‘पॉप्युलर’ प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ यांनी स्वतःच्या प्रकाशन व्यवसायाव्यतिरिक्त ज्या इतर क्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली, त्याचा प्रांजळ आलेख त्यांनी ‘रिंगणाबाहेर’ या पुस्तकात तपशिलांसह मांडला आहे. ‘मौज प्रकाशन गृहा’ ने तो सहजसुंदर रूपात बंदिस्त करून प्रकाशित केला आहे.
रामदास भटकळ हे एक चळवळ व्यक्तिमत्त्व! वारसाहक्काने मिळालेली शास्त्रीय संगीताची उपजत जाण व प्रेम, ते शिकण्याची असोशी, शालेय वयापासूनच ‘आनंदाश्रम’ या रहिवासी वाडीत होणाऱ्या नाटकातून काम करण्याची मिळालेली संधी आणि आजूबाजूच्या राजकारणाकडे पाहण्याची उत्सुक दृष्टी, यातूनच त्यांना राजकारण, नाटक आणि शास्त्रीय संगीत या क्षेत्रात जमेल तेवढा शिरकाव करण्याची उमेद निर्माण झाली. परिस्थितीच्या रेट्याने प्रकाशन – व्यवसाय उपजीविकेसाठी निवडावा लागल्यामुळे, या इतर क्षेत्रांत खोलवर मुसंडी न मारता त्यांनी ‘रिंगणाबाहेरून’च काम करायचे ठरवले.
असे असले तरी, त्यांनी या तीन्ही क्षेत्रात, विशेषतः संगीत क्षेत्रात मारलेली मजल लक्षणीयच म्हणावी लागेल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू सर्वसामान्य वाचकांसाटी अपरिचितच राहिले होते.
या पुस्तकातून ते उजेडात आल्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व वाढले आहे.
पुस्तकातल्या चार प्रकरणांपैकी ‘राजकारण’ या भागात भटकळांनी विलक्षण घडामोडींनी भरलेला असा ‘इंदिरा गांधींचा काळ’ केंद्रस्थानी ठेवत त्याचे मूल्यमापन सोप्या शब्दात केले आहे. हुकुमशाही वजा राजकारण, भ्रष्टाचाराची सुरुवात, घराणेशाहीचा सुप्त उदय, या बाबींमुळे भटकळांना आणीबाणीच्या काळात इंदिराविरोधी घटकांना मदत करावीशी वाटली आणि ती त्यांनी केलीही.
‘नाटका’ च्या क्षेत्रात अभिनयापेक्षा प्रेक्षक, प्रकाशक आणि समीक्षक या ‘रिंगणाबाहेर’च्या भूमिका त्यांनी मन लावून, जास्त चांगल्या प्रकारे वठवलेल्या दिसतात. ‘संगीत’ क्षेत्रात मात्र त्यांनी, सलगपणे नसली तरी, टप्प्याटप्प्याने, पण अधिक भरदार कामगिरी केलेली दिसते. तरीसुद्धा संगीताची तालीम, रियाज आणि मैफील यात पडलेल्या कालान्तरामुळे, गुणवत्ता असूनही ते तसे ‘रिंगणाबाहेर’च राहिले, मुख्य प्रवाहात येऊ शकले नाहीत. व्यवसायात न अडकता त्यांना पूर्ण मोकळीक मिळाली असती किंवा त्यांनी या क्षेत्रात झटून, सलगपणे मेहनत केली असती, तर त्यांना मोठे नाव आणि यश मिळाले असते, असे वाटून जाते.
त्यानंतरच्या चौथ्या भागात भटकळांनी या तीन्ही क्षेत्रातले ‘न्यून ते पुरते’ करून घेतले आहे. मात्र या चारही प्रकरणातून, त्यांना या तीन्ही क्षेत्रातल्या ज्या दिग्गजांचा निकट सहवास लाभला, त्यांच्याकडून शिकता आले. त्यांची यादी वाचली तरी वाचकांना भटकळांविषयी -हेवा वाटावा, अशीच ती नावे आहेत! ‘राजकारणा’ तले एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु प्रमिला दंडवते, ही मंडळी, ‘नाट्य’ क्षेत्रातले दामू केंकरे, मामा पेंडसे, विजया खांबेटे (नंतर खोटे आणि पुढं मेहता), केशवराव दाते, चिंतामणराव कोल्हटकर वगैरे, ‘संगीत’ क्षेत्रातले चिदानंद नगरकर, दिनकर कायकिणी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, भट, गिंडे अशा, त्या त्या क्षेत्रातल्या श्रेष्ठ व्यक्तींशी भटकळांचा कधी मदतनीस म्हणून, कधी श्रोता, तर कधी प्रेक्षक वा प्रकाशक म्हणूनही घनिष्ट संबंध आला. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र बनले.
असे असले तरी भटकळांना स्वतःतल्या उणिवांची असलेली जाणीव त्यांच्या या लेखनात वारंवार दिसते. पुस्तकाच्या सुरवातीच्या ‘निवेदना’त ते या लेखनामागचा स्वतःचा उद्देश स्पष्ट करताना म्हणतात, ‘सांगण्यासारखं होतं; ते मी काही केल्याचं नव्हे, तर पाहिल्याचं, अनुभवल्याचं; ज्यात वाचकांनाही काही रस वाटेल.’
बाळ ठाकूरांनी केलेले मुखपृष्ठ, ठसठशीत व आशयगर्भ रूपामुळे वाचकाच्या मनाचा ताबा घेते आणि विचारही करायला लावते. चित्रात डाव्या हाताच्या मुठीची ‘तर्जनी’ वगळता इतर बोटे सैलपणे, पण सलगपणे मिटलेली आहेत. त्यांपैकी ‘अंगठा’ हे प्रकाशन-व्यवसायाचे, तर तीन बोटे ही ‘राजकारण, संगीत व ‘नाटक’ या तीन क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात.
रोखलेली तर्जनी भटकळांच्या व्यक्तिमत्त्वातला भित्रेपणा, विस्कळीतपणाचा निर्देश करणारी वाटते. (अर्थात बाळ ठाकूरांना मुखपृष्ठ करताना हाच अर्थ अभिप्रेत असेल असे नाही.) एकंदरीत, भटकळांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अज्ञात पैलूंचे दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे.
संकलन : शेखर आगासकर
वैशाली गोखले, कोल्हापूर
अमृत मे 2014
Leave a Reply