व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात, तसेच तितकेच अनुभव होतील आणि जेथे भिन्नता तेथे अनेक मार्ग वर्णीले जातील.
कोणते तत्वज्ञान मला ह्यातून मिळाले, ईश्वर दर्शनाच्या प्रयत्नाचा शेवट, एक भव्य दिव्य अनुभवाच्या रुपांतच मिळणार. जर मी तसाच अनुभव मला प्राप्त व्हावा ही संकल्पना केली, ध्येय आखले तर ते कदाचित पूर्ण होणार नाही. कारण शेवटी अनुभवांतील भिन्नता, माझ्या ध्येयाआड येईल, त्याच क्षणी मात्र साशंकता मनांत येवू लागते. जर ‘ फक्त विश्वास ठेवा, प्रयत्न करा ‘ हा कुणी संदेश दिला, तर मात्र अंधश्रद्धा हीची निर्मीती होईल व ती भरकटत घेवून जाईल. काही तरी ऐकले, काहीतरी वाचले, काही तरी समजणे झाले, हे ते होईल. केवळ त्या विचारातील भव्यता, दिव्यता मनाचा कोंडमारा करेल. मग ते त्याच विचारांना सत्याची झालर लावून, व्यक्त केले जात असल्याचे होईल. अनिश्चित ध्येय हे महान तत्त्वज्ञानाची वस्त्रे धारण करेल.
मग मी काय करावे. मी एक सामान्य व्यक्ती आहे. साधा विचारक आहे. कोणाच्यातरी महान तत्वज्ञानासमोर झुकणारा. त्यांचे विचार मानणारा. कारण त्या त्या व्यक्तीने परिश्रम केलेले असतात. प्रयत्न केलेले असतात. जीवनातील सारे तन, मन, धन, परिश्रम त्याने खर्च केले असते. आपले सर्व आयुष्य त्या संकल्पनेच्याच ध्येयात घातले असते. हे सारे मी बघीतले असते. त्या ठराविक महान व्यक्तीविषयी मी समजलेलो असेन. मी त्याचे सारे श्रमसाध्य घेऊन, त्याच्याच विचाराने, मार्गदर्शनाने माझा मार्ग निश्चीत करु इच्छितो. मग कोठे चुकले? एखादा व्यक्ती अ, आ, ई हे शब्द घेवून अभ्यासास सुरुवात करते, प्राथमिक धड्याचा आधार घेत घेत पुढे एखाद्या प्रांतात डॉक्टरेट करते. याचाच अर्थ ती आपले सारे आयुष्य तीच्या ध्येयासाठी पणाला लावते. तीला एक प्रकारची मान्यता मिळते. मला जर तेच हवे असेल, तर माझी वाट त्याच्या प्रमाणेच प्राथमिक पासून शेवटपर्यंत तशाच प्रकारे असेल. सार आयुष्य खर्च होईल. नाही – मी त्याच्या प्राप्त शेवटच्या धाग्याला धरुन पुढे जाऊ इच्छितो. त्याचप्रमाणे प्रयत्नाने त्याला दाद देत, तोच मार्ग पुढे घेवून जाण्याचे ठरवितो. ह्यात माझे प्राथमिक श्रम वाचतात व वेळही. कारण आयुष्य मर्यादेचे आहे.
हा! थांबा – – थोडा विचार करा! हेच जीवनाच्या वाटचालीमधले अत्यंत महत्त्वाचे व निर्णयपूर्व वळण असते. तेच तुम्हांला श्रमाकडे अथवा अंधश्रद्धेकडे घेवून जाणारे सिद्ध होईल. कारण यातील गोष्ट आहे की हा त्या महान व्यक्तीचा आपला अनुभव, आपला साक्षात्कार असेल. ह्यासाठीचे हे त्याचे आपले प्रयत्न असतील व त्यासाठी त्यांनी तयार केलेली वाट, ही देखील त्याचीच असेल. त्याच वाटेवरुन जावून कुणासही खऱ्या अर्थाने काहीच साध्य होणार नाही. त्याचा वैचारिक बांध, हा त्याच्या मनातून – नव्हे अंतःकरणातून निर्माण झालेला होता. मन म्हटले की भिन्नता येतेच, हाच तर निसर्गाचा चमत्कार नव्हे का?
Leave a Reply