सप्रे म नमस्कार मंडळी !
१९४७ साली फाळणी झाली आणि एकसंध असलेल्या हिंदुस्तानाची शकलं झाली.त्यामुळे कित्येक लोक कायमचे पाकिस्तानात गेले व आपलं भाग्य थोर म्हणून सध्या पाकिस्तानात असलेल्या ठिकाणी जन्म घेऊन पण कित्येक कलाकार भारतात येऊन स्थाईक झाले.अशाच एका कलाकाराची ही हकीगत…..
सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबमधील सरगोधा येथे एका पंजाबी कुटुंबात ३० नोव्हेंबर १९३० रोजी एका मुलीचा जन्म झाला.तिचं नांव हरिकीर्तन कौर !
खरं तर फाळणीआधीच कुटुंबाबरोबर ती मुंबईला आली.वयाच्या १२ व्या वर्षी तिनं रूप के.शोरी या मोठ्या निर्मात्याच्या चमार या शाॅर्ट फिल्ममधे कोरसगर्ल म्हणून काम केलं. ही हरिकीर्तन कौर म्हणजेच गीता बाली
यानंतर १९४६ मधे बदनामी मधे बलराज सहानी सोबत प्रमुख भूमिका केली.
पण ती खरी अभिनेत्री म्हणून उजेडात आली ती केदार शर्मा याच्या १९४८ च्या सुहाग रात मुळे !
ठेंगणीठुसकी , गोबर्या गालांची गीता म्हणजे एक नाच व अभिनयाने भरलेलं छोटा पॅकेट होतं !
मग ती राज कपूरबरोबर बांवरे नैन मुळे प्रचंड गाजली ! त्यातील इब क्या होगा? गाण्यातील व एकूणंच तिच्या गोबर्या गालाच्या निष्पाप रुपामधील गावंढळ रांगडेपणाच्या अभिनयासमोर राज अगदीच चम्या वाटतो की राव ! टपोरे पाणीदार डोळे , शार्प फीचर्स या गुणांवर तिने अशोककुमार सारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत सहजपणे नईं राहें केला. पण ती आजही मला आठवते ती देव आनंदबरोबरच्या बाजी मधल्या क्लब साँगमुळे — त्यातील तिची नेभळट देवला आव्हान करणार्या अपनेपे भरोसा है तो ये दाँव लगा ले , लगा ले दाँव लगा ले ! या गाण्यातली अॅक्टिंग आणि बाॅडी लँगवेज! इतकी समरस होत क्लब डान्सर साकारणार्या गीतानं पुढे फक्त रु. ३५,०००/— या मानधनावर भगवानदादासोबत अलबेला गाजवला ! नाच , अभिनंय यात ती भगवानला पुरून उरली — खरं तर उजवीच ठरली ! भगवान—गीता पडद्यावर आणि सी.रामचंद्र चं जादुई संगीत ! अहाहा , गीतासाठी हा अलबेला खूपंच लाभदाई ठरला — प्रसिद्धीच्या दृष्टीने ! भगवानचा सिनेमा म्हणून रु. ३५,०००/— मधे गीता बाली आपलं मोठेपण कुठेही दादांवर न लादता बिनबोभाट दादांच्या सांगण्याप्रमाणे काम करत होती. यातलं बलमा बडा नादान हे गाणं नायकावरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी नायिका म्हणते असा प्रसंग व अण्णा , हे गाणं मुजरा टाईप असं गोड चालीत तुम्हि बांधलेलं.मुजरा या प्रसंगाला योग्य वाटणार नाहि अशी गीता बालीची भीति! दादा म्हणाले , ते माझ्यावर सोपवा! अण्णांचा हा मुजरा मी असा काहि पिक्चराईझ करीन की नायिकेचं प्रेम व्यक्त होईलंच पण पब्लिकला मुजरा गाणं ऐकण्याचा आनंद मिळेल ! सिनेमा रिलीझ झाल्यावर रात्रीच्या खेळाला गीता बाली आली व तेंव्हा दुपारच्या खेळाप्रमाणेच पब्लिकने गाण्यावर पैसे फेकून दाद दिली ! हे बघून गीता बाली खूश होऊन दादांना म्हणाली, माझं चुकलं! आपल्या पुढच्या चित्रपटात पण माझ्यावर असं गाणं तुम्हि टाकलंच पाहिजे! ( अण्णा , हा दादांपेक्षाही मोठा गीतकार राजेंद्र कृष्ण व संगीतकार सी.रामचंद्र — म्हणजेच तुमचा विजय होता ! )
दुसरं गाणं शोला जो भडके जे चित्रपट संपता संपता येतं. नायक—नायिकेचे मिलन झाल्यावर येणारं हे गाणं बघायला लोक थांबतील का?— याविषयी अण्णा , तुम्हि साशंक होतात ! पण दादांना पब्लिकची नस , स्वत:चं दिग्दर्शन व तुमचं संगीत यावर जबरदस्त आत्मविश्वास होता! चित्रपट संपल्यावर पब्लिक या गाण्यासाठी थांबून या गाण्यावर पण दौलतजादा ( पैसे फेकणे ) करुन बाहेर पडू लागलं !
