आपल्या सीकेपींच्या पद्धती, जिन्नस सगळंच कसं खास, छान छान
त्यातून कडव्या वालांना लाभलय एक विशिष्ट प्रमुख स्थान ॥1॥
“वालाचं बिर्ढ” नेहमीच “नंबर वन”, त्याचा पहिला मान
दिमाखात वाटीत खुलतं आणि वाढवतं जेवणाची शान ॥2॥
चवीष्ट लोभसवाणं “बिर्ढ” खाणा-यांची भूकही वाढवतं
ताटातल्या इतर पदार्थांपुढे स्वत:चा सुंदर ठसा उमटवतं ॥3॥
कडवे वाल येताच इथला तिथला भाव, क्वालिटी चा सर्व्हे करत सुटायचं
काकीला/मावशीला/मामीला, “तुझ्या यादीत माझे पण 5 किलो लिहून टाक”, हक्कानी सांगायचं ॥4॥
वाळवणं, तेल लावणं, भरणं हे सगळे सोपस्कार करणं सास्वा-सुनांचं आवडीचं काम,वालाचं मनासारखं कोडकौतुक झाल्याशिवाय हातांना त्यांच्या नसतोच आराम ॥5॥
तेवढ्याच प्रेमाने भिजवून, ऊपसून, सोलून शिजवून, गृहिणीला मिळतं आगळं समाधान,खवय्ये मंडऴींबरोबर जणू काही गोंडस स्मित करतं भरलेलं पान ॥6॥
चपाती-प्रेमी मंडळी, “बिर्ढ” केलं की मात्र शेवटी पुन्हा बिर्ढ-भात घेणारच
भरपेट जेऊन, “वाह मस्त” अशी ऊत्स्फूर्त तारीफ हमखास तोंडातून काढणारच ॥7॥
रूचीपालट म्हणून अधूनमधून मुगाचं, चवळीचं, चण्याचं बिर्ढही आपल्याकडे असतं,नाॅनव्हेजचा वार नसला तरी आपलं हे “बिर्ढ” सगळं निभावून नेतं ॥8॥
संकष्टीला, सणावाराला बिना कांदा-लसणाचंही सगळे आवडीने खातात
शिल्लक राहिलेलं दुस-या दिवशीही “बिर्ढ आहे नं गं, वाढ नं,” म्हणून आवर्जून मागून घेतात ॥9॥
मनापासून करतो, उत्साहाने, आवडीने व आग्रहाने खाऊ घालतो
आनंदी चेहरे बघून तृप्त होतो, म्हणूनच कदाचित आपण स्वत:ला कायस्थ म्हणवतो ॥10॥
—–सौ.वर्षा कुळकर्णी खोपकर—–
Leave a Reply