मागच्या शनिवारी साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाण्याचे ठरवले. सकाळी 10.30 वाजेच्या पॅसेंजर रेल्वेने अकोल्याहून शेगावला पोहोचलो. मंदिरात गेल्यानंतर अगदी पाच मिनिटांतच ‘श्रीं’चे दर्शन झाले. लवकर दर्शन झाल्याचा आनंद होताच. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या भेटीगाठी घेत परतीसाठी पुन्हा शेगाव रेल्वेस्टेशन गाठले. सायंकाळी 4.30 वाजेच्या पॅसेंजर गाडीसाठी अकोला, अमरावतीकडे जाणा-या प्रवाशांची गर्दी होतीच. हिवाळ्याचे दिवस असल्याने दिवसही लवकर मावळतो. त्यामुळे सर्वांना घराकडे जाण्याची घाई. रेल्वेगाडी अर्धा तास उशिराने शेगाव स्टेशनवरील प्लॉटफॉर्म क्रमांक 2 वर येऊन उभी राहिली. गाडीत चढण्यासाठी, जागा पकडण्यासाठी गर्दी झाली. काहींनी विरुद्ध दिशेच्या दरवाजातून प्रवेश केला. पाच मिनिटांतच गाडी सुरू झाली. काही प्रवासी खालीच होते. त्यांची गाडीत चढण्यासाठी धडपड सुरू होती. गाडीचा हॉर्न वाजला आणि गाडी सुरू झाली.
हळुवार वेग घेत नाही तोच एक वयोवृद्ध प्रवासी धावत्या रेल्वेत चढला. त्याच्यापाठोपाठ दुसराही प्रवासी चढत असतानाच त्याचा पाय पायरीवरून पाय घसरला. ‘खडाक्’ असा जोरदार आवाज आला. डब्यातील मुली जोरात ओरडल्या. सगळे भयभीत झाले. एकच धावपळ उडाली. ‘गाडी थांबवा’ म्हणत सगळेच ओरडले. पण चेन ओढायला कुणी तयार नव्हते. तेवढ्यात मी चेन ओढल्याने गाडी तेथेच थांबली. प्रवासी खाली उतरले. गाडीच्या चाकाखाली एक वयस्कर प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या ओळखीचेही कोणी नव्हते. गाडीतील प्रवाशांनी त्या प्रवाशास जखमी अवस्थेत बाहेर काढले. नंतर स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्याची तयारी चालवली. त्याची अवस्था गंभीर होती. त्या वृद्धाचा चेहरा माझ्या नजरेसमोरून हलत नव्हता.
— जनार्दन गव्हाळे, औरंगाबाद
लेखकाचे नाव :
जनार्दन गव्हाळे, औरंगाबाद
लेखकाचा ई-मेल :
gavhalej@gmail.com
Leave a Reply