नवीन लेखन...

अरण्यातील ‘लाल सोनं’ : रक्त चंदन

रक्त चंदन म्हटले की बहुतेक जणांना चंदनाचाच प्रकार असावा, असे वाटते. परंतु खूप कमी लोकांना याची माहिती असल्याने येथे आवर्जून त्याची माहिती द्यावीशी वाटते. सफेद चंदनाचे फेसपॅक, अगरबत्ती, किंवा औषधी गुणधर्म सर्वानाच परिचित आहेत. परंतु रक्त चंदन आणि सफेद चंदन यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तो कसा ते आपण जाणून घेऊ यात. श्वेतचंदन किंवा पांढऱ्या चंदनाचे शास्त्रीय नाव सँटलम अल्बम आहे तर लाल चंदनाचे शास्त्रीय नाव टेरोकार्पस सँटालिनस (Pterocarpus Santalinus) आहे. हा चंदनाचाच उपप्रकार असून याचा वापर आयुर्वेदिक औषधे तयार करण्यात होतो.

लाल चंदनाला रक्तचंदन, लाल चंदन, रतांजली, रक्तखंडनम, शेन चंदनम, अट्टी, शिवप्पू चंदनम, रुबी वुड, लाल सँडर, येरा चंदन, चेंचंदनम, रक्तचंदन, साँडर्सवुड असेही म्हणतात. अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आणि केवळ भारतात, तेही आंध्र प्रदेशच्या शेषाचलम पर्वतरांगांमध्ये मिळणाऱ्या लाल चंदनाला विशेष महत्त्व आहे. शेषाचलम जंगलाशिवाय जगात कुठेही ही झाडे वाढत नाहीत. तमिळनाडू राज्याच्या सीमेलगत असलेल्या आंध्र प्रदेश राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या शेषाचलमच्या टेकड्यांवरच हे झाड उगवतं. यात नेल्लोर,कुरनूल, चित्तूर, कडप्पा जिल्ह्यांचा समावेश आहे. वैज्ञानिक भाषेत याला टेरोकार्पस सँटालिनस (Pterocarpus Santalinus) असे म्हणतात. लाल चंदनाचे झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. शैव पंथाचे पालन करणारे भाविक या लाकडाचा पूजाविधींमध्ये वापर करतात. याचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे रक्तचंदनाला पांढऱ्या चंदनासारखा सुगंध नसला, तरी त्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत. मुळात रक्त चंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो, त्यामुळेच या झाडाला “रक्त चंदन” असे म्हटले आहे. या झाडाचे वाळलेले लाकुडही लाल रंगाचेच असते. श्वेत चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे पण या चंदनाप्रमाणे रक्त चंदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही.

रक्तचंदनाचे लाकूड लाल रंगाचे असल्यामुळे हा वृक्ष मौल्यवान मानला जातो. हे लहान उष्णकटिबंधीय झाड आहे. जगातील एकूण लाल चंदन उत्पादनात भारताचा वाटा सुमारे ९०% आहे. हे पवित्र मानले जाते आणि त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. अलीकडील ब्लॉकबस्टर तेलुगु चित्रपट “पुष्पा” मुळे ही प्रजाती लोकप्रिय झाली.

रक्तचंदन वृक्ष कोरड्या पानझडी जंगलात सु. ८ मी. पर्यंत उंच वाढतो आणि खोड ५०-१५० सें मीटर व्यासाचे असते. साधारणपणे कोवळ्या अवस्थेत ते ३ वर्षात ५ मीटरपर्यंत उंचावते, अगदी निकृष्ट मातीतही ते वेगाने वाढते. हे प्रकाशाला अनुकूल आहे आणि थंड तापमानात टिकू शकत नाही.

त्याचे खोड सरळ वाढत असून साल खडबडीत असते. पाने संयुक्त व लहान असून त्याच्या लहान संयुक्त पानाला बहुधा तीन एकाआड एक दले असतात. प्रत्येक दल ३–९ सेंमी. लांब असते. फुलोऱ्यात फुले थोडी असून ती पिवळी आणि लहान असतात.