जाल मधील ठग देवसोबत अवखळ प्रणयी नायिका गीताच रंगवू जाणे ! नंतर जलजला , कश्ती , फरार , पाकेटमार , मिलाप तिने देवसोबत केले.
अमिया चक्रवर्तीच्या गर्ल्स’ स्कूल मधे खोडकर , धटिंगण , बालीश व मग प्रगल्भ अशा सगळ्या छटा अभिनयातून समर्थपणे पेलणार्या गीताच्या नावावर थिएटर हाऊस फुल्ल होऊ लागलं !
गुरुदत्त हे तिला लाभलेलं आणखी एक कोंदण ! बाज मधला मानसिक संघर्ष अप्रतीम साकारणार्या गीता पुढे गुरुदत्त दिग्दर्शीत सैलाब मधे पण आदिवासी तरूणीच्या रूपात अक्षरश: भूमिकेचं सोनं केलं !
अजी बस शुक्रिया यात कृत्रीम आभासी फसव्या दुनियेत वावरणार्या नायिकेची प्रत्यक्ष जीवनात वावरताना होणारी घालमेल तिनं नैसर्गीक रित्या साकारली — कारण ती तिची आपबीती च होती ना महाराजा !
दुर्दैवाने समकालीन मधुबाला , बीना राॅय , नर्गीस यांच्यासारखे मोठ्ठ्या बॅनर्सचे सिनेमि तिच्या वाट्याला आले नाहीत. पण अशा मोठ्या नांवं असलेल्यांसोबत दुय्यम भूमिकेतही आपली अभिनयाची छाप सोडून गेलु ही कुडी पंजाबन्! : उदा. जानू — कामिनी कौशल सोबत , दुलारी — मधुबाला सोबत , बडी बहेन — सुरैय्या सोबत
केदार शर्माच्या रंगीन रातें सिनेमाच्या रानीखेतच्या शूटिंगच्या वेळी या लोभस् ठेंगणीवर सिनेमाचा नायक शम्मी कपूर भाळला. दोघे मुंबईला आले व वाळकेश्वरच्या बाणगंगा मंदिरात रात्री लग्न करायला पोचले.पुजार्याने पहाटे यायला सांगितल्याने रात्रभर जागून दोघे पहाटे त्याच मंदिरात लग्न करून आले ! ( १९५५ ). मिकी व काजल ही त्यांची अपत्ये.
गीता बाली ही केदार शर्माची अत्यंत लाडकी नायिका — तिच्या अभिनयाव्यतिरिक्त याचं आणखीन एक विशेष कारण होतं तिचा चेहेरा आणि बेचारा भगवान चित्रपटनिर्मितीच्या वेळी त्याला कायमचं सोडून गेलेली त्याची पत्नी कमला चटर्जी हिचा चेहेरा यातलं विलक्षण साम्य ! ( जाता जाता : हाच चित्रपट पुढे नांव बदलून नीलकमल या नावाने केदार शर्माने राज कपूर बरोबर मुमताज जहान देहलवी ऊर्फ मधुबाला ला घेऊन पूर्ण केला — नायिका म्हणून केवळ १४ व्या आलेला मधुबालाचा पहिला चित्रपट ! )
गीताने जिंदगी , फरार , बारादरी ( नायक : अजीत ) , जेलर ( सोहराब मोदीं सोबत आंधळ्या मुलीचं अद्वितीय काम ! ) अशी खूप सरस कामं असलेले सिनेमे पण केले.
तिने प्रसिद्ध लेखक राजिंदरसिंग बेदी यांच्या एक चादर मैलीसी या कादंबरीवर राणो या चित्रपटाच्या निर्मितीचं काम सुरु केलं.यात ती झोकून देऊन अभिनय करत होती.पण याच दरम्यान तिला देवी आल्या आणि ती २१ जानेवारी १९६५ ला हे जग सोडून गेली! राणो ची देवी देवी मुळे जावी यासारखं दुर्दैव या उदय गंगाधर सप्रे म सारख्या असंख्य चाहत्यांच्या भाळी लिहून गेली !
गीता , तू आणि मधुबाला या माझ्या निस्सिम आवडत्या अभिनेत्री वयाच्या ३६ व्या वर्षी हे जग सोडून गेल्यात आणि तेंव्हापासून माझा या सिनेदेवतेशी ३६ चा आकडा आहे !
अपनेपे भरौसा है तो ये दाँव लगा ले , लगा ले दाँव लगा ले! असं आवाहन करणारी तू अर्ध्या डावावरून उठून निघून गेलीस ! आजही ते गाणं लागलं की हातातलं वाद्यं सावरत देहबोलीने व पाणीदार टपोर्या डोळ्यांनी खुणावणारी ती भाबडी निष्पाप हरिकीर्तन आठवते आणि डोळे भरून येतात गं गीता ….. जीव गलबलतो …..
तुझा निस्सिम अन् घायाळ चाहता ,
© उदय गंगाधर सप्रे म — ठाणे
E-mail : sudayan2003@yahoo.com
सेल फोन : +९१९००४४१७२०५ (संध्या. ५.३० ते ६.३० या वेळेतच कृपया संपर्क करावा ही विनंती ! )
Leave a Reply