नवीन लेखन...

भ्रष्टाचारावर उपाय आहे, पण तो करायची आपली तयारी आहे काय?

माझा मुंबईच्या ‘कमला मिल्स’ दुर्घटनेवर लिहिलेला ‘सौ मे से नब्बे बेईमान, मेरा भारत सच मे महान’ हा लेख उभ्या महाराष्ट्रात व्हायरल झाला. असंख्य लोकांनी मेसेज पाठवून, व्हाट्सॲपच्या माध्यमातून लेखातले मुद्दे मनापासून पटल्याचं कळवलं. या दोन-तिन दिवसांत हेच सांगणारे असंख्य फोनही आले. फोन करणारे समाजात ज्यांच्या मताला किंमत आहे असे होते तसंच सामान्य जनही होते. सर्वजण भडभडून बोलत होते. त्यांचे अनुभव सांगत होते. या सर्व सांगण्यात एकच मुद्दा समान होता आणि तो म्हणजे सामान्य लोकांच्या मनातला शासन आणि प्रशासन यांच्या विषयीचा दाटलेला प्रचंड संताप. आपल्या जीवावर निवडून आलेल्या राज्यकर्त्यांकडून आणि आपल्याच पैशांवर मिळणाऱ्या सातव्या-आठव्या वेतन आयोगाच्या पगारावर पोसली जाऊनही पुन्हा आपल्यालाच लुबाडायला तयार असणाऱ्या नोकरशाहीकडून आपण ‘डंके की चोट’पर नागवले जातोय हे कळतंय, पण आता नेमकं काय करावं, हे न कळल्याने निर्माण झालेल्या असहाय्यतेतून, सार्वजनिकयंत्रणाविषयीची सामान्य जनतेच्या मनातली पराकोटीची चीड मी गेले दोन-तिन दिवस अनुभवतोय. या सर्वाॅचा मला एकच प्रश्न होता, की हे संपणार आहे की नाही? संपणार असेल, तर कधी? आणि कसं?

आपल्या देशात जुनाट मुळव्याधीसारखा चिकटलेला भ्रष्टाचाराचा आजार आता बरा होणारच नाही, अशी अटकळ जवळपास सर्वांनी बांधली आहे. मला भ्रष्टाचारापेक्षाही, सामान्य जनतेची हा भ्रष्टाचार स्विकारण्याची मानसिकता जवळपास झालेली आहे, हे समाजासाठी जास्त धोकादायक वाटते. आपण मेंढरं आहेत, हे एकदा का आपण ठरवलं, तर मग आपला जन्म कापून घेण्यासाठीच आहे, हे ही आपण ठरवून टाकतो आणि मग अशावेळी अन्यायापुढे आपण गुमान माना पुढे करु लागतो, हे चिन्ह तर सामान्यांच्या आणि पर्यायाने देशाला सर्वनाशाकडे नेणारं आहे..!

खरंच, एखाद्या समस्येवर टिका करणं तसं सोपं आहे आणि त्या समस्येवर उपाय सुचवणं काहीसं अवघड. पुन्हा आपला देश, धर्म कोणताही असो, अध्यात्मावार विश्वास ठेवणारा. त्यामुळे कुणीतरी अवतार येणार आणि आपल्याला या इहलोकीच्या दु:खातून तारणार असा विचार करून त्या अवताराची वात पहायची, हे हे आपल्या समाज प्रकृतीला धरूनच आहे. तोवर आपण ‘ठेवीले अनंते तैसेची राहायचे’’ यावर गाढा विश्वास आणि मग त्या अवताराची वाट पाहात, पिढ्यान पिढ्या तैसेची राहून अन्याय सहन करत राहायचा, वर त्याला सहनशिलता, तितिंक्षा वैगेरे भारदस्त शब्दांचा अध्यात्मिक साज चढवायचा, ही आपली एकूणातली वृत्ती. अवतार येणार आणि आपल्याला तारणार या संकल्पनेवर ठाम असलेले आपण, ‘तुझ्या माझ्या जड देही, देव भरोनीया राही’ हे त्याच परमेश्वराने सांगीतलेलं आहे, हे नेमकं त्या कापायला तयार असलेल्या मेंढरासारखं ‘शिर झुकवोनीया’ राहीलेल्या अवस्थेत विसरतो आणि अन्याय सहन करत राहातो.

