नवीन लेखन...

अप-शकुनी गोमु (गोमुच्या गोष्टी – क्रमांक १६)

कथेचा मथळा वाचून तुम्हांला नक्कीच माझा राग आला असेल. पण लक्षांत घ्या की मी ह्या गोष्टींमध्ये गोमुच्या बाबतींत घडलेल्या खऱ्या गोष्टींची नोंद करतोय.

प्रकाश कलबाडकर हा पत्रकार म्हणून लिहितांना एखाद्या चार आण्याच्या बातमीला बारा आण्याचा मसाला लावतांना दिसेल. कधीतरी संपादकांना खूष ठेवण्यासाठी न घडलेली बातमीही देईल.

(दुसऱ्या दिवशी एका ओळींत ते वृत्त चुकीचं होतं असा खुलासा कुठल्यातरी कोपऱ्यांत छापता येतो.)

परंतु गोमुच्या बाबतीत लिहितांना मी कधीही असा अन्याय करणार नाही याची वाचकांनी खात्री बाळगावी.

सुरूवातीपासून गोष्ट जशी घडली तशीच मी तुम्हांला सांगणार आहे. मग तुम्हांला वाटलं की गोष्टीला हें नांव बरोबर नाही तर नवं नाव जरूर सुचवा.


माझ्या राहत्या खोलीचे मालक खंडागळे म्हणजे जुन्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवणारे.
म्हणजे मांजर आडवे गेले की काम होत नाही, हे ठामपणे मानणारे.
अनेकवेळा मांजराशी खो खो खेळतांना मी त्यांना पाहिलंय.
मांजर आडवे गेले म्हणून बारा पावले मागे जातांना दुसरे मांजर परत आडवे गेले, तेव्हां पुन्हां मोजून बारा पावले मागे जातांना ते दिसतात.
मांजर आडवे जाऊ नये म्हणून आपल्या भाडेकरूंना, आजूबाजूच्या लोकांना, मांजर पाळू देत नाहीत.
बरं मांजराला मारताही येत नाही.
कारण म्हणे मांजर आपल्या हातून मेलं तर पापापासून वाचायला काशीला जाऊन सोन्याचं मांजर दान करावं लागतं.
मांजराच्या हालचालींवर ताबा ठेवणं कठीणच पण कांही कांही शारिरीक हालचाली पण आपल्या हातात नसतात.
नाकाला खाजं येणं, जांभई देणं, उचकी लागण, ठसका लागणं, डोळ्यांच्या पापण्या फडफडणं इ. अनेक क्रिया आपोआप घडतात.
आपल्या पूर्वजांनी ह्यांतल्या प्रत्येकाचा कशाशी तरी संबंध जोडलाय.
आमचे मालक ह्या सर्व गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवतात.
त्यांच्या डाव्या डोळ्याची पापणी फडफडली की आज कोणती अशुभवार्ता येणार म्हणून चिंताक्रांत होतात.
त्या दिवशी पेपरांत एखादी अशुभ वार्ता वाचली तरी तिचा संबंध आपल्या डाव्या पापणीशी जोडतात.
“तीन तिघाड, काम बिघाड” म्हणून तिघांनी कामाला बाहेर पडू नये, हे ते अटीतटीने पाळतात.
‘इजा, बीजा, तिजा’ म्हणजे दोन वाईट बातम्या आल्या तर तिसरी वाईट बातमी येणारच म्हणून ते वाट पहात बसतात.


