अनेक वर्ष दुःखात, दारिद्र्यात, अज्ञानात असलेल्या समाजाला त्या त्यावेळी त्या त्या व्यक्तींनी प्रेरणाची पायवाट निर्माण केल्यामुळेच समाज त्यातून बाहेर येऊ शकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्यामुळे आज खितपत पडलेला समाज यशाची मजल गाठू शकलां.
पाजपांढरी या ४ हजार लोकवस्तीच्या गावात दोनशेहून अधिक अपंग रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात आहेत. त्या गावात अपंगांची संख्या एवढी का? तर गरोदरपणातील स्त्रियांच्या प्रकृतीची हेळसांड ! अनिल रामचंद्र रघुवीर या अपंग कार्यकर्त्याने त्याच्या प्रयत्नाने गावाच्या या व्यथेवर मात केली. त्याने हताश अपंग दुर्बलांना संघटित करून त्यांचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडले. त्यांना ही प्रेरणा संतोष शिर्के नावाच्या दापोलीच्या सामाजिक कार्यकर्त्याकडून मिळाली.
पाजपंढरी हे समुद्राच्या काठावर वसलेले गाव. गाव समुद्राला अगदी खेटून असल्यामुळें साऱ्यांचाच प्रमुख व्यवसाय मच्छिमारी. शेती, पशुपालन अजिबात नाही. अडीच किलोमीटर अंतरावर हर्णे हा, मोठी वस्ती असलेला गाव. पूर्वी तेथे बंदर होते. पाजपंढरीतील मच्छिमार तेथे जाऊन मच्छीचा लिलाव व विक्री करतात.पाजपंढरी गावात कोळी बांधवांची छोटीमोठी नऊशे घरे आहेत. मच्छिमारी व्यवसायात गुंतलेल्या त्या माणसांना संसाराकडे लक्ष देण्यास वेळच नसतो, हे गरोदर पणीचे विकार दुर्लक्षित राहण्याचे कारण होते. समुद्रकाठच्या आजुबाजूच्या मच्छिमार गावांतदेखील हे दुखणे असेच आढळून येते, मात्र कमी प्रमाणात. गरोदर स्त्रियांच्या बाबतीत गावात कोणतेच मार्गदर्शन मिळत नसे. पोलिओ डोस माहीत नव्हता- इतर आरोग्यविषयक सेवासुविधांची कमतरताच होती. त्यामुळे गर्भवती स्त्रीने काय खावे, काय काळजी घ्यावी, तिची दिनचर्या कशी असावी याविषयी माहिती फार कोणाला नव्हती. जन्मलेल्या बालकांच्या बाबतीत अधिकच दुर्लक्ष होत असे. अशा सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून बाळे अपंग जन्माला येत. जवळपास प्रत्येक घरात एक तरी सरपटणारे अपंग बालक असे. ती संख्या दोनशेपर्यंत जाऊन पोचली. त्या बेताला शिर्के गावात आले. त्यांचे बोलणे ऐकून अनिल रघुवीर अस्वस्थ झले. कार्यकर्त्यांना मदतीला घेऊन त्यांनी योजना आखली. स्वतः अनिल रघुवीर व कार्यकर्ते त्यांनी ‘विकलांग पुनर्वसन स्वयंरोजगार सर्व सेवा उद्योग सहकारी संस्था, पाजपंढरी’ या नावाची संस्था स्थापन केली. ती गोष्ट 2009 सालची. संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षांत जवळपास प्रत्येक अपंगाला रोजगार मिळाला आहे. प्रत्येकाला दिव्यांग पेन्शन योजनेतून दरमहा दीड हजार रुपये मिळतातच. ज्या दिव्यांगांना दुसऱ्याच्या मदतीशिवाय घराबाहेर पडता येत नव्हते त्यांना स्वयंचलित गाड्या, सायकली उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ते त्यांच्या उपजीविकेसाठी घराबाहेर जाऊ शकतात. स्त्री दिव्यांगांची संख्याही पुरुषांच्या बरोबरीने आहे. महिला सुक्या मच्छीवरील कामे तसेच शिवणकाम, घरघंटी यांसारखे उद्योग करतात. सर्व दिव्यांगांचे सर्व उद्योग-व्यवसाय गावात किंवा तीनचार किलोमीटर परिसरात चालतात. संस्थेचा प्रयास स्थानिक मासळीवर किंवा कच्च्या मालावर आधारित उद्योग करता येतील असा आहे. एकच एक असा कोणताही रोजगार संस्थेतर्फे चालवला जात नाही. प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभे राहवे यासाठी संस्थेकडून मदत केली जाते. संस्थेचे नित्य नैमित्तिक काही कार्यक्रम असतात. त्यासाठी अपंगांना आवाहन करण्यात येते.पॅरालिसीसचा झटका आल्याने किंवा अपघात होऊन जे अपंग झाले आहेत, त्यांना अपंग प्रमाणपत्र मिळवून देणे, विविध योजनांचा फायदा करून देणे अशी कामेही संस्थेमार्फत केली जातात. गावाचे नाव पाजपंढरी असले तरी परिसरातील इतर गावे पाज या नावानेच त्याला ओळखतात. गावातील रहिवाशांना महादेव कोळी अशी ओळख मिळावी म्हणून गावकऱ्यांचा शासनाशी संघर्ष चालू आहे.गाव हे समुद्र आणि डोंगर यांच्यामधील चिंचोळ्या पट्टयात वसले असल्यामुळे तेथे फारशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे तेथील घरे ही अगदी खेटून-खेटून अशी चिकटून आहेत. तेथे विक्रेते हे डोक्यावर माल घेऊन दिवसभर फिरताना दिसतात. साड्या, चादरी, भांडी, खाऊ अशा गोष्टींची तेथे चांगलीच विक्री होते. तेथे कुरकुरीत-चटपटीत खाण्याचे पदार्थ हवे तेवढे खपतात असा विक्रेत्यांचा अनुभव आहे.
