एखाद्या व्यक्तीच्या स्वभाव आणि गुणविशेषामुळे जसा तिचा चेहेरा दिसतो, तसाच प्रत्येक शहराचा एक विशिष्ट चेहेरा बनलेला असतो. हा चेहेरा त्या शहराच्या सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक तसंच राजकीय जडणघडणीतून आकाराला आलेला असतो. ऐतिहासिक ठाणे शहर त्याला अपवाद कसे असेल?
भारतातील पहिली रेल्वे ज्या दोन शहरात धावली त्या पैकी एक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत पुढारलेले, जिल्ह्याचे मुख्य ठिकाण, सर्व राजकीय पक्षांची जिल्हा कार्यालये सामावून असलेले आणि भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईचे धाकटे भावंड असलेल्या ठाणे शहरात माझ्या पोलिस सेवेचा बराच मोठा काळ सलग व्यतित करण्याचे भाग्य मला लाभले.
सन २००५ आणि २००६ या कालावधीत ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून नेमणुकीस असताना या शहराचा गाभा माझ्या अधिकार क्षेत्रात मोडत होता. रेल्वे स्टेशन ला लागून असलेला बी केबिनचा भाग, ब्राह्मण सोसायटी, भास्कर कॉलनी, गोखले रोड, राम मारुती रोड, तलावपाळी,पाच पाखडी, चंदन वाडी, खोपट, चरई, उथळसर, कोलबाड इ. इ.
ठाणे शहर गेल्या तिन दशकात सगळीकडून आडवे उभे वाढलेले असले तरी वर उल्लेख केलेली क्षेत्रे म्हणजे मूळचे ठाणे होय. इथली प्रजा बव्हंशी मराठी. जे काही इतर प्रांतीय किंवा धर्मिय असतील ते मराठी संस्कृतीशी एकरूप झालेले.
मात्र हे प्रत्येक भाग स्वतःची अशी स्वतंत्र ओळख राखून असलेले. काही भाग उच्च विद्याविभूषित नागरिकांचा तर दुसरा संमिश्र, एखादा राजकीय दृष्टया संवेदनशील तर दुसरा आपण बरे आणि आपले घर बरे या प्रवृत्तीचा. काही भाग व्यापारी तर काही शैक्षणिक संकुलांचा. त्या त्या भागाच्या सामाजिक संस्कारांप्रमाणे सण साजरे करण्याच्या पद्धतीही वेगळ्या.
एखादया भागात सार्वजनिक गणपतीचीआटोपशीर आरास असे परंतु रात्रीची आरती झाल्यावर तिथे बाप्पाच्या सोबतीला मंडपात एखादीच व्यक्ती थांबलेली आढळायची, तर दुसऱ्या ठिकाणी झगमगती आरास. इथे मात्र रात्रीच्या आरती नंतर दिवस सुरू झालेला असायचा. गणपती उत्सवात गस्त घालतअसताना माझे डोळे बांधले असते, तरी लाऊड स्पीकरवर लावलेल्या गाण्यांवरून, कोणत्या भागातून जीप चालली आहे ते मी ओळखले असते. “जयोस्तुते श्री महन्मंगले ” कुठे, “चिकमोत्यांची माळ ” कुठे, “शूर आम्ही सरदार आम्हाला” कुठे आणि ” गोरी पोरगी मांडवाखाली ” गाणे कुठल्या भागात लागलेले असणार हे मला पाठ होते. प्रत्येक भागातून येणाऱ्या तक्रारींचे प्रकारसुद्धा वेगवेगळे. भागिदाराने फसवल्या बद्दलच्या तक्रारी एका भागातून जास्त तर दुसऱ्या भागात घरफोड्या नेहमीच्या. उभ्या केलेल्या कार मधून लॅपटॉप ची चोरी एका ठराविक रस्त्यावर ठरलेल्या, तर गळ्यातली साखळीचोरीचे रस्ते ठरलेले.