झुकलेल्या शिरातून खालच्या हृदयात दिसणाऱ्या स्वतःतल्या भगवंताला जागृत करायची आता गरज आहे. ‘आम्ही काय करणार’ हे ढोंग बंद करून आता प्रत्येकाने अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे, हे प्रत्येकाने ठरवून कंबर कसून मैदानात उतरणं गरजेचं झालंय, आणि आपण प्रत्येक जन आपापल्या जागी राहूनही हे नक्की करू शकतो. ‘कमला मिल्स’ दुर्घटना हे ज्या भ्रष्चाचाराचं फलीत आहे, त्या भ्रष्टाचारावर इलाज आहे आणि तो आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. अर्थात हा इलाज सोपा नाही, रोग आणि रोग्यापेक्षा इलाज करणारालाच, म्हणजे आपल्यालाच, या इलाजाचा त्रास जास्त होणार आहे, त्याची तयारी असायला हवी ही या इलाजाची पहिली आणि एक्मेंव अट आहे..

राजकीय नेते-कार्यकर्ते काय किंवा सरकारी अधिकारी काय, आपल्या सत्तेचा, अधिकाराचा दुरुपयोग करतात आणि भ्रष्टाचाराचा उगम यातूनच होतो, असं आपण समजतो. पान वास्तव थोडं वेगळं आहे. या सर्वांच्या भ्रष्टाचारात आपलाही कळत-नकळत सहभाग असतो. केवळ ते लोक पैसे खातात हे बालणं सोपं आहे, पण आपणच वेळप्रसंगी आपल्या सोयीसाठी त्यांना ते खायला देतो, हे ही तेवढंच खरं आहे हे विसरून चालणार नाही. देणारा असल्याशिवाय घेणारा कसा असेल? उदा. आपलं सरकारात काही तरी काम निघतं. अशावेळी आपण ते काम करुन घेण्याची रित किंवा नियम काय आहे, याची माहिती न घेता, तिकडे ‘कुणाची ओळख आहे का’ याची पहिली चौकशी करतो कारण नियमांपेक्षा ओळखीनेच कामं होतात, हा आपला अनुभव असते. अशी ओळख निघतेही. कधी ती थेट असते, तर बऱ्याचदा इनडायरेक्ट. थेट ओळख असल्यास नियम वाकवलेही जातात. ओळखीने काम होतंही बऱ्याचदा. आपलं असं डायरेक्ट काम झाल्याने आपल्या रजा, वेळ आणि त्रास सगळंच वादलेलं असतं आणि मग म्हणून कृतज्ञता म्हणून आपण त्या कर्मचाऱ्याला किंवा ज्यांने ओळख काढलेली असते अशा व्यक्तीला, काहीतरी देतो किंवा देण्याची इच्छा व्यक्त करतो. अगदी जवळची व्यक्ती असेल, तर किमान ओली-सुकी पार्टी तरी देतो. ही लांचच असते, याची जाणीव आपल्याला असते किंवा नसतेही. लांच द्यायची आणि घ्यायची सुरुवात अशी होते किरकोळ गोष्टीवरून होते.

