” अर्थ ” संकल्प
अर्थ आहे .
१ फेब्रुवारी २०२० रोजी आपल्या संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आणि अर्थसंकल्पाला अर्थ निश्चितच आहे.
अर्थाचे काय ?
भाषाशास्त्र असं सांगते की शब्दाचा अर्थ लावावा तसा लागतो .
दिल्या शब्दाचा दिल्या परिस्थितीत एक अर्थ असू शकतो आणि वेगळ्या परिस्थितीत वेगळाही असू शकतो .
काही काही वेळा तर एकाचवेळी एकाच गोष्टीचे एकापेक्षा जास्त अर्थ लावता येतात ….
कधी ते लावणाऱ्यावर अवलंबून असते ,
तर कधी लागण्यावर ….
शब्दाचा अर्थ हो !
आणि आजकाल तर काय अर्थसंकल्पात एकवेळ अर्थकारण नसेल ; पण भाषा आणि राजकारण हमखास असते . किती वेगवेगळ्या भाषेतील साहित्यिक हजेरी लावत असतात अर्थसंकल्पीय भाषणांत !
ऐकणाऱ्याला त्याचा अर्थ कळणार नाही याची इतकी खात्री असते की केवळ काव्यपन्क्ति म्हणून थांबत नाहीत …त्याचा अर्थ ही सांगतात …आता तो सभाग्रुहात उपस्थित सदस्यांसाठी आणि सदस्यांना सांगितला जातो की देशभर पसरलेल्या पण रेडियो – दूरदर्शनवर अर्थसंकल्पीय भाषण ऐकणाऱ्या- पाहणाऱ्या श्रोत्यांना आणि श्रोत्यांसाठी सांगितला जातो की आणखी कोणाला ?
….आता याचा अर्थ ही वेगवेगळा लावता येतो ना ?
पण असं काहीतरी मनात येत असताना पटकन एक अर्थ माझाच मला असा लागला की एक दाक्षिणात्य कवी याबाबत असा काही नशीबवान आहे की गेल्या ३२-३५ वर्षांच्या अर्थसंकल्पात त्यांचा उल्लेख अनेकदा आला आहे …मग सरकार कोणत्याही राजकीय रंगसंगतीचे असो आणि अर्थमंत्रीही कोणीही असो ….साहित्य हे राजकारणाच्या पलीकडे आहे आणि असते असा त्याचा अर्थ असू शकतो ना ! ! !
पण असं भाग्य आपल्या मराठी साहित्यिकांच्या नशिबी नाही हाही त्याच अर्थाचा दुसरा भाग आहेच की !
आता पहा ना !
अर्थसंकल्प सादर झाल्यापासून त्याचा अर्थ लावण्यात मंडळी अशी काही बुचकळ्यात पडली आहेत की या अर्थसंकल्पाचे हिरिरीने समर्थनही नाही आणि कडाडून टीकाही नाही ! !
अडीच तास भाषण करून आणि त्यानंतर तरीही थोडा भाग वाचलाय असं समजा असं सांगत अर्थसंकल्पीय भाषण ऐकणाऱ्याला असं आणि इतके काही दमवून टाकायचे की त्याच्यात आधी अर्थ लावायची आणि नंतर तो मांडण्याची ताकदच शिल्लक ( च ) ठेवायची नाही असा या लांबरुंद भाषण करण्यामागे उद्देश होता किंवा आहे असा तर त्याचा अर्थ नव्हता ना !
आणि तसं असेल तर आता कालांतराने या अर्थसंकल्पाच्या तरतूदी असलेल्या आणि नसलेल्या गुणवैशिष्ट्ये उलट्या – सुलट्या , वांछित – अवांछित चर्चेत अडकू नाहीत म्हणून अर्थसंकल्पावरून आणि एकंदरीतच अर्थकारणावरून दुसरीकडेच लक्ष वेधण्यासाठी रामजन्मभूमी न्यासाच्या स्थापनेची घोषणा आत्ताच झाली असा अर्थ लावायलाही कोणीतरी कमी पडणार नाही कदाचित ! ! ! !
हा अर्थसंकल्प असं सांगता झाला की आयुर्विमा महामंडळाच्या ( एलआयसी ) काही शेअर्सची सार्वजनिक विक्री करण्याचा सरकारी मानस आहे . अशी विक्री करून मगच जणू काही अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करायला संसदेत आल्या असा काहींनी अर्थ लावला .
इतकी वर्ष सरकार एअर – इंडियाच्या शेअर्सची विक्री करण्याचा प्रयत्न करत असूनही एक हरीचा लाल पुढे येत नाहीये हा अर्थ नाही आठवला कुणाला ?
