पावसाळ्यात ट्रेकर्स सतत ”अॅडव्हेंचर्स” अनुभव घेण्यासाठी नव्या स्पॉटसच्या शोधात असतात. ज्यावेळी एखादा अप्रकाशित गड, किल्ला किंवा ठिकाण त्यांच्या नजरेस पडतात तेव्हा विकेण्ड ला त्या स्पॉटला भेट देण्यासाठी पाऊले त्याठिकाणी वळू लागतात. मुंबई-अहमदाबाद हायवेवर असलेल्या मस्तान नाक्यावरुन या गडाला भेट देता येते; पण रेल्वेनं आपण जात असाल तर पालघर स्थानकात उतरुन, तेथील एस.टी. स्टॅण्डवरुन “मनोर” ला जाणारी एस.टी. पकडायची व वाघोबाच्या खिंडीत दाखल व्हायचं.
येथील खिंडीत असलेल्या आदिवासींच्या “वाघदेव” यामुळे खिंडीला वाघोबाची खिंड असं नाव मिळालं आहे. जंगलातली पायवाट असल्यामुळे वाटेत आपल्याला अनेक किटक, किडे, सरपटणारे छोटे जंगली प्राणी लक्ष वेधून घेतात. तसंच वाटेतल्या झाडा-झुडपांना बाजूला सारत एका घळीत जाऊन पोहोचतो. आजुबाजूला वाढलेल्या कारवीमुळे फारसा उतार जाणवत नाही आणि काळदुर्गाचं संपूर्ण दर्शन होतं; वळसा घालत, व उभा टप्पा पार केल्यानंतर काळदुर्गाच्या माथ्यावर पोहचता येतं.
माथ्यावर पोहचल्यानंतर गडाच्या कोणत्याच खुणांचं अस्तित्व जाणवत नाही, पण कातळात खोदलेली पाण्याची टाकी, तसंच गडाचा शेवटचा टप्पा पार करण्याआधी एक शंकराची पिंड, मंदिराचे मोडके अवशेष नजरेस पडतात. गडाच्या माथ्यावर पोहचल्यानंतर चहुकडे पाण्याचे ओढे, छोटे-मोठे झरे, डोंगरांची तोरणासारखी हिरवी रांग नजरेस पडून चित्त अगदी प्रसन्न करते; पूर्वेचा कोहोज किल्ला, उत्तरेला स्थित अशेरीगड व त्यामधून वाहणारी सूर्या नदी आणि काही अंतरावर असलेल्या वैतरणा नदीशी होणारा तीचा संगम हे सारं मन मोहून टाकणारं दृश्य आहे. तसंच पश्चिमेला दिसणारी सातपाटी, केळवे-माहिमची किनारपट्टी व अधूनमधून नजरेस पडणारे फेसाळते धबधबे मनाच्या कप्प्यात बंदिस्त होतात.
“काळ दुर्गला” भेट द्यायची असल्यास “पावसाळा” हा उत्तम ऋतू त्यात ही श्रावण महिन्यात येथे आल्यास ऊन-पावसाचा मस्त खेळ अनुभवता येतो, इथलं वातावरण सुद्धा कधी सूर्यप्रकाशित तर उंच गडावर ढगांची चादर पसरल्यामुळे पावसाच्या सरी कायम बरसतात.
आपण जर मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये रहात असाल, तर एक दिवसीय ट्रेकसाठी जवळच्याच पालघर इथल्या काळदुर्गला भेट देऊन “विकेण्डचा मोमेंट” एंजॉय करु शकाल याची खात्री देता येईल.
— सागर मालाडकर
Leave a Reply