वास्तविक ज्या कर्मचाऱ्याने वा अधिकाऱ्याने आपलं काम ओळख आहे म्हणून केलेलं असतं, त्या कर्मचारी वा अधिकाऱ्याने, त्याच प्रकारचं काम करण्यासाठी नियमाने रांगेतून आलेल्या इतर अनेकांचा क्रम डावलून ओळखीतून आलेल्या आपल्यासारख्यांना प्राधान्य दिलेलं असतं. हाच न्याय मग बिल्डर्स, मोठे कंत्राटदार, बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या यात लावला जातो. आपण कृतज्ञता म्हणून देत असलेली रक्कम किंवा पार्टी मग चढत्या क्रमाने वाढत जाते आणि भ्रष्टाचाराचा राक्षस विक्राळ स्वरुप धारण करत जातो आणि मग कॅश किॅवा काईंडमधे मोबदला दिल्या शिवाय कामं होत नाहीत, हे अनुभवायला येऊ लागतं. आपल्यामुळे इतर सामान्य माणसांवर अन्याय होऊन आपण लांचखोरीला प्रोत्साहन देतोय, याची जाणीव आपल्याला असते का? आणि असेल तर नियमानेच सर्व कामं करायची आपली आधी तयारी आहे काय, हे ही ठरवायला हवं. यात केवळ सरकारी कामंच येतात असं नव्हे, तर ट्राफिकचे नियम पाळणे, रस्त्यावर न थुंकणे, डोनेशन देऊन ॲडमिशन न घेणे या सारख्या गोष्टीही येतात. आपल्यापैकी कितीजण हे ठामपणे सांगू शकतील, की आम्ही वाहतुकीचा नियम न पाळल्यामुळे किंवा रस्त्यावर कचरा टाकला किंवा थुंकलो म्हणून नियमानुसार दंड भरला म्हणून? किंवा डोनेशन न देता ॲडमिशन घेतलं म्हणून ? बहुतेकजण अशा वेळी दंड करणाऱ्या अधिकाऱ्याला किंवा सरकारी कर्मचाऱ्याला चिरीमिरी देऊन पटवायचा प्रयत्न करतात किंवा कमी गुण मिळवूनही डोनेशनच्या जीवावर मनचाहा शाळा/काॅलेजात ॲडमिशन घेतात, हे खोट आहे काय? हे असं न करण्याची किती जणांची तयारी आहे? जे स्वतः नियम आणि कायदे पाळतात, त्यांनाच भ्रष्टाचारावर बोलायचा अधिकार आहे.

दुसऱ्याच्या स्वातंऱ्याचा न विचार करणं, आपल्यामुळे दुसऱ्यावर अन्याय होऊ देणे किंवा ‘मेरेको क्या करनेका है, मेरा तो काम हो गया’, माझी वरपर्यंत ओळख आहे, म्हणून मी नियम पाळणीर नाही ही वृत्ती वैगेरेसारख्या गोष्टीही भ्रष्टाचाराच्या अंतर्गत येतात. केवळ पैसे खाणं म्हणजेच भ्रष्टाचार अशी आपल्याला सोयीची व्याख्या जर आपण करत असू, तर आपण चुकतोय. सर्व प्रकारचा ‘भ्रष्ट आचार’ म्हणजे भ्रष्टाचारच..!

हे सर्व हळुहळू बंद होऊ शकतं, पण त्यासाठी मी नियम तोडणार नाही, चुकून तोडला गेला तर दंड भरेन, सर्व काम नियमानुसारच करेन, पैसे देऊन शोर्टकट मारायचा प्रयत्न करणार नाही, वशिलेबाजी/नेपाॅटिझमची कास धरणार नाही आणि हे करताना मला कितीही त्रास झाला तरी मी सहन करेन, या सारखे उपाय करायची किती जणांची तयारी आहे? जो पर्यंत आपल्यापैकी प्रत्येक जण स्वत:च्याअंतर्मनात प्रामाणिकपणे डोकावून पाहत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचाराचा राक्षस गाडला जाणार नाही..

भ्रष्टाचाराने किंवा वेड्या-वाकड्या मार्गाने पैसे मिळवून गबर झालेल्या व्यक्तींना, एका ठराविक वेळेनंतर ‘ओळखी’ची गरज भासत असते. त्याचलाठी तर अनैतिक पद्धतिने माया जमवलेले काही बडे अधिकारी राजिनामा देऊन किंवा निवृत्तीनंतर आणि बिल्डरांसारखे व्यावसायिक राजकारणात प्रवेश करताना आढळतात. भल्या-बुऱ्या मार्गाने व्यवसाय करून गबर झालेलेही नंतर ‘ओळखी’साठी राजकारणात प्रवेश करताना दिसतात. राजकारण हा हल्ली लायकीपेक्षा पैशांचाच खेळ झाल्याने आणि मुख्य म्हणजे यात किमान शैक्षणिक क्वालिफिकेशनची गरज नसल्याने, एकदम सोपं झालंय. राजकारणात शिरून समाजात आपली ‘ओळख’ निर्माण करणं एकदम सोपं जातं. बॅनर्समुळे तर हे काम आणखीनच सोपं झालंय. एखाद्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त किंवा परिसरातल्या आपल्याला आवडेल त्या कोणत्याही पक्षाच्या एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याची कुठल्यातरी फुटकळ मंडळावर निवड झाली तरी, आपला सोन्याने मढलेला, गाॅगल लावलेला मोठा फोटो लावून, खाली स्वत:लाच ‘समाजसेवक’ असं पद देऊन नाक्या नाक्यावर बॅनर लावले, की चार-पाचशे रुपयात चांगलीच प्रसिद्धी होते. ‘छापलेलं’ काही असलं तरी चटकन विश्वास ठेवायच्या आपल्या सवयीचा हे बॅनरबाज असा उत्तम उपयोग करून घेतात. हल्ली प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रत्यक्षात समाजसेवा करायलाच हवी, असं काही नाही.