मात्र शहराच्या अशा विविध छटा अनुभवताना मनुष्य स्वभावाचे काही वेगळे पदर सुध्दा मला पहायला मिळाले. नौपाडा पोलिस ठाण्याच्या आवारात सप्तशृंगी मातेचे एक छोटेखानी, टुमदार देऊळ आहे. तुलनेने गाभारा लहान असला तरी त्याच्या समोर दोन्ही बाजूला लांबलचक असे लादी बसवलेले पक्के ओटावजा बाक आणि वर पक्के छप्पर अशी व्यवस्था देवळात केली आहे. दिवसभर वर्दळ खूप अशी नसली तरी नवीन लग्न झालेले एखादे जोडपे देवीची ओटी भरण्यासाठी येऊन जात असे. संध्याकाळी पाच नंतर मात्र देऊळाचे बाक बऱ्याचश्या वृद्ध जोडप्यांनी भरलेले दिसत असत.
यजमान ऐंशीच्या आसपासचे आणि पत्नी त्यांच्याहून थोडी लहान वयाची. अशी जोडपी दररोज संध्याकाळी देवळात येत असत. चपला काढून बाजूला ठेऊन, देवीला नमस्कार करायचा आणि त्या बाकांवर जागा मिळेल तसं जोडीने बसायचे हा रिवाज.
संध्याकाळच्या गस्तीला निघताना माझ्या केबिन बाहेर, माझ्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी दिवसभरात केलेल्या कामाची उभ्या उभ्या मी माहिती घेत असे. त्यावेळी या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्यांचे दर्शन होत असे. अर्धा पाऊण तास तेथे बसून जोड्या निघून जात असत. प्रकर्षाने जाणवत असणारी गोष्ट म्हणजे ते वयस्क एकमेकांशी गप्पा मारत बसले आहेत असे कधी आढळले नाही. जे ते दाम्पत्य आपल्यात मग्न.
यजमानांच्या वयोमानानुसार त्यांच्या किंचित सुरकुतलेल्या चेहेऱ्यावरचा, त्यांनी जगाशी राखलेला अलिप्तपणा स्पष्ट पणे वाचता येत असे. कपाळावर सूक्ष्म आठीही असे. मनगटावरील घड्याळात नजर टाकून ते उठून घरी जायला निघत. मितभाषी आणि आपला आखीव दिनक्रम सांभाळून असलेल्या या व्यक्तींचे चेहरे थोड्याच दिवसात मला ओळखीचे वाटू लागले. त्यांच्याशी नजरानजर झाली की मी हात उंचावून त्यांना अभिवादन करत असे. प्रथम प्रथम कपाळावरची आठी दुप्पट करत ते दुर्लक्ष करत असत. हा पोलिसवाला कशाला हात करतोय आपल्याला असा एकूण भाव. मग काही काळाने
मी, “नमस्कार,कसे आहात काका? ” असे म्हणून बोलायचा प्रयत्न करत असे. आठी तशीच ठेऊन “ठीक” इतकेच तुटक उत्तर मिळत असे. अशा वेळी सर्वसामान्य व्यक्ती पोलिसांच्या जवळ जायला किती अनुत्सुक असतात हे ठळकपणे जाणवत असे. तरीही मी काही दिवसांनी अगदी त्यांच्याशी बोलायच्या इराद्याने दोन पाऊले पुढे जाऊन त्यांची विचारपूस करत असे.
” मी अजित देशमुख. इथला सिनियर इन्स्पेक्टर. आपल्याला रोज पाहतो. म्हणून म्हटलं बोलावं आपल्याशी. कुठे राहता आपण? ” अशी हसतमुखाने सुरुवात केली की मग संभाषणामागे कोणताही पोलिसी हेतू नाही याची त्यांना खात्री पटत असे. संवादाला घातलेली कुलुपे तुटून पडत आणि ते छानपैकी बोलायला सुरुवात करत असत.
” मी, अमुक अमुक. आम्ही मूळचे इथले इथले. गेली साठ वर्षे इथे ठाण्यात एकाच घरात आहोत. दोन मुलं. मोठी मुलगी. ती कॅनडाला असते. मुलगा अमेरिकेत. दर तिनचार वर्षांनी मुलाची फेरी होते. ती दोघेही आता भारतात कायम परत येण्याची काही शक्यता नाही. मुलीचं सासर नागपूरचं. पाच वर्षापूर्वी नागपूरला ते सगळे येऊन गेले तेंव्हा तिची भेट झाली होती. आम्ही दोघेच इथे असतो.” यजमान कौटुंबिक माहिती स्वतःहून पुरवत.
