प्लेनने टेक ऑफ घेतला होता. आणि त्याबरोबर माझ्या मनानेही…
आता मला एअरपोर्ट बिल्डिंग लहान-लहान दिसू लागले. रस्त्यावर धावणाऱ्या छोट्या कार्स, छोटे रस्ते, छोटे डोंगर सर्व बघताना खूप मजा वाटली. टेक ऑफ घेताना मला डोकेदुखी किंवा कानात दडे बसणे वगैरे प्रॉब्लेम जाणवला नाही. टेक ऑफ खूप स्मूथआणि चांगला होता. पण जसे जसे प्लेन अजून हायर अल्टिट्युडलाला जायला लागले तसे माझे डोके जड झाले. पण हे फार काळ टिकले नाही. पाच ते दहा मिनिटात मी परत नॉर्मल झाले. आता प्लेन स्टेडी झाले होते. मी हळूच खाली डोकावून बघण्याचे डेरिंग केले. मला फक्त ढग दिसत होते. अजून थोडे नीट निरखून पाहिल्यावर हळूहळू मला खालचे समुद्र आणि जमीन दिसायला लागले. स्क्रीनवर विमानाची अल्टिट्युड 42 हजार फूट दाखवत होती आणि आऊटसाईड टेंपरेचर -32 डिग्री सेल्सियस दाखवत होते. मला एकदम धक्काच बसला. आत मध्ये इतकं कम्फर्टेबल वातावरण आणि बाहेर असं टेम्परेचर असेल अशी कल्पना नव्हती. मग मी टीव्ही चालू केला आणि डाउनलोड कॅमेरा बघत होते बाहेरून आणि टीव्हीमध्ये सुद्धा फक्त कापसासारखे पांढरे ढग दिसत होते. ते पाणी होते का ढग हे त्यानांच माहिती.
आमचे विमान आता अरबी समुद्रावरून उडत होते. त्या डाऊनलोड कॅमेरा मध्ये अरबी समुद्र दाखवत होते. मग माझ्या लक्षात आले की, विमान प्रवास बहुतांश समुद्रा वरूनच असणार. विमानात वेगवेगळ्या गोष्टी यायला सुरुवात झाली. आधी फ्रुट ज्यूस दिले, नंतर स्नॅक्स मग चहा कॉफी आले. सर्व गोष्टी मी आरामात चवी-चवीने खाल्ल्या.नाही तर वेळ कसा जाणार? एकीकडे आमच्या गप्पा चालू होत्या. त्याने मला विचारले की, तू बिजनेससाठी जात आहेस का नातेवाईकांना भेटायला? मग आम्ही आमच्या जॉब आणि कंपनी बद्दल देवाण-घेवाण केली. त्याला ‘ रेव्ह टेक्नॉलॉजी’ माहिती होती. तो म्हणाला, ती वरळीला आहे तीच ना! तर मी एकदम सरप्राईज झाले. त्याला विचारलं, तुम्हाला कसं माहिती? मग त्याने सांगितले की, तो पण आय.टी.मधला आहे. इन्फोसिस मध्ये तो सेल्स डिपार्टमेंट मध्ये होता. आणि लास्ट दोन-तीन वर्ष तो लंडनमध्ये राहून UK ऑपरेशन्स बघत होता.
थोड्या वेळाने डाऊनलोड कॅमेरामध्ये आमचं विमान मस्कत वरून जाताना दिसलं. विमान आता जमिनीवरून चालले होते. मला उगाचच हायसे वाटले. पायाखालची सरकलेली जमीन परत पायाखाली आली असे वाटले. खरं बघायचं तर समुद्रावरून गेले काय आणि जमिनीवरून गेले काय? 42000 फूट उंचीवरून जाताना काय फरक पडणार आहे? डाऊनलोड कॅमेरा मध्ये खूप सुंदर द्रुश्य होत. सगळीकडे पिवळे सोनेरी ढग पिंजून ठेवले आहेत असे वाटत होते. तिथली ओसाड वाळवंटी असणार. हिरवा रंग नावालाही नव्हता. पु.लं.च्या अपूर्वाईची आठवण झाली. हिरव्या रंगाकडे लोकं का आकर्षित झाली असावी, ते पटले. सुर्याच्या रखरखाटात चंद्र आणि चांदण्यांची शीतलता नक्कीच मनाला भुरळ घालणारी असेल. थोड्या वेळाने अनाउन्समेंट झाली की, आपण आता दुबईला पोहोचत आहोत. दुबई म्हणले की तिथले सोने आठवते. मगाशी पाहिलेले सोनेरी पिवळे डोंगर हे सूर्याच्या किरणांनी झळकत होते की तिथल्या सोन्यामुळे हे समजेना. आता डाऊनलोड कॅमेरा मध्ये सोनेरी पिवळसर धूळ, मातीचा थर असं दिसत होतं.