मात्र त्यांच्या दर्ज्याबाबत न बोललेलेच बरे ! असा स्थानिकांचा अनुभव. विक्रेते हे स्थानिक नव्हे तर बहुतेक परप्रांतीय अधिक आहेत. दरवर्षी सर्व अपंगांचा मेळावा भरतो. संतोष शिर्के यांनी तेथील अपंगांना घेऊन कोल्हापूरच्या अपंग पुनर्वसन संस्थेची भेट घडवून आणली होती. पेन्शन रिन्यू करणे, हयातीचे दाखले भरणे इत्यादी कामे मेळाव्यात होऊन जातात.अनिल रघुवीर स्वतः अपंग असले तरी त्यांची पत्नी अपंग नाही. त्या गावच्याच रहिवासी आहेत. अनिल यांना विचारले, त्यांनी तुमच्याशी लग्न कसे केले? अनिल म्हणाले, त्यांच्या घरच्या गरिबीमुळे. परंतु आमचा संसार सुखाचा आहे. अनिल यांचा वडापाव विक्रीचा उद्योग आहे. त्यांना तीन मुले आहेत. तिघेही अव्यंग आहेत. अनिल यांचे शाळेत जाऊन शिक्षण घेणे झालेले नाही. ते मुंबईतील हाजीअली येथे एका रुग्णालयात पाच वर्षे उपचार घेत होते. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवले. अनिल चांगले लिहू शकतात, शुद्ध बोलतात, आर्थिक व्यवहार सांभाळतात. त्यांना हार्मोनियम वाजवण्याची हौस आहे. ते भजनकीर्तनदेखील करतात.पाजपंढरी गावात काही मोठे मच्छिमार व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे ट्रेलर, ट्रक, यांत्रिक बोटी आहेत. गावातील मुलांचे शिक्षण गावातील शाळांमधून होते. गावातील जिल्हा परिषदेची शाळा ही जिल्ह्यातील विद्यार्थी संख्येने मोठी असल्याचा अभिमान गावकरी बाळगतात. दहावीनंतरच्या शिक्षणासाठी मात्र त्यांना तालुक्याला, दापोली येथे जावे लागते. समुद्रकाठच्या गावांतील हा प्रश्न लक्षात आला तो संतोष शिर्के यांच्यामुळे. ते व्यवसायाने शेतकरी आणि दापोलीचे सामाजिक-राजकीय कार्यकर्ते त्यांनी प्रथम या विचित्र घटनेची 2005 च्या सुमारास नोंद केली. त्यांनी या अपंग मंडळींच्या मनात विश्वास निर्माण केला. ते म्हणाले, की पोलियो व जन्मव्याधी (दोन्ही पाय अधू) यामुळे ‘सरपटणारे प्राणी’ अशीच त्यांची अवस्था होती. ते पुढे म्हणाले, की हर्णे, पाज, आडे या समुद्रकाठच्या गावांत मच्छिमार समाजात सर्वत्र हे दुखणे होते. पण पाजपांढरीला अतिरेक होता. जवळ जवळ तीनशेनव्वद अपंग व्यक्ती होत्या. त्यामुळे प्रत्येक घरात दोन जीवनशैली जाणवत – एक काम करणाऱ्या मंडळींची व दुसरी या परावलंबी-दुबळ्या जीवांची.शिर्के यांची कर्तबगारी अशी, की त्यांनी काही अपंग व्यक्तींना बसमध्ये घालून कोल्हापूरला नसीमा हरझुक यांच्याकडे नेले. त्यांना तेथील अपंग व्यक्तींचे कर्तृत्व दाखवले – स्वत: उद्योगव्यवसाय करणे कसे शक्य आहे ते पटवून दिले. ही गोष्ट 2009 सालची. शिर्के यांचा पाजपंढरी गावाशी आता फारसा संबंध राहिलेला नाही.शिर्के यांची निरीक्षणे परखड आहेत. ते म्हणाले, की त्या वेळच्या प्रयत्नांतून संस्थेची स्थापना झाली. सरकारमध्ये नोंदी झाल्या. प्रत्येक व्यक्तीला दरमहा चारपाच हजार रुपये मिळू लागले. काही लोक निरपेक्षपणे काम करत राहतात दुसऱ्यांसाठी पण नकळत एक पायवाट निर्माण होते समाजासाठी.
डॉ अनिल कुलकर्णी
संदर्भ; थिंक महाराष्ट्र मधील विनायक बाळ यांचा लेख
Leave a Reply