” पण मुलगा अगदी नियमितपणे फोन करून विचारपूस करत असतो. ” त्यांच्या पत्नी तेवढ्यात मुलाची बाजू सांभाळून घेतात.
” तुम्ही देशमुख म्हणजे…?” अपेक्षित प्रश्न.
“……….” मी
“अच्छा अच्छा ” त्या.
त्या सर्व वयस्क जोडप्यांशी बोलताना संवादाचा ढाचा जवळ जवळ हाच असायचा. कौटुंबिक स्थितीसुद्धा थोड्याफार फरकाने सारखीच.
ही जुन्या पिढीतील पुरुष मंडळी, अत्यंत बेताच्या आर्थिक परिस्थितीतून प्रचंड मेहेनत करून,खूप शिकून स्वतःच्या हिकमतीवर नोकऱ्या मिळवून सचोटी आणि हुशारी मुळे उच्च पदांवरून निवृत्त झालेली. अंगात बाणलेली शिस्त त्यांच्या बोलण्या वागण्यातून कळायची. पाच मिनिटे बोलले की “चला. निघावं आता. तुम्हाला कामे आहेतं. आम्ही रिकामे.” असं म्हणून निघणार. कधी चहा विचारला तरी, ” अहो आत्ता तासाभरात जेवण होईल आमचं.” असं म्हणून चहालाही नकार.
कोणी कधी स्वतःहून सांगणार, ” व्ही.जे. टी. आय. च्या अमुक विषयाच्या पहिल्या बॅच चा मी ग्रॅजुएट बर का! ”
काही आस्थेने माझ्या मुलाबाळांची चौकशी करत असत तर कोणी माझ्या छंदांची.
एकदा असच बोलता बोलता माझ्या हातात असलेलं, माझ्या आवडत्या सिडने शेल्डनचं एक पुस्तक त्यांच्या नजरेस पडलं. त्यांनी लगेच. ” उद्या जॉर्ज ऑर्वेलच माझं आवडतं, एक लहानसं, पण अप्रतिम पुस्तक तुम्हाला आणून देतो. वाचा ” असं सांगितलं. त्यावर मी “अँनिमल फार्म ” का? असं विचारलं. ते मी वाचले आहे आणि माझेही आवडते पुस्तक आहे हे कळल्यावर, रास जुळल्याचा आनंद होऊन त्यांनी माझ्या पाठीवर जोरात आपुलकीने थाप मारली आणि दुसऱ्या दिवशी हा मोठ्ठा नावाजलेल्या लेखकांच्या जुन्या पुस्तकांचा गठ्ठा, झेपत नव्हता तरी पिशवीतून मला भेट म्हणून आणून देऊन मला श्रीमंत केले.
पोलिस ठाण्याच्या बाजूलाच राम नावाचा मराठी मुलगा रद्दीचे दुकान चालवीत असे. भोवतालच्या परिसरातील अत्यंत सुशिक्षित पिढीतील कुणा वृद्धाचे निधन झाले किंवा कुणाचे प्रकृतिमान खालावल्याने वाचन कठीण झाले की त्या घरातील अत्यंत दुर्मिळ पुस्तके रद्दीच्या रुपात तेथे येत. रामला माझ्या सूचना होत्या. जुनी पुस्तके मला दाखविल्याशिवाय बाहेर विकायची नाहीत. आठवड्यातून दोनदा तो पुस्तकांचा गठ्ठा आणून समोर ठेवत असे. त्यातून मला हवी ती पुस्तके मी विकत घेत असे.
एकदा त्याच्या दुकानवरून जाताना, मला पुस्तके देणारे ते काका दुकानात जमिनीवर उकिडवे बसून पुस्तके चाळत असल्याचे पाहून मी जीपमधून उतरून त्यांच्या पाठमोऱ्या आकृती मागे गुपचुप जाऊन उभा राहिलो.