निदलपुंज पाच, संयुक्त व हिरव्या दलांनी बनलेला असून दलपुंजात पाच मुक्त असमान गुलाबी पाकळ्या असतात. पुमंगात १० पुंकेसर असून त्यांपैकी नऊ संयुक्त व एक मुक्त असते. जायांग ऊर्ध्वस्थ असून त्यात एकच अंडपी असते. परागण कीटकांमार्फत होते. शेंग लहान, चपटी, गोलसर व पंखयुक्त असते. पिकल्यावर ती फुटते. बिया लहान व शेंदरी असतात.

हा वृक्ष भारतातील मूळ आणि स्थानिक आहे. तो फक्त पूर्व घाटाच्या दक्षिणेकडील भागात आढळून येतो.
“रेड सँडर्स ही भारतातील सर्वात शोषित वृक्ष प्रजातींपैकी एक असल्याचे नोंदवले गेले आहे. आणि त्यांच्यावर अवैध वृक्षतोड आणि कापणीचा प्रचंड दबाव आहे. राज्यभरात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. लाल चंदन वृक्ष भारतीय वन कायदा, १९२७ आणि वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित आहे, कारण ती एक मौल्यवान आणि लुप्तप्राय प्रजाती मानली जाते.

जगप्रसिद्ध लाल चंदन हा (Pterocarpous santalinus) भारतीय वृक्ष आहे. लाल चंदन दुर्मिळ आणि अत्यंत महाग आहे. एक टन लाल चंदनाची किंमत त्याच्या गुणवत्तेनुसार सुमारे ८० लाख ते १ कोटी आहे. भारतात ही झाडे तोडणे बेकायदेशीर आहे. त्याला प्रचंड मागणी आहे. रक्तचंदनाचे लाकूड पूर्वापार काळापासून वापरात आले आहे.

संवर्धन स्थिती: लाल चंदनाचे झाड IUCN (इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर) द्वारे लुप्तप्राय (Endangered) असुरक्षित श्रेणीत येते. सन २०१८ पासून याची नोंद धोक्याच्या वनस्पतीत झाली आहे. CITES च्या परिशिष्ट II मध्ये देखील ते सूचीबद्ध आहे. ज्याचा अर्थ निर्यात करण्यासाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे. जे केवळ व्यापारामुळे प्रजातींचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास प्रतिबंधित नसेल तरच दिले जावे.

लाल चंदन दुर्मिळ आणि निषिद्ध का आहे?
लाल चंदन खूप महाग आहे आणि विविध पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते. हे दक्षिण भारताच्या आंध्र प्रदेशातील जंगलांपुरते मर्यादित आहे. तस्करीच्या प्रक्रियेत लोकांचा बळी जातो. जंगलातील चोरांचा मोठा धोका आहे. अलीकडच्या काळात तस्करी आणि निर्यातीत वाढ झाल्यामुळे सरकारने लाल चंदनाच्या झाडाची वाढ बेकायदेशीर घोषित केली. वृक्षारोपण कायदेशीर आहे. परंतु सरकारी वनखात्यालाच ते विकत द्यावे लागते.

कर्नाटकसारख्या राज्यात स्थानिक पातळीवर चंदनाची लागवड करणे कायदेशीर आहे. वास्तविक वनविभाग सामाजिक वनीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चंदनाचे नमुने वितरीत करतो. आपण लाल चंदनाचे झाड वाढवू शकतो पण कापणीसाठी वनखात्याला कळवावे लागेल ते येऊन झाडाचे सर्वेक्षण करून वृक्ष तोडून नेतात आणी शेतकऱयाला किंमत देतात.

पवित्र लाल चंदन हा भारतीय वनस्पतींचा महत्त्वाचा भाग आहे. भारताचे नागरिक म्हणून आपण त्यांचे रक्षण केले पाहिजे. शिवाय, लाकूड माफिया अवैध वन्यजीव व्यापारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, जी मानवतेच्या दृष्टीने सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे.

