६१. तुळशीला प्रदक्षिणा घालून तीर्थ म्हणून तुळशीचे पान घातलेले पळीभर पाणी पिणे ही आणखी एक लुप्त होत चाललेली भारतीय परंपरा आहे. आमच्या पिढीने निदान तुळशी वृंदावन तरी पाहिले आहे. नातवाची तिसरी पिढी ते पाहील की नाही याचीच शंका आहे. अर्थात ग्रामीण भारतात अजूनही अंगणात तुळशी वृंदावने आहेत. अंगण हरवलेल्या शहरी भागात मात्र जागा नसल्याचे आयते कारण मिळाले. ग्रामीण भागात फिरंग्यांचे वारे अजून पोचले नसल्याने तेथील जनता सुखी म्हणायची.
आणि
तुळशीला पाणी घालण्याचा आरोग्याशी धेट संबंध आहे, हे यापूर्वी सांगितले आहे.
मी पाश्चात्य संस्कृतीच्या एवढा विरोधात का, असा प्रश्न माझ्या काही मित्रांना, नातेवाईकांना पडला आहे. हा बदल राजीवभाईनी दिलेल्या दृष्टीकोनाचा आहे. प्रत्येक गोष्ट शिकायची असेल तर ती भारतीयत्वाच्या दृष्टीने अभ्यासायची सवय त्यांनीच लावली. आयुर्वेद देखील अशाच पद्धतीने शिकलो. नाहीतर आज आयुर्वेद देखील पाश्चात्य बुद्धीने शिकवला जातोय, त्याचा मी पण एक भाग झालो असतो. आणि रक्तदाबासारख्या अवस्थेत टेलमाला आयुर्वेदातील पर्याय शोधत बसलो असतो. आणि शुगर कमी करण्यासाठी मेटफाॅरमिनला हळद कारले आवळ्यासारखी औषधे किती गुणकारी असतात, हे चिवडत राहिलो असतो. पण माझे सुदैव असे की मी राजीवभाईच्या दृष्टीकोनातून आयुर्वेदाचा अभ्यास करत गेलो आणि माझे भारतीय विचार पक्के होत गेले.
प्रामाणिकपणे मी सांगतोय,
जे जे पाश्चात्य ते ते सर्व वाईटच, असे मी मुळीच म्हणत नाही. किंवा जे जे भारतीय ते ते सर्व योग्य आहे असेही मी म्हणत नाही. आपण काय होतो, आपले आरोग्य कुठे दडलेले होते, कुठे हरवत चालले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही मुद्दे माझ्या बुद्धीला पटत गेले, ते फक्त आपल्यासमोर मांडतोय.
देवाचे अस्तित्व आता पाश्चिमात्य मान्य करू लागले आहेत, त्यावर संशोधन करू लागले आहेत. त्यांच्या काही वेबसाईट देखील आहेत.
आज पुढची पिढी देवाला नमस्कार कशाला करायचा ? देवळात गेलेच पाहिजे का ?
असे प्रश्न विचारू लागली आहे. त्यांना काय उत्तरे द्यावीत, हे पहिल्या पिढीला सुचत नाहीत. कारण त्यांनी नीट शास्त्रीय कसोट्यावर ईश्वर अभ्यासलाच नाही. तसं करण्याची वेळ त्यांच्यावर कधी आलीच नाही.
मी एक निस्सिम ईश्वरवादी आहे. पण दैववादी नाही.
मी आस्तिक आहे. पण देव देव करत बसणारा नाही.
देव अस्तित्वात आहेच, यावर माझा ठाम विश्वास आहे,
ही माझी श्रद्धा आहे.
देव आहे म्हणून विज्ञान नाकारणारा पण नाही.
देव असला तर असेल, असलाच तर त्याला उगाच कशाला दुखवा, म्हणून भीतीपोटी त्याच्या पाया पडणारा नाही. हे पण वाचकानी लक्षात घ्यावे.
माझे विचार आपल्या पर्यंत पोचवण्यासाठी मी ज्या टेक्नाॅलाॅजीचा वापर करतोय ती वैज्ञानिकच आहे. पाश्चिमात्यांनी त्यावर आधुनिक तंत्राचा वापर करून अधिक संशोधन केले आहे.
ज्या आधुनिक तंत्राचा वापर करून शास्त्राची पुनर्रचना ते करीत आहेत, त्या यंत्रातील दोष त्यांच्याही लक्षात येत आहेत. ते डोळस बुद्धी वापरून त्याच्या मर्यादांचा मानदेखील राखत आहेत. ही विज्ञानावरची श्रद्धा आहे.
पण हे अजून भारतासारख्या विकसनशील देशातील सुशिक्षित साक्षर जनतेला पण कळत नाहीये, ही विज्ञानावरची अंधश्रद्धाच आहे.
ती किती आणि कुठे वापरायची ते वापरणाऱ्याच्या बुद्धीवर अवलंबून असते. कृपया जातीयतेचे रंग याला देऊ नका. ते पाप आहे. अर्थात पापपुण्यच जे मानत नसतील, त्यांच्यासाठी हे लेखन नाहीच आहे.
ज्यांना हे विचार पटत नसतील, त्यांनी हे विचार वाचू नयेत, डिलीटचं बटन तुमच्याच हातात आहे. पण आपल्या पुढील पिढीला भारताचा खरा इतिहास काय होता, हे समजले तरी पाहिजे. असा विचार करून तर पहा.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
—
३ मार्च २०१८
आजचा आरोग्य विचार – भाग 32
नाही ,
भाग 31 , दोन वेळा आला आहे