अपूर्व आहे आज सोहळा
चहूंदिशांनी झाले गोळा
बालवृद्ध, स्त्रीपुरुष, ऋषिमुनी, नृपती, विद्वज्जन ।। ६
मंत्रमुग्ध जनसिंधूपुढती
गिरा अमृतासम रसवंती
प्रत्ययकारी शब्दौघातुन घाली संमोहन ।। ७
नऊ रसांचा सुचारु वापर
चित्र उमटतें मन:पटावर
वीर, करुण, शृंगार, रौद्र, शतरंगांचें मीलन ।। ८
नातीगोती, राग, लोभ, भय,
मोद, क्लेश, छल, पीडा, अनुनय,
निषेध, कौतुक, निसर्ग-मोहक, यथातथ्य चित्रण ।। ९
काव्यसुधेचें करुनी पान
श्रोतेगण विसरत निजभान
जन्ममृत्युसंवेदन भीती नकळत ओलांडुन ।। १०
लुब्ध, स्तब्ध, थांबत खग, प्राणी
तरूलता डोलती रंगुनी
निर्झर, सरिता, जलौघ करती रामनामगायन ।। ११
वातावरणीं घुमतो नाद
सृष्टीतुन उठती पडसाद
कणाकणातुन क्षणाक्षणाला घडे रामदर्शन ।। १२
अखिल चराचर मोदें न्हालें
सप्तलोक राघवमय झाले
भरुन ओंजळी फुलें उधळती स्वर्गातुन सुरगण ।। १३
— सुभाष स. नाईक
Leave a Reply