आंध्र प्रदेशातील चित्तूरजवळील पानुगुरु येथे सन २०१८ मध्ये वन अधिकारी एम. श्रीनिवासुलू यांच्या हत्येमुळे या दुर्मिळ लाल चंदनाची बेसुमार वृक्षकटाई आणि तस्करी पहिल्यांदा चर्चेत आली. सुरुवातीला स्थानिक लोकांनी याचा उपयोग हिंदू देवतांच्या मूर्ती, फोटो फ्रेम्स, घरगुती बॉक्स, बाहुल्या बनवण्यासाठी केला. पण सन १९९४ नंतर या दुर्मिळ प्रजातीच्या वृक्षकटाईवर बंदी घालण्यात आली. इतकेच नव्हे तर आंध्र प्रदेशातून हे लाकूड बाहेर नेण्यासही मनाई करण्यात आली. आंध्र प्रदेशातून रक्तचंदनाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. रस्तेमार्गे, पाणी आणि हवा अशा तीनही मार्गांनी लाल चंदनाची तस्करी केली जाते. तपास टाळण्यासाठी, काही वेळा पावडरच्या स्वरूपातही तस्करी केली जाते. या लाकडांना चीन, जपान, सिंगापूर, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांमध्ये मागणी आहे. मात्र, सर्वाधिक मागणी चीनमध्ये आहे.

‘पुष्पा: द राईज’ (Pushpa: The Rise) हा तामिळ चित्रपट लाल चंदन तस्करीवर आधारीत आहे. भारतात विशेष ठिकाणी आढळणाऱ्या लाल चंदनाच्या (Red Sanders) लाकडाला खूप महत्त्व आहे. रक्तचंदनाच्या तस्करीवरुन मोठा रक्तपातही झाला आहे.

यापूर्वी जपानमध्येही याला मोठी मागणी होती जिथे लाल चंदनाचे लाकूड पारंपरिक वाद्य शमिशेन बनवण्यासाठी वापरले जात होते, पण आता ही परंपरा हळूहळू नष्ट होत आहे.

लाल चंदन लागवड तंत्रज्ञान: लाल चंदनाची शेती करून करोडो रुपये कमावता येतात. एक टन लाकडाचा भाव ऐकल्यावर विश्वास बसणार नाही. कमी पाण्यात तसेच कमी खतामध्ये आणि अत्यंत हलक्या प्रतीच्या जमिनीत येऊन बळीराजाला बक्कळ पैसा मिळवून देणारा वृक्ष म्हणजे रक्त चंदनाचे झाड. लाल चंदनाचा म्हणजेच रक्त चंदनाला बाजारात मोठी मागणी आहे शिवाय किंमत तर अवाढव्य अशी आहे. म्हणूनच याला अरण्यातील लाल सोने म्हणतात. लाल चंदनाचा उपयोग अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो सरबत बनवण्यापासून ते अत्तर आणि देवपूजेसाठी धूप आणि इतर सुद्धा अनेक उपयोग आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी: लाल चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात जोरदार मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या लाकडाला सुमारे २० – ४० लाख रुपये क्विंटल एवढा भाव मिळत आहे. त्यामुळं शेतकरी वर्गाने लाल चंदनाची शेती करणे फायदेशीर ठरणार आहे.

लाल चंदनाचे उपयोग: लाल चंदनाचा उपयोग अनेक ठिकाणी होतो.प्रामुख्याने लाल चंदनाचा वापर कोरीव काम, फर्निचर, खांब आणि घरासाठी तसेच वाद्ये तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. याचबरोबर लाल चंदनाचा उपयोग औषध निर्मितीसाठी तसेच सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

लागवडीसाठी उत्तम वेळ: चंदन लागवडीसाठी हवामान हे कोरडे उष्ण आवश्यक असते. तसेच ते चंदनाच्या वाढीसाठी चांगले मानले जाते. या दृष्टिकोनातून, भारतात त्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम वेळ मे ते जून मानला जातो.