बॅनरमुळे परिसरातल्या लोकांना एकदा का आपलं नांव माहिती झालं, की मग सामान्य लोकं यांना सोसायट्यांच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलावू लागतात, एखाद्या स्थानिक मंडळावर यांची कुठल्यातरी पदावर निवड होते, वृक्षारोपण, गरीबांना वह्या-पुस्तकं-छत्री-रेनकोट वाटपाचा कार्यक्रम, गल्ली-मोहल्ल्यातील बक्षिस समारंभ यांच्या हस्ते होऊ लागतो, यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य-रक्तदान शिबिरं भरवली जातात आणि असे लहान-मोठे कार्यक्रम करून मग हे लोक हळुहळू आपली ‘ओळख’ निर्माण करतात. ही ओळख मग त्यांना टप्प्या टप्प्याने नगरसेवक, आमदार, खासदार इतर पदांपर्यंत घेऊन जाते आणि मग अशा माणसांना आपोआप प्रतिष्ठा मिळू लागते.

वरील प्रकाराने ‘मोठं’ झालेल्या महात्म्यांना मग आपणच आसरा देतो. बऱ्याचश्या सार्वजनिक कार्यक्रमात अशांना मान मिळू लागतो. त्यांच्याकडून मिळणाऱ्या डोनेशनमुळे (अर्थातच कॅशमधे) यांची सार्वजनिक कार्यक्रमातली मागणी वाढू लीगते. पैसा भरपूर असल्याने मागेपुढे हुजरे कम पीए पळू लागतात आणि मग या मार्गे त्यांना हवी असलेली ‘ओळख’ मिळू लागते. अशा धेंडांनी मिळवलेला पैसा कोणत्या मार्गाने आलाय, याचा विचार आपल्या कोणालाच करावासा वाटत नाही. यांच्याशी आपले एकदम दोस्तीचे संबंध आहेत, असं सांगणही मग आपल्याला मोठेपणाचं वाटू लागतं. यांच्या ओळखीने आपलं छोटं-मोठं काम करून घ्यायलाही कुणालाच काही वाटत नाही. त्यांचा उद्देश अशा रितीने सफल होतो..

इथे मला सुचणारा दुसरा उपाय करता येतो. भ्रष्टाचाराने (यात सर्वप्रकारचा भ्रष्ट आचार आला. लांचखोरी हे त्याचं केवळ एक स्वरुप आहे.) प्रचंड पैसा जमवलेले जरी स्वर्गतुल्य घरात राहात असले, तरी राहातात समाजातचं. आपल्या अगदी शेजारीही अशी एखादी व्यक्ती राहात असते. त्यांच्या नोकरी/व्यवसायाबद्दल आपल्याला ‘सखोल’ माहिती असते आणि सहाजिकच त्यांच्या वरच्या-खालच्या ‘उत्पन्ना’बद्दलही. अशा लोकांना जर का आपण मान द्यायचा कमी केला किंवा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाशी आपण जेवढ्यास तेवढाच, म्हणजे फक्त हाय-हॅलोपुरताच- संबंध ठेवला आणि असं का, याचं कारण त्यांना कळेल अशी व्यवस्था केली, की बराच फरक पडू शकेल असं वाटतं. माणूस कळपात राहाणारा प्राणी आहे आणि मग तो प्राणी समाजात कोणत्याही नांवाने वा रुपाने वावरत असला तरी, जेंव्हा आपण कळपाच्या बाहेर ढकलले जातोय किंवा इतरजण आपल्याला टाळतायत हे जेंव्हा त्याच्या लक्षात येतं, तेंव्हा तो ते फार काळ सहन करू शकत नाही..