डोक्यात गरगरायला लागले. प्लेन झपाट्याने खाली येत होते. टेक ऑफ पेक्षा लँडिंगच्या वेळी जास्त त्रास झाला. टेक ऑफ एन्जॉय करू शकले पण उतरताना कधी एकदा पाय जमिनीला (विमानाचे) लागतात असं झालं. माणसाच्या जीवनात असंच आहे. माणसाला वरच्या लेव्हलला जायला नेहमीच आवडत. कधीतरी आपल्याला इमर्जन्सी मध्ये बॉसच काम सांभाळाव लागलं तर जो त्रास होतो, तो आपण आनंदाने स्वीकारून वर चढायला उत्सुक असतो. पण तुमच्या हाताखालचा माणूस रजेवर असेल आणि त्याचं काम तुम्हाला करायला लागलं तर ते जास्त त्रासदायक होतं, हे असं माझ्या मनात उगीचच आले.
दुसरा काही उद्योग नव्हता त्यामुळे असे काहीतरी विचार येत होते. दुबई जवळ आल्याची अनाउन्समेंट झाल्यावर, मी पण थोडी आकाशात होते, ती जरा जमिनीवर आले आणि मनाला बजावले तू दुबईला जात आहेस. खूप काळजीपूर्वक वाग. सिनेमांमधून बघितलेल्या दुबईच्या वर्णनामुळे असेल कदाचित, पण मी जरा सावध /सतर्क रहायचे ठरवले होते. विमानाचे पाय जमिनीला लागले तरी माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं. प्लेन रनवे वरून धावत होतं तरीही मी खुर्चीचे हात सोडले नव्हते. माझं टेन्शन माझ्या चेहर्यावर दिसत असाव. शेजारचा माणुस म्हणाला, आपण ऑलरेडी लॅन्ड झालो आहोत. बाहेर बघ! मी बाहेर पाहिले आणि दुबई ची एअरपोर्ट बिल्डिंग दिसली. प्लेन रस्त्यावरून जात होतं. सुटकेचा निश्वास टाकला. परत त्या सद्गृहस्थाने माझी बॅग काढून दिली. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होऊन आम्ही प्लॅन मधून बाहेर पडलो. त्या सद्गृहस्थांनी मला कुठून पुढच प्लेन घ्यायचं आणि शॉपिंग मॉल सुद्धा दाखवला. आणि तो निघून गेला. आतापर्यंत मला एकटं असं वाटलं नव्हतं पण तो गेल्यावर मला अचानक एकटे वाटायला लागले. इतकी लोकं तिथे होती पण कोणाला स्माईल देण्याइतके सुद्धा कोणी ओळखीचे नव्हते. खांद्यावरची बॅग अचानक जड वाटायला लागली आणि त्याबरोबर मनंही जड झालं.
५ मिनिटे मी काही न सुचुन शांत उभी होते. मग इकडे तिकडे फोन करावा यादृष्टीने फिरले. पण फोन कुठेच दिसेना. एक-दोन ठिकाणी फोन होते पण तिथे कार्ड लागत होते. शेवटी मी तो प्रयत्न सोडून दिला. खालचा शॉपिंग मॉल आकर्षित करत होता पण बॅग जड असल्यामुळे तो विचार पण कॅन्सल केला आणि मनात विचार आला, परत येताना वजनी पौंड घटवून चलनी पौंड जास्त ठेवायचे अशी मनाशी खूणगांठ पक्की केली. तशाही स्थितीत मला हसायला आले. आणि मनावरचा ताण हलका झाला. मनावरचा ताण एका क्षणात पु.ल.च नाहीसा करु शकतात.
मी दुबईला उतरले तेंव्हा ११.३० वाजले होते. पुढचं फ्लाईट २.३० वाजता होतं. ३-३.३० तास काय करायचं? उगीच रेंगाळत फिरत राहीले. पण शेवटी हात / खांदेनी हडताल केला.मग रेस्ट रुम मधे जाउन फ्रेश झाले. काटा फक्त १५ मिनिटे पुढे सरकला.शेवटी गेट नं.१९ च्या समोर जावून बसले. जसं काही लवकर जावून बसले तर लवकर लंडनला पोहचू. तिथे बसून मला एअर पोर्टचा सुंदर नजारा दिसत होता.
समोर भल्या मोठ्ठ्या काचेच्या भिंती. पलिकडे अवाढव्य विमाने, टॅक्सी वेज्, कुठे प्लेन उड्डान घेण्याच्या तयारीत तर एखादे प्लेन आपले प्रवाश्याना ईप्सित स्थळी पोचवण्याचे कर्तव्य पार पाडून विश्रांती घेण्याच्या तयारीत. माझ्या डाव्या हाताला रेस्टारंटस्, दुकाने होती – अतिशय शोभिवंत आणि देखणी!
थोडे तिरके बसून मला खालचा शॉपिंग मॉल दिसत होता.किती झगमगाट विविध गोष्टींचा.लोकांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या सजावटीचा! ३ तासच काय ३ दिवस पण अपुरे पडतील सगळ्या दुकानांना भेटी द्यायचं ठरवलं तर्! पण हे बॅग प्रकरणाने फारचं अडवून ठेवलं होत मला. माझ्या मनात एक गमतीशीर विचार आला, आता जे कोणी बाहेर जाईल त्याला मी हॅपी जर्नी ऐवजी लाईट जर्नीच म्हणनार! एका बाजूला त्या जादूई दुनियाकडे नेणारे फिरते जिने, पलिकडच्या बाजूला लोकांना चालण्यासाठी वॉक वे, रेस्ट रुम्स्, टेलिफोन बूथ. मी बसले होते त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या वॉक वेने एअर पोर्टचे दोन भाग केले होते. मधे मोठी ओपन स्पेस होती. त्या जागेत मधे मधे मोठे खांब होते. जे खालच्या मजल्यापासुन सुरु होवुन वर छतापर्यंत गेले होते. प्रत्येक खांबावर सुरेख नक्षीकाम केले होते. वरचा जवळ जवळ एक चतुर्थांश भागावर सोन्याचा मुलामा होता. खूप सुंदर, स्वच्छ, देखणा आणि प्रशस्त एअर पोर्ट होता. तितकाच तो व्यस्त होता. लोकांची वर्दळ असूनही कुठेही आवाज,आरडा-ओरडा, गोंगाट नव्हता. तेथिल संपन्नता तिथल्या प्रत्येक गोष्टीतून झळकत होती. ते द्रुश्य बघताना भान अगदी हरपून गेले.
अचानक, कोणीतरी हळू हळू माझ्या जवळ येतयं असं मला जाणवलं. मी एकदम सावध झाले…..!!
आणि हात नकळत बाजूला ठेवलेल्या बॅगवर गेला. मी तिरकी बसले होते, ती पटकन सरळ झाले. आता ती व्यक्ती माझ्या अगदी जवळं आली. ती एक वयस्कर बाई होती. तिला बसायचं असेल असं वाटून मी बाजूला सरकले. आणि तिला जागा करुन दिली. तर ती त्या जागेकडे न जाता माझ्या पुढ्यात येवून ऊभी राहिली.मी तिला जवळून पाहिले.
ती साठीच्या पुढची असावी. खूप गबाळा अवतार. अंगावर एखाद्या कामवल्या बाईला शोभतील असे कपडे. क्षणापूर्वी मी अंगा-खांद्यावर संपन्नता गर्वाने मिरवणारे एअर पोर्ट पहात होते आणि दुसर्या क्षणी माझ्यासमोर जिला लंकेची पार्वती म्हणता येईल अशी व्रुद्धा. किती हा विरोधाभास!!!
— यशश्री पाटील.
Leave a Reply