खंडागळे मला एकदा म्हणाले, “हा गोमु सकाळीसकाळी तुमच्याकडे कशाला येतो ?”
मी म्हटलं, “मालक तुम्हाला माहित आहे, तो माझा खास दोस्त आहे. मला भेटायला येतो. कधीकधी सकाळीच येतो.”
मालक म्हणाले, “तुमची दोस्ती असूद्या हो. पण त्याला सांगा सकाळी, सकाळी येऊ नको.”
मी विचारलं, “कां ? सकाळी कां नको.”
“प्रकाशभाऊ, रागावू नका. पण तो अपशकुनी आहे. त्याचं सकाळी सकाळी तोंड पाहिलं तर काम बिघडतं.”
मला अर्थातच त्यांच्या बोलण्याचा राग आला.
मी म्हणालो, “मालक माझ्या मित्राबद्दल असं बोलू नका. मी तुमची जागा सोडून जाईन पण हे ऐकून घेणार नाही.”
तरी मालकांनी परत पालुपद लावलंच,
“रागावू नका हो. पण मी अनुभव घेतलाय म्हणून तुम्हांला सांगतोय.”
मी विचारलं, “काय अनुभव घेतलायतं ? सांगा मला.”
“प्रकाशभाऊ, मागे एकदां मी त्याचं सकाळी तोंड पाहिलं आणि मला लाॅटरी लागायची ती एका नंबराने गेली. म्हणजे असं वाटणारच ना !
पण मनांत आले तरी मी तुम्हांला बोललो नाही.
मागच्या आठवड्यांत शनिवारी सकाळीच तो तुमच्याकडे आला आणि मी त्याचं तोंड सकाळीच पाहिलं.
काय सांगू तुम्हांला ? मला दिवसभर चैन नव्हती.”
“पण कांही झालं नाही ना ? मग?”
मी जाब विचारल्याच्या भाषेंत बोललो.
“नाही कसं झालं. रात्री आठला गांवाहून म्हातारी गेल्याचा फोन आला.”
“कोण गेलं ? तुमची म्हातारी आई तर मागेच गेली ना !” मी त्यांना आठवण करून दिली.
“ही म्हातारी माझी कोणी नव्हे हो पण माझ्या गांवचीच ना !”
बादरायण संबंध जोडून गोमुला अपशकुनी म्हटल्याचा मला राग आला.


संध्याकाळी गोमु मला भेटला तेव्हांही मी तोच विचार करत होतो.
गोमुला सांगावं की नाही ?
गोमुला वाईटही वाटले असते आणि रागही आला असतां.
गोमुच मला म्हणाला, “पक्या, एवढा कसला विचार करतो आहेस ?”
मी सुरूवातीला त्याचे प्रश्न टाळले पण मग मला राहवले नाही.
मामलाच तसा होता.
मी त्याला विचारले, “गोमु, तुझा शकुन, अपशकुनावर कितपत विश्वास आहे ?”
गोमु म्हणाला, “पक्या, आपण दोघे लंगोटीयार. आपण दोघांनीही लहानपणापासून कधी मुहूर्त पाहून काम केलंय कां ? तू जसा ह्यावर फारसा विश्वास ठेवत नाहीस तसाच मीही नाही ठेवत. पण काय झालं म्हणून हे विचारतोयस ?”
मी परत त्याला विचारले, “समज, कोणी तूच अपशकुनी आहेस असे म्हटले तर काय करशील ?”
“थोबाड फोडीन xxचं. कोण म्हणालं असं ?”
गोमुने त्वेषाने विचारलं.
मी त्याला शांत करत म्हणालो, “असं हातघाईवर येऊन चालणार नाही.”
मग मी त्याला माझा मालकांबरोबर सकाळी झालेल्या चकमकीचा वृतांत सांगितला.


“तुझ्या मालकाला धडा तर शिकवलाच पाहिजे. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे.
तुझ्या मालकाला थोबाडून घोटाळाच होईल.
त्याला दुसऱ्या मार्गाने धडा शिकवला पाहिजे.
मालकांच्या व्यवहाराची तुला काय माहिती आहे ?”
मालक कोणते धंदे करून श्रीमंत झाला होता, हे मलाही माहित नव्हतं.
आताही काय काय करतो, तेही माहित नव्हतं.
एवढचं माहित होतं की त्याने चार पांच फ्लॅटस् घेऊन ठेवलेत व ते तो भाड्याने देतो.
गोमुने सांगितल्यावरून मी दुसऱ्या फ्लॅटमध्ये रहाणाऱ्या एकाला विचारलं.
तो म्हणाला, “मालकाचा एक फ्लॅट एका भाडेकरूने घेतला होता.
त्या जागेला तेव्हा ओ.सी. मिळालं नव्हतं.
त्यामुळे लीव्ह लायसेन्स करार करतां आला नव्हता.
पण करण्याबद्दल पत्रव्यवहार झाला होता.
पुढे तो भाडेकरू फिरला आणि त्याने लिव्ह लायसेन्स करार करायला नकार दिला.
मालकांनी कोर्टात केस केली आहे पण अजून निकाल लागलेला नाही.
तो भाडेकरू अलिकडेच जागेला कुलुप लावून गेलाय.
मालकाला जागा ताब्यांत नाही मिळालेली.”
गोमुला थोडी तरी माहिती हाती लागली.