तोट्यातल्या कंपनीचे – सदा सर्वकाळ सरकारकडे पैसे मागणाऱ्याचे शेअर्स कोणीतरी घेईल का ? स्थानिक किंवा विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार तर सोडाच ; तुम्ही -आम्ही तरी घेऊ का ? त्यातून डिसइन्वेस्टमेंटचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण कसे होणार हा अर्थ का नाही कोणाला आठवला ? त्यातून सरकारला कोंडीत पकडण्याच्या हेतूने असा अर्थ राजकीय पक्षांना न आठवणे आणि आठवला तरी तसे शब्दबद्ध न होणे हे सहज समजन्याजोगे आहे हा अर्थ मात्र त्यातून आपसूक बाहेर येतो .
पण ज्या प्रमाणात डिसइनवेस्टमेंटचे उद्दिष्ट गाठणे मागे पडत राहील त्याप्रमाणात कर – रचनेत विपरीत बदल होत राहण्याची शक्यता वाढत राहते हा अर्थ तुमच्या – माझ्यासारखा सर्वसामान्य नागरिक विसरू शकतो का ?
खरं म्हणजे , हा अर्थ एक अर्थव्यवस्था म्हणूनही विसरणे परवडणारे आहे का ?
आयआरसीटीसीच्या शेअर्सची यशस्वी आणि सर्वानाच फायदेशीर अशी विक्री हा अर्थ आठवला नाही का कुणाला ?
अशा पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर होण्याच्या एकच दिवस आधी फक्त एका दिवसात या संस्थेने तब्बल १२३० कोटी रुपये विमा – हप्त्यापोटी ( विमा शब्द अर्थ लावण्याआधी आवर्जून लक्षात घ्या .) आजच्या बाजारातही गोळा करू शकणाऱ्या एलआयसी चा असा उल्लेख होताना हा अर्थ का नाही आठवायचा ?
संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणात एलआयसीच्या किती शेअर्सची विक्री करण्याचा सरकारी इरादा आहे याचा उल्लेख नाही याचा अर्थ समजून घ्यावा असं नाही का वाटले ?
काही वर्षापूर्वीच्या अर्थसंकल्पीय भाषणात सार्वजनिक क्षेत्रातील ४ सर्वसाधारण विमा कंपन्यांचे ( जनरल इन्शुरन्स कंपन्या ) आधी विलीनीकरण आणि मग या विलीन कंपनीच्या शेअर्सची विक्री करण्याचा उल्लेख होता . अशी विक्री होणे तर सोडाच ; असं विलीनीकरण सुद्धा आजपर्यंत झालेले नाही याचा अर्थ इथे आठवावा असं नाही का वाटले ?
त्यामुळे केवळ अर्थसंकल्पात आज सांगितले म्हणून उद्या का तुम्हांला – मला शेअर्स मिळणार आहेत एलआयसीचे ?
कोणत्याही परिस्थितीत आजच्या आयुर्विमा महामंडळाचे संपूर्ण खाजगीकरण होणार नाही …निदान पहिल्याच टप्प्यात तर नक्कीच नाही हा सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ अर्थ नजरेआड करता येईल का ?
आणि जर असा अर्थ दुसऱ्या टोकाला न्यायचा असेल तर आयआरसीटीसी आणि एलआयसी या कंपन्यांच्या व्यवहारात साम्य किती आणि फरक किती या अर्थाने या मुद्द्याचा विचार करावा असं का कोणाला वाटत नाही ?
आणि हेच समीकरण उपयोगात आणायचे असेल किंवा आणले जात असेल तर या साखळीतली पुढची कडी कोणती कंपनी किंवा कंपन्या असू शकतात अशा अर्थाने या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करावे असं अर्थसंकल्पाच्या समर्थकांनाही ( विरोधक सोडून दिले तरी ) का सुचत नाही ?
असा एकदा विचार करायला लागले की लक्षात येते की आयआरसीटीसी आणि एलआयसी या दोन्ही कंपन्या सरकारी मालकीच्या आहेत .
दुसरे म्हणजे या दोन्ही कंपन्या सरकारी मालकीच्या आहेत म्हणून किंवा असूनही लोकप्रिय आहेत .
तिसरे म्हणजे या दोन्ही कंपन्यांची लोकप्रियता ही वयोगट -निरपेक्ष , लिंग – निरपेक्ष , स्थल – निरपेक्ष , काल – निरपेक्ष , स्थिती – -निरपेक्ष आहे .
चौथे म्हणजे या दोन्ही कंपन्या सातत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्यवहार करत असतात .आणि तरीही त्यांच्या व्यवहारात अडचणी फारशा येत नाहीत .
पाचवे म्हणजे या दोन्ही कंपन्या पराकोटीच्या तंत्र -कुशल ( टेक्नॉ-स्वहि) आहेत . त्यातून उद्या या कंपन्यांचा व्यवहारांची पातळी वाढली तरी अडचण नाही .
सहावे म्हणजे या दोन्ही कंपन्यांची तंत्रकुशलता इतकी सिद्ध झाली आहे की यांचे server दगा देत नाहीत . …अमेझोनचा ३१ डिसेंबरला देतो तसा . ..
सातवे म्हणजे या दोन्ही कंपन्यांनी निदान आजपर्यंत तरी एकाचा माल दुसऱ्याला देण्याची गल्लