दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अरसिबो दुर्बीण कोसळली… वेस्ट इंडिजच्या परिसरातील प्युर्तो रिको या बेटावर असलेली ही जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बीण कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून यापूर्वीच व्यक्त केली गेली होती! या दुर्बिणीच्या ३०५ मीटर व्यासाच्या तबकडीवरून परावर्तित होणारे रेडिओ किरण या तबकडीपासून सुमारे दीडशे मीटर उंचीवर असणाऱ्या साधनांद्वारे टिपले जात होते. ही साधनं ज्या सांगाड्यावर बसवली होती, त्या नऊशे टन वजनाच्या सांगाड्याला तोलणारे दोरखंड तुटून हा सांगाडा तबकडीवर कोसळला आणि दुर्बिणीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली.
१९६०च्या दशकात उभारल्या गेलेल्या या दुर्बिणीत आणि तिच्यावरील विविध उपकरणांत वेळोवेळी दुरुस्त्या आणि सुधारणा केल्या गेल्या. परंतु, दुर्बिणीवरील सांगाडा तोलणारे दोरखंड हे काळानुरूप खराब होत होते. तसंच २०१४ सालच्या जानेवारी महिन्यातील भूकंपामुळे आणि २०१७ सालच्या चक्रीवादळामुळेही या दुर्बिणीच्या बांधणीवर परिणाम झाला होता. त्यानंतर या दुर्बिणीवरचा एक दोरखंड गेल्या ऑगस्ट महिन्यात एक आणि तर आणखी एक दोरखंड नोव्हेंबर महिन्यात तुटला. आता जर यापुढे आणखी दोरखंड तुटले तर पुर्ण सांगाडाच तबकडीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसंच या अवस्थेतील दुर्बिणीची दुरुस्तीही शक्य नव्हती. त्यामुळे दुसरा दोरखंड तुटल्यानंतर, या दुर्बिणीचा वापर बंद केला जात असण्याची घोषणा, या दुर्बिणीची मालकी असणाऱ्या, अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन या संस्थेनं केली. त्याचबरोबर या दुर्बिण विविध भाग कसे वेगळे करायचे, याचा विचारही सुरू झाला. परंतु, दुर्बीण उतरवण्याचा हा विचार सुरू असतानाचा या दुर्बिणीवरली साधनं ज्यावर बसवली आहेत तो सांगाडा खालील तबकडीवर पूर्णपणे कोसळला व दुर्बिणीचं आयुष्यच संपुष्टात आलं.
प्युर्तो रिकोवरील डोंगराळ भागातील एका घळीत उभारलेल्या या रेडिओ दुर्बिणीची बांधणी १९६३ साली पूर्ण झाली. त्यानंतरची पाच दशके ही दुर्बीण एकाच तबकडीचा वापर करणाऱ्या दुर्बिणींमध्ये सर्वांत मोठी दुर्बीण ठरली होती. या प्रचंड दुर्बिणीनं रेडिओ खगोलशास्त्रात मोठी कामगिरी केली आहे. बुध आणि शुक्राच्या पृष्ठभागाचे सविस्तर नकाशे याच दुर्बिणीद्वारे तयार केले गेले, तसेच बुधाचा स्वतःभोवतीच्या प्रदक्षिणेचा ५९ दिवसांचा काळही याच दुर्बिणींद्वारे मोजला गेला. स्पंदनांच्या स्वरूपात रेडिओलहरी उत्सर्जित करणाऱ्या, स्पंदक ताऱ्यांच्या जोडीच्या निरीक्षणांद्वारे गुरुत्वीय लहरींचा अप्रत्यक्ष पुरावा याच दुर्बिणीनं मिळवून दिला. स्पंदक ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध याच दुर्बिणीद्वारे सर्वप्रथम लावला गेला.
रेडिओ खगोलशास्त्राच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अरसिबो दुर्बिणीच्या निकामी होण्यानं खगोलशास्त्रज्ञ अत्यंत व्यथित झाले आहेत. कारण अरसिबो दुर्बीणीचा शेवट झाल्यानं खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळातील रेडिओस्रोत यांच्यात संवाद साधून देणारा एक महत्त्वाचा दूवा नष्ट झाला आहे!
चित्रवाणी:
https://www.youtube.com/embed/b3AASKr_iHc?rel=0
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: SPACE.com / Twitter
Leave a Reply