गोमुने ह्या खटल्याची अधिक माहिती मिळवायचे ठरवले.
ज्या कोर्टात केस चालू होती तिथल्या एका शिपायाला खूष करून तो कारकूनापर्यंत पोहोचला.
त्या कारकूनाने सांगितले की त्या खटल्याची पुढली तारीख आठ दिवसांनीच आहे.
केस जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आहे.
जज्जसाहेब कडक आहेत.
ते तारीख देणार नाहीत.
गोमुने त्याला विचारून घेतले की जर वकील आले नाहीत तर काय होईल ?
तो कारकून म्हणाला, “जज्जसाहेब बहुदा त्याच्याविरूध्द निकाल देऊन टाकतील ?”
मग गोमुने मालकाच्या वकीलाचं नांवही त्याच्याकडून माहित करून घेतलं.
तो म्हणाला, “खर्डे वकील केस चालवतात त्याची.
तुम्हांला त्यांचा नंबर वगैरे सर्व मिळेल. भेटायचं असेल तर ह्या नंबरवर फोन करून जा.
केस काॅम्प्रोमाईज करायची असेल तर अजून करतां येईल.”
गोमुने खर्डे वकिलांचा नंबर लिहून घेतला.
त्याने मनाशी निश्चय केला होता की कसंही करून ह्या तारखेला खर्डे वकिलांना कोर्टांत जाऊच द्यायचं नाही.


गोमु विचार करत होता की कोणत्या कारणाने खर्डे वकिल खटल्याला गैरहजर रहातील.
“पहिलं कारण म्हणजे जर ते आजारी पडले तर जाणार नाहीत.
ते आजारी पडणे न पडणे आपल्या हातात नाही.
पण आपण त्यांना आजारी पाडू शकतो कां ?
त्यादिवशी त्यांच्या सकाळच्या चहांत जर जमालगोटा टाकलां तर बहुदा दोन तासांत इफेक्ट मिळेल आणि ते कांही त्या दिवशी जाऊ शकणार नाहीत.
किंवा समजा आपण त्यांना त्या दिवशी कुणा मोठ्या दादाकडे, भाईकडे पाठवलं, म्हणजे समजा हं, कारण असा कोणी आपल्या ओळखीचा नाही, जो त्यांना दम भरून आपल्याकडे बोलवून घेईल आणि कोर्टांत जाऊ देणार नाही.
पण एक पर्याय.
पण ह्या दोन्ही प्लॅनमध्ये एक वीक पॉइंट आहे, तो म्हणजे खर्डे वकिल दुसऱ्या एखाद्या वकिलाला फोन करून आपल्याऐवजी पाठवू शकतील.
तेव्हां हे मार्ग निरूपयोगी आहेत.”
गोमु सगळे प्लॅन्स मला सुनावत होता. मग त्याला आठवलं की वकिलसाहेब रोज रात्री दुसऱ्या बारमध्येही नित्यनियमाने जातात व कधी कधी घरी पोहोचेपर्यंत मध्यरात्र उलटून जाते.
गोमुने त्याचाच फायदा घ्यायचे ठरवले.


मालकांची केस कोर्टांत पुकारली गेली तेव्हां खर्डे वकिल अजूनही दारूच्या बारच्या आंतल्या खोलींतल्या सोफ्यावर आरामांत लेटले होते.
आदल्या दिवशी नेहमीचा वेटर सुट्टीवर होता आणि नव्या वेटरने त्यांना काय पाजले कुणास ठाऊक पण छान कीक मिळाली होती.
नेहमी पिऊन पिऊन त्यांना अलिकडे अशी किक देणारं पेय मिळत नसे.
त्यांना ते आवडलं आणि त्यांनी त्याचा आकंठ स्वाद घेतला.
शेवटी ते द्रव्य मुखांतून बाहेर येऊ लागले आणि रात्रौ तीन वाजतां खर्डे वकिल स्थळ, काळ, मीपण सोडून सोफ्यावर आडवे झाले ते पुढचे दहा-बारा तास त्यांना शुध्द येणे शक्य नव्हते.
नऊ वाजतां नव्या वेटरने त्यांना कामावर हजर झालेल्या नेहेमीच्या वेटरच्या स्वाधीन केले.
कोर्टांत जेव्हा केस पुकारली गेली तेव्हां मालक हजर होते, प्रतिवादी भाडेकरू हजर होता.मालक अस्वस्थ होते कारणआज सकाळीच पुन्हा त्यांनीमाझ्याकडे आलेल्या गोमुचे
तोंड पाहिले होते.
कोर्टात जाण्यापूर्वी मला म्हणाले, “आज तरी तुमचा मित्र सकाळी मला दिसायला नको होता.”
भाडेकरू अस्वस्थ होता.
कारण त्याचे वकिल खर्डे अजून आले नव्हते.
मालकांचे वकील बर्डे मात्र हजर होते.