हे झालं सरकारी कर्मचारी/अधिकारी, उलट-सुलट धंदे करणारांबद्दल. गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकिय नेत्या कार्यकर्त्यांवरही हाच उपाय करता येऊ शकेल. जे राजकीय नेते-कार्यकर्ते पैसे खातात (कोण खात नाही हा संशोधनाचा विषय आहे म्हणा. पुन्हा ‘सिद्ध झालं तर’ हा ‘सिद्ध’मंत्र आहेच त्यांच्याकडे) असं आपल्याला ठामपणे माहित असतं (वाटलं नाही तरी ते नजरेला दिसतंच), अशा नेत्या कार्यकर्त्यांना आपल्या कोणत्याही कार्यक्रमात यांना पाहूणे म्हणून बोलवायचं आपण टाळू शकतो. कोणताही सन्मान, बक्षिस यांच्या हातून स्विकारायला जाहीर नकार द्याला हवा. ह्यांना साहेब, दादा, बापू, भाऊसाहेब(हे बहुतेक तलाठी/ तहसिलदारांसाठी राखीव नाम आहे.) इत्यादी बोलणं बंद करायला हवं. त्यांना रस्त्यावर रोज भेटणारांना जसं आपण हातानेच ‘बरं आहे’ असं म्हणून पुढे चालू पडतो, तेवढीच ओळख द्यावी. कोणत्याही कामासाठी यांच्या दरबारात जांऊन ताटकळत राहायचं बंद करून, आपलं काम आपणच नियमांनुसार करायचा प्रयत्न करायला हवा. असं केल्याने हे थोडेतरी जमिनिवर येतील अशी आशा आहे. त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांना लटकून ज्यांना मोठं व्हायचं आहे, त्यांना ते करु द्या पण आपण मात्र हे सर्व करायचं टाळायला हवं. त्यांनी भल्या बुऱ्या मार्गाने मिळवलेल्या मायेला समाजाकडून प्रतिष्ठा आणि ओळख मिळावी अशी त्यांची अपेक्षा असते आणि नेमकं तेच समाज नाकारतोय, असं दिसलं की मग ते सुधारतील अशी अपेक्षा आहे.

हे सर्व करताना जो अधिकारी किंवा सार्वजनिक नेता खरोखर प्रामाणिकपणे काम करतो आहे असं दिसतं (हे त्यांच्या राहाणीमानावरून सहज गिसतं), त्यांना मात्र मान द्यायला विसरू नका. खरं सांगायचं तर, असे अधिकारी/नेते समाजाच्या मानाची अपेक्षाही करत नाहीत, त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना ती उंची आपोआप प्राप्त करून देत असते, अप्रामाणिक मार्गान् जमवलेल्या मायावंतांना मात्र ‘ओळख’ आणि ‘प्रतिष्ठे’च्या कृत्रिम उंतीची गरज असते आणि तिच जर आपण समाज म्हणून नाकारली, तर काहीतरी फरक नक्की पडेल असं मला वाटतं..

भ्रष्टाचारावर मला सुचलेले काही मार्ग आपल्यासमोर ठेवले आहेत. ते अगदी प्राथमिक स्वरुपाचे आहेत आणि व्यावहारीक नाहीत, याची मला जाणीव आहे. यावर अधिक मंथन व्हायला हवं, असंही मला वाटतं. काही दुसरेही मार्ग आपल्याला सुचत असतील, तर त्यावर विचार करून ते त्वरीत अंमलात आणायला हवेत. असं करायला सुरुवात करायला मुहूर्ताची वाट पाहायला लागता कामा नये. आणि हे उपाय करताना त्याचा सर्वात जास्त त्रास आपल्यालाच होणार आहे, याची जाणीव ठेवायला विसरू नये. सर्व काही ठिक होऊ शकते, फक्त सामान्यजणांनी मनाचा निग्रह करायची गरज आहे. आणि स्वार्थाचा त्याग करून तो करायची किती जणाची तयारी आहे हा खरा प्रश्न आहे..!

— ©️ नितीन साळुंखे, मुंबई.
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..