आणि कला शाखेचे पर्याय खुले झाले आहेत. हुसेन एवढ्यावर थांबलेले नाहीत. मदरशात शिकणाऱ्या मुलांनी केवळ उर्दूच शिकावे असा पोथीनिष्ठ विचार त्यांचा नाही, त्यांनी इंग्रजीची दारेही मुलांना खुली केली आहेत आणि संगणक प्रशिक्षणाच्या खिडक्याही मुलांसाठी उघड्या केल्या आहेत. पश्चिम बंगाल सरकारनं याची दखल घेत त्यांचे नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी सुचवले आणि ते राष्ट्रपती सचिवालयाने स्वीकारले हाच हुसेन यांच्या कार्याचा मोठा गौरव आहे.
Leave a Reply