लाल चंदन रोपांची किंमत: लाल चंदन लागवडीसाठी जास्त खर्च येत नाही. लाल चंदनाची रोपे तुम्हाला सरकारी किंवा खाजगी नर्सरी मध्ये अगदी सहजपणे मिळतात. लाल चंदनाच्या एका झाडाची किंवा रोपाची किंमत ही १०० – १६० रुपया पर्यंत असते. याचबरोबर लागवड करताना पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि तणापासून रोपांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.योग्य व्यवस्थापन करून शेतकरी वर्ग करोडो रुपये कमवू शकतो.

लाल चंदनाचे धार्मिक महत्व: देवी दुर्गाचा मंत्र लाल चंदनच्या माळेने जपला जातो. लाल चंदनाची माळ सकारात्मकता प्रदान करते. सुख, आरोग्य समृद्धी मिळण्यासाठी लाल चंदनाची माला घालावी. या लाल चंदन माळेने भगवती मां दुर्गाचे मंत्र जप केल्यास देवी प्रसन्न होते आणि आपल्या भक्ताची इच्छा आणि कीर्ति पूर्ण करते अशी धारणा आहे. जर मंगळ तुमच्या कुंडलीत दोष असेल आणि यामुळे तुम्हाला आयुष्यात त्रास होत असेल तर तुम्ही लाल चंदनाची माला वापरावी. यामुळे मंगळाचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात.

लाल चंदन परिणाम आपल्याला मानसिक शांती देते. रक्ताच्या चंदनच्या माळेने आई दुर्गाची पूजा केली पाहिजे. यामुळे मंगळ दोषही दूर होतात. विष्णू, राम आणि कृष्णाशी संबंधित जप साधण्यासाठी तुळशी आणि चंदनची माला वापरली जाते. यासाठी ‘ओम विष्णवे नमः’ या मंत्राचा जप करणे श्रेष्ठ मानले जाते. ही माहिती सामाजिक मान्यतेवर आधारित आहे.

फर्निचरपासून औषधापर्यंत रक्त चंदनाचा वापर व आर्थिक महत्त्व:
1. हे लाकूड आणि फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते.
2. खोडाच्या मध्यभागी असलेल्या लाकडाचा वापर हार्टवुड म्हणूनही केला जातो. लाल चंदनाचा उपयोग पचनसंस्थेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी, द्रव टिकवून ठेवण्यासाठी, खोकला आणि रक्त शुद्धीकरणासाठी केला जातो.
3. अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये फ्लेवरिंग म्हणून वापरले जाते.
4. चीन आणि जपानमध्ये वास्तुविशारद, हस्तकला, वाद्ये बनवण्यासाठी वापरले जाते.
5. कॉस्मेटिक, त्वचेची काळजी आणि सौंदर्य उत्पादने तयार करण्यासाठी वापरला जातो. डाग कमी करण्यासाठी खूप प्रभावी.
6. हे त्याच्या थंड गुणधर्मांसाठी देखील ओळखले जाते. याचा उपयोग सन टॅन आणि मंदपणा बरा करण्यासाठी केला जातो.
7. लाल चंदनाचा वापर त्वचा निगा आणि सौंदर्य प्रसाधनासाठी केला जातो.
8. या झाडाला सुंगध नसला तरीही या झाडाचे लाकूड मात्र फारच उपयोगी असते. किमती फर्निचर बविण्यासाठी या लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे या लाकडाला चीन, जपान, सिंगापूर देशात भरपूर मागणी असते. या झाडाला भरपूर मागणी असल्याने या झाडांची लागवड करून भरपूर नफा कमावण्यासाठीचा व्यवसाय वाढीस लागला आहे.
9. चंदनाच्या लाकडाप्रमाणे याचे लाकूड होम हवन विधीमध्येदेखील करण्यात येतो. याच्या नैसर्गिक रंगाचा सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी देखील उपयोग केला जातो. रक्त चंदनाचे विविध फेसपॅक बाजारात उपलब्द्ध आहेत. याच्या वापराने चेहऱ्यावरील त्वचा चमकदार आणि उजळ बनते.
10. साधारण लाकूड पाण्यात तरंगते पण याच्या उलट रक्त चंदनाचे लाकूड जास्त घनतेमुळे पाण्यामध्ये टाकले असता अजिबात तरंगत नसल्याने हे लाकूड ओळखण्याचा हा सर्वात सोपा मार्ग सांगितला जातो.

इतर उपयोग:
१) रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. मुकामार, शरीरावरील सूज यावर उपाय म्हणून रक्तचंदनाची बाहुली उगाळून, सहाणेवर पाणी घेऊन त्यावर उगाळून व त्याचा जाडसर लेप गरम करतात व सुजलेल्या भागावर लेप लावतात. मुकामार लागल्यामुळे त्या जागी सूज येऊन त्वचा लाल झाली असल्यास ठणके मारतात. अशावेळी रक्तचंदन सुजेच्या जागी लावतात व तो लेप वाळल्यावर त्यावर रुग्णास सोसवेल इतक्या गरम मिठाचा शेक देतात.
२) हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते.

रक्तचंदन हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे जसे:
1. कर्करोग विरोधी.
2. अँटीपायरेटिक.
3. अँटीहायपरग्लाइसेमिक.
4. विरोधी दाहक.
5. प्रतिजैविक.
6. मधुमेहविरोधी.
7. हेपॅटोप्रोटेक्टिव्ह. .
8. गॅस्ट्रो-संरक्षणात्मक.
9. लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ.
10. कामोत्तेजक.
11. डायफोरेटिक.
12. हायपरलिपिडेमियावर उपचार करते
रक्तचंदन हे फिनोलिक फायटोकम्पाउंड्समध्ये समृद्ध आहे जे अँटिऑक्सीडेटिव्ह आणि हायपोलिपिडेमिक क्रियाकलाप प्रदर्शित करतात आणि त्याद्वारे लिपिड संश्लेषण रोखून विविध प्रकारच्या पॅथॉलॉजिकल परिस्थितींपासून यकृत आणि हृदयाचे संरक्षण करतात.

13. पोटाच्या अल्सरवर उपचार करते आयुर्वेदानुसार पित्त दोषाच्या असंतुलनामुळे पोटात अल्सर होतो. रक्तचंदन हे शीत (सर्दी) आणि पित्त संतुलित गुणधर्मांनी समृद्ध आहे जे अल्सरची लक्षणे जसे की जळजळ, चिडचिड, जळजळ आणि रक्तस्त्राव टाळण्यास मदत करतात.

14. जखमांवर उपचार करतो रक्त चंदनचा रोपण (जखम भरण्याचा) गुणधर्म जखमा लवकर बरा होण्यास मदत करतो. रक्तचंदन ही अँजिओजेनिक क्रियाने देखील समृद्ध आहे जी आधीपासून अस्तित्वात असलेल्या रक्तवाहिन्यांमधून नवीन रक्तवाहिन्या निर्माण करण्यास मदत करते. रक्तचंदन आपल्या त्वचेच्या पेशींना पुरेसे पोषण देऊन त्वचेचे संपूर्ण आरोग्य सुधारू शकते. रक्त चंदनमधील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मुरुम आणि मुरुमांपासून बचाव करण्यास मदत करतात.

15. यकृत कार्य सुधारते रक्तचंदनची साल आणि हार्टवुड फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध असतात आणि यकृताचे रासायनिक-प्रेरित विषाक्ततेपासून संरक्षण करतात. रक्त चंदनची हेपॅटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म दीर्घकालीन यकृताच्या दुखापतीमध्ये हेपॅटिक फायब्रोसिस दाबते.

16. कर्करोगावर उपचार करतो कर्करोगाच्या उपचारात रक्तचंदनची भूमिका आयुर्वेदात मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली आहे. रक्तचंदन सायटोटॉक्सिक आणि अँटीकॅन्सर गुणधर्मांसारख्या बायोएक्टिव्ह यौगिकांनी समृद्ध आहे जे स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, कोलन कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि स्वादुपिंडाचा कर्करोग यांसारख्या विविध प्रकारचे कर्करोग बरे करण्यास मदत करतात.

17. मधुमेहावर उपचार करतो प्राचीन काळापासून हार्टवुड कपमध्ये पाणी पिण्याची आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथा आहे, ज्यामुळे मधुमेह बरा होतो. रक्त चंदनची साल रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते आणि मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे इन्सुलिन स्राव वाढवते.

18. संसर्गजन्य रोगांवर उपचार करते रक्तचंदन बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध आहे जे शरीरात बॅक्टेरिया आणि विषाणूंचा प्रवेश रोखण्यास मदत करतात.

19. जुनाट जळजळांवर उपचार करते रक्तचंदन हे दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे जे विविध दाहक परिस्थिती प्रभावीपणे बरे करण्यास मदत करते.

20. उच्च कोलेस्टेरॉलवर उपचार करते रक्तचंदन विशिष्ट अँटिऑक्सिडंट्सच्या समृद्ध सामग्रीमुळे उच्च कोलेस्टेरॉलचे व्यवस्थापन करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

21. आमांशावर उपचार करते रक्त चंदनचे तुरट आणि कोरडे गुणधर्म आमांशाचे सकारात्मक व्यवस्थापन करण्यास मदत करतात. 22. एडीमावर उपचार करते (सूज) रक्तचंदन अँटीऑक्सीडेटिव्ह, अँटीकॅन्सर, अँटीपायरेटिक, अँटीहाइपरग्लाइसेमिक, लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ, दाहक-विरोधी, प्रतिजैविक, प्रतिजैविक, हेपेटोप्रोटेक्टिव्ह आणि गॅस्ट्रो-संरक्षणात्मक गुणधर्मांनी समृद्ध आहे.

23.पिंपल्स होतील दूर: अनेकांना चेहऱ्यावर मुरुम होण्याची समस्या असते. कालांतराने त्यांचे रुपांतर काळ्या डागात होते अशा स्थितीत तुम्ही लाल चंदनाचा वापर करून या समस्येला मुळापासून दूर करू शकता. यासाठी एक चमचा लाल चंदन पावडर, चिमूटभर कापूर आणि एक चमचा हळद गुलाब जलमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्रभावित भागावर लावा. त्यानंतर सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय नियमित केल्याने पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते.

24.रक्त चंदनची शीत (थंड) आणि पित्त संतुलित गुणधर्म डोकेदुखीची लक्षणे टाळण्यास मदत करते आणि शांत प्रभाव सुनिश्चित करते. रक्तचंदनमचा उष्णकटिबंधीय वापर नेहमीच सुरक्षित असतो; तथापि, गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करवण्याच्या काळात रक्तचंदन वापरण्यापूर्वी आपल्या आयुर्वेदिक चिकित्सकाचा सल्ला घेणे चांगले.

धार्मिक कार्यात उपयोग
चंदनाच्या लकडाप्रमाणे याचे लाकूड होम हवन विधीमध्येदेखील करण्यात येतो.
● याच्या नैसर्गिक रंगाचा सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी देखील उपयोग केला जातो.
● रक्त चंदनाचे विविध फेसपॅक बाजारात उपलब्द्ध आहेत. याच्या वापराने चेहऱ्यावरील त्वचा चमकदार आणि उजळ बनते.

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात.
असा हा बहुपयोगी, पुष्कळ धन संपत्ती देणारा, औषधोपयोगी लाल चंदन वृक्ष.

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
१५.०९.२०२४

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 80 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on अरण्यातील ‘लाल सोनं’ : रक्त चंदन

  1. खूप माहितीपूर्ण ,अभ्यासपूर्ण सर्वोत्तम लेख…..माझ्या घरी पण रक्त चंदनाची बाहुली आहे … मुलं लहान असताना त्याचा खूप उपयोग होत होता….या लेखामुळे खूप उपयुक्त गोष्टी समजल्या…..धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..