पाहतो तर हे एक एक पुस्तक चाळत, ” हे पहा राम, हे पुस्तक रद्दीच्या भावात नको विकू. फार दुर्मिळ आहे ते. आणि हे तर कुठेही मिळणार नाही शोधून. देशिल चणेवाल्याला. बाजूला ठेव ते.” अशा सूचना देत होते. राम माझ्याकडे पाहून हसत होता. ज्ञानेश्वरी आणि टेलिफोन डिरेक्टरी एकाच तागडीत तोलणाऱ्या त्याला त्या सरस्वतीशिष्याची कळकळ काय कळणार! मी त्याला डोळ्याने दटावले आणि ते म्हणतील त्याला हो म्हणत रहा असे खुणावले. मागच्यामागे गुपचुप जीपमधे बसून पुढे निघालो.
मी तेव्हा ठाण्यात भाड्याची जागा घेऊन एकटा रहात असे हे माहीत झाल्यावर अशी दांपत्ये माझी जेवणाची आस्थेने चौकशी करत असत.
बऱ्याच वेळा असं होत असे की, दुपारी १२/१२.३० च्या सुमारास मी केबिन मधे काम करत असताना असे ओळखीचे एखादे काका बाहेर उभे राहिलेले दिसायचे. मी एखाद्या अधिकाऱ्यासह चर्चा करत असलो तर ते बाहेर ताटकळत उभे रहात पण अशा वेळी मला हाक मारणे म्हणजे व्यत्यय आणणे अशी त्यांची धारणा असे. माझे लक्ष गेले की मी लगबगीने त्यांना कशाकरता आलात ते विचारावं,तर ते हाताची पाचही बोटे जुळवून तोंडाशी नेऊन खुणेनेच “जेवण झाले का” असे विचारीत. ” नाही हो काका, अजून अवकाश आहे ” इतके सांगितले की, लगेच लगबगीने, ” हा आलोच मी ” म्हणून निघून जात. आणि २०/२५ मिनिटांनी पुनः हजर होत. यावेळी रव्याचे किंवा बेसनाचे चार सहा लाडू किंवा नारळाच्या वड्या असं काहीतरी, घरी नुकत्याच केलेल्या ताज्या पदार्थाचा भरलेला डबा माझ्या हातात ठेवत असत. त्यांच्या राहत्या परिसरातील लिफ्ट नसलेल्या, २५/३० पायऱ्यांचे लाकडी जिने असलेल्या जुन्या इमारती माझ्या चांगल्याच परिचयाच्या होत्या. वयामुळे अगदी आवश्यक असेल तरच ही मंडळी संध्याकाळ सोडून इतर वेळी खाली उतरत असत.असे असूनही त्यांनी माझ्यासाठी म्हणून काही घेऊन यावे या विचाराने मला संकोच वाटत असे.
” अहो, कशाला तुम्ही त्रास घेतलात काका? ” असं विचारल्यावर….
” त्रास म्हणू नका.हीने मुद्दाम तुमच्यासाठी पाठवले आहे! घरात आम्ही दोघेच. मुलगा इथे नसला तरी त्याच्या आवडीचे पदार्थ ही नियमितपणे करत असते. आम्ही संध्याकाळी देवळात येऊ तेंव्हा आवडलं म्हणून सांगा बरं का! आनंद वाटेल तिला. छान झालंय म्हणून सांगायला घरात आता आहे कोण? शुगरचा त्रास म्हणून मला खायला बंदी. बराय निघतो. तुम्हाला ढीगभर कामं. आमचं काय! काम शोधत बसणं हे आमचं मुख्य काम ”
मला विचारांत लोटून ते निघून जात. त्यांनी आणलेल्या पदार्थाची चव त्यातील साखरेमुळे गोड असली तरी गोडवा मात्र त्यांच्या माझ्यावरील निर्व्याज लोभामुळे आलेला असे. हा अनुभव माझ्या अमेरिकास्थित मित्राला सांगितला, तेव्हा तो उत्स्फूर्तपणे उद्गारला,
“अरे यार, यही तो है अपना इंडिया.”
— अजित देशमुख.
(निवृत्त) अप्पर पोलिस उपायुक्त.
9892944007.
ajitdeshmukh70@yahoo.in
Leave a Reply