केसचा पुकारा झाल्यावर कोर्टाला सांगण्यांत आले की दोघे दावेदार हजर आहेत पण प्रतिवादीचे वकील हजर नाहीत.
आपण मागच्या तारखेला स्पष्ट सांगूनही भाडेकरूचे वकिल हजर राहिले नाहीत, हे ऐकून कोर्ट संतापले.
कोर्टाने मालकांच्या वकिलांकडे चौकशी केली की त्यांची काय मागणी काय आहे ?
बर्डे वकिल म्हणाले, “माझ्या अशीलाची भाडेकरूने बेकायदेशीररीत्या बळकावलेली जागा त्यांना परत मिळावी आणि एवढे दिवस तिथे राहूनही प्रतिवादीने भाडे भरले नाही, त्या सर्वाची अशीलाला व्याजासकट भरपाई मिळावी.”
जज्जसाहेबांनी भाडेकरूला विचारले, “तुझे ह्यावर काय म्हणणे आहे ?”
भाडेकरू उत्तर देण्याऐवजी परत परत आपले वकिल न आल्याचे सांगू लागला.
जज्जसाहेब म्हणाले, “मी बजावूनही ते आले नाहीत.
माझ्यासमोर आलेल्या माहितीवरून मी वादीला प्रतिवादीने त्याच्या जागेचा ताबा तात्काळ परत द्यावा आणि काॅम्पेन्सेशन म्हणून गेल्या चार वर्षांचे भाडे आठ टक्के व्याजासकट आठ दिवसांत द्यावे.”
कोर्टात प्रेक्षकात बसलेला गोमु विचार करत होता की मालकाचे वकिल बर्डे की खर्डे ?


संध्याकाळी गोमुने ही कोर्टातली हकीकत मला सांगितली.
मला वाटले की गोमुनेच नेहमीप्रमाणे घोटाळा केला आणि मालकाऐवजी भाडेकरूच्या वकिलाचे नाव घेऊन आला.
परंतु तसे झाले नव्हते.
कोर्टाच्या कारकुनाने गोमुला माहिती देतांना चूक केली होती.
केसचा निकाल लागल्यावर गोमु त्याच्याशी बोलला होता.
तो कारकून म्हणाला, “बर्डे आणि खर्डे नांवात साम्य असल्यामुळे माझी चूक झाली पण आपण ही चौकशी कां करताय ?”
तेव्हां तो गोमुने केलेला गोंधळ नक्कीच नव्हता.
माझ्या आणखीही एक गोष्ट लक्षांत आली की मालक केस हरले असते तर गोमु अपशकुनी आहे हा आरोप खरा ठरला असता.
कारण आजही मालकाने सकाळीच गोमुला पाहिलं होतं.
तेवढ्यात मालक पेढे घेऊन आले.
“केस जिंकलो, त्याचे पेढे घ्या.”
मी त्यांना विचारले, “मालक, केस जिंकलात. भरपूर भरपाई मिळाली. मग आता तरी पटले कां ?
गोमु अपशकुनी नाही.
आज सकाळी म्हणत होता, “आज तरी तुमचा मित्र सकाळी दिसायला नको होता.”
मालक म्हणाले, “निकाल माझ्या बाजूने लागला. भरपाई बरी मिळाली. ते माझ्या हक्काचं होतं. पण माझ्या वकिलाने मोठ्ठं बिलं पाठवलंय ते ?
गोमुचे तोंड सकाळी पाहिले म्हणूनच मला ही वकीलाची फी भरणे आले ना ?
मी त्याला अपशकुनी नाहीतर काय शकुनी म्हणू ?”
गोमु आणि मी दोघांनीही कपाळावर हात मारला.
मी म्हणालो, “मग पेढे कसले वाटताय ?”
पण गोमु शांतपणे म्हणाला, “पक्या, जाऊ दे. कुत्र्याचे शेपूट वांकड ते वांकडच. मला वाटते मीच ह्या नतद्रष्ट माणसाचं तोंड ट्वेंटीफोर बाय सेवन पहाणं टाळलं पाहिजे.”
याच साठी या गोष्टीला मी अप-शकुनी नाव दिलंय.इथे ‘अप’चा अर्थइंग्रजीतील ‘अप’ सारखा घ्यायचा.जसे ‘अपवर्ड’, ‘अपलीफ्ट’ ‘अपराईट’ वगैरे. बरोबर ना?

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..