क्षणापूर्वी मी अंगा-खांद्यावर संपन्नता गर्वाने मिरवणारे एअर पोर्ट पहात होते आणि एका क्षणात माझ्यासमोर जिला लंकेची पार्वती म्हणता येईल अशी व्रुद्धा. किती हा विरोधाभास! तिच्या हातात एक मोठी-जाड प्लास्टिकची पिशवी होती. तिला बॅग म्हणणे म्हणजे कोकण्यातल्या म्हशीला मणभर दूध म्हणणे. ती पिशवी बर्यापैकी जड असावी.आणि त्या पिशवित खूप सामान घुसवून घुसवून भरले होते.त्या सामानाने ही मिळतील तिकडे आपले हात-पाय पसरले होते, असे त्या पिशवीच्या एकंदरीत आकारावरुन वाटत होते. पिशवीकडे बघून मला ‘म्हैस’ मधील पु.लं.चं वाक्य आठवलं. ‘ए.श्टी. ही एक महाकाय करंजी असून..त्यात माणसे, सामान ह्यांचं पुरण ठासून भरलं असतं.’ अगदी तसचं हे सामान त्या पिशवीत भरलेलं होतं. त्या एकंदर अवतारावरुन मी मुंबईत असते तर तिला नक्की भिकारी समजले असते. पण ती दुबई एअर पोर्ट वर असाल्यामुळे मी तिला काही समजण्याचा नादी लागले नाही.असो. तर अस हे रुपडं माझ्यासमोर येवून का थांबले आहे हयाचा मला बोध होईना. मी जरा प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहीले. माझी नजर जाताच, ती बाई अजून जवळ आली आणि मोडक्या तोडक्या ईंग्लिश आणि हात-वारे, खाणा-खुणा करू लागली. त्या सर्व गोष्टीवरुन मला असा बोध झाला की, त्या बाईंना लंडनला जायचं आहे.फ्लाईट कीती वाजता आहे का कीती वेळ आहे अजून? मी आपली माझ्यापरीने सगळी ऊत्तरं एका दमात देवून टाकली. ‘गेट नं.१९, २.१५ ला, २ तासाने.’ माझ्याही अभिनयाची कसोटी लागली होती.
मला ४थी / ७वीच्या स्कॉलरशिपला असलेली एक कविता आठवली… एक लहान मुलगा पाहुण्यांच्या त्याच त्याच प्रश्नांना वैतागलेला असतो. म्हणून तो एकदा एका पाहुण्याला असं ऊत्तर देतो,
‘नाव काय तुझं सांग पाहू बाळां, कितवीत शिकतोस, कुठे आहे शाळा?’
मुलगा वैतागून म्हणतो, ‘शाम, चौथीत, चौकामधीच’.
मी पण त्याच धर्तीवर सांगून टाकलं, ‘गेट नं.१९, २.१५, २ तासाने’. कुठलं हवयं ते ऊत्तर घे बाई!
आता तिने खाणाखुणा करुन जे विचारले, त्याचा सारांश की, मला खायला जायचं आहे. बॅग ईथे ठेवू का? तोंडात येणार्या होकाराला मुश्किलीने परतवून लावले. मनात एकदम विचार आला, कोण्या अनोळखी माणसाच सामान ठेवून घेवून मी फसले तर?
‘यही काशी! यही रामेश्वर!’ होईल माझं. आता दुबईत आहे तर, ‘यही मक्का! यही मदीना’ म्हणायला हरकत नाही. मग कुठलं लंडन आणि कुठलं ईंडीया? तिला नकार देताना खरंतरं खूप वाईट वाटतं होतं. पण माझा नाईलाज झाला.माझं सॉरी ऐकून ती बिचारी तिची जड बॅग ओढत निघून गेली. ती गेल्यावर मला पण माझ्या भुकेची जाणिव झाली. मी इकडे तिकडे नजर टाकली. थोड्या अंतरावर एक मध्यम वयीन जोडपे बसले होते. त्यांच्याशी नजरा- नजर होताच, त्यांनी स्माईल दिले. मी त्यांना विचारले, ईथे पौंड चालतील का?
ते म्हणाले, तू एमिराईटस्ची ट्रांझिट पॅसेंजर ना? मग तिकडे ट्रांझिट पॅसेंजर लाऊंज आहे. तिथे फ्री मधे जेवण मिळेल. हे म्हणजे एखाद्याला आपलं नाव सांगायला जावं आणि त्याने आपली सगळी कुंडली मांडावी असं झालं.असे म्हणत, त्यांनी जिथे सगळी रेस्टॉरंटस् होती त्या दिशेला हात दाखवला. तिथे ते ‘सफारी’ नावाच हॉटेल आहे ना, तिथे जा.
मी आभार मानून तिकडे निघाले. ते बहुदा माझ्याच फ्लाईटने आले होते. आणि पुढे पण त्यांना लंडन लाच जायचे होते.
मी बेधडक आत शिरले आणि जेवणावर यथेच्छ ताव मारला. मला नंतर कळले (लंडनला पोचल्यावर) की फक्त बिझनेस आणि फर्स्ट क्लास पॅसेंजरस्नाच फ्री जेवण असतं. बरं! मला त्यांनी बोर्डिंग पास मागितला नाही, नाही तर जेवण खूपच महागात पडलं असतं.
वेळ घालवायला म्हणून मी प्रत्येक घास अगदी ३२ काय ६४ वेळा चावत बसले… किती फूड व्हरायटी होती तिथे. मी राइस्, दाल फ्राय, स्टिमड् व्हेजिटेबल्स्, बॉइल्ड पोटॅटो, केक, क्रीम, जेली, ज्यूस, स्वीटस् सगळं शांतपणे टेस्ट करत वेळ घालवला. मस्त एखादा तास किंवा जास्तच वेळ गेला असेल. कारण मी बाहेर आले तेंव्हा १.४५ वाजले होते.
आता फक्त अर्धा तास की, मी माझ्या उराशी बाळगलेल्या स्वप्नातील स्थळाकडे झेपावणार होते!!
— यशश्री पाटील.
Leave a Reply