कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९४ रोजी झाला.
अप्पासाहेब हे देशभरात मुख्यत: रचनात्मक कामाबद्दल ओळखले जातात. त्यांनी ‘कुणबी सेवा संघ’ काढला. ते ‘चरखा संघा’चे तर अध्यक्ष झाले होते. त्यांनी रत्नागिरीत सूतकताई व ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमोल काम केले. त्यांनीच रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली. ते जिल्हा काँग्रसचे अध्यक्षही होते. ते स्वातंत्र्य चळवळीत सुमारे साडेतीन वर्षें तुरुंगात होते. त्यांनी त्यांना तुरुंगात भंगीकाम करण्यास मिळावे म्हणून केलेला सत्याग्रह गाजला. कारण त्यांच्या समर्थनार्थ गांधीजींनीही उपोषण केले. एवढा परस्पर विश्वास त्या दोघांत होता.
महारबंधूंनी मेलेल्या पशूची कातडी सोडवणे बंद केले तेव्हा त्यांनी मृतपशूची कातडी, खतासाठी मांस आणि हाडे मिळवण्याच्या दृष्टीने अनेक चर्मालये काढली. तेथे भाई सुखी, बाबा फारक, बाळूदादा पानवलकर, शामराव जोशी, बांदेकर हे त्यांचे पहिल्यापासूनचे सोबती व अनेक ब्राह्मण सहकारीसुद्धा काम करत. ते सगळे स्वातंत्र्यसैनिक होते.
दलितमित्र रमाकांत आर्ते यांनीही खूप काम केले. अप्पांनी भंगी कष्टमुक्तीसाठी चराचे संडास, गोपुरी संडास, सोपा संडास असे अनेक संडास लोकप्रिय केले. मानवी विष्ठेचा खतासाठी उपयोग करताना त्यांनी शौचघरे शास्त्रीय पद्धतीने बांधली. त्यांनी 3 फूट x 3 फूट x 3 फूट आकाराच्या दोन टाक्या बांधल्या. या टाक्या एकमेकांना लागून होत्या. टाक्यांच्या वरच्या बाजूस मधोमध शौचविधी करण्यास दीड फूट लांब व नऊ इंच रुंद अशी पोकळ जागा ठेवण्यात आली. शौचविधी झाल्यानंतर त्यावर माती टाकण्यात येई. असे केल्यानंतर सहा महिन्यांत त्यातून सेंद्रिय खत तयार होई. एक टाकी भरली, की दुसऱ्या टाकीचा उपयोग केला जाई. अप्पासाहेबांनी त्याला ‘गोपुरी शौचघर’ असे नाव दिले.
अप्पांनी त्याकाळात कुकर, पवनचक्की, गोबरगॅस प्लँट असे अपारंपरिक ऊर्जास्रोताचे यशस्वी प्रयोगही केले. त्यावर पुस्तके लिहिली.
अप्पासाहेब पटवर्धन हे प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला.
पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे यांनी या आश्रमाला भेट दिली आहे. अप्पासाहेबांचे ५० वर्षा पूर्वीचे विचार आज जनतेसाठी प्रेरणादायी आहेत.
अप्पासाहेब पटवर्धन यांचे १० मार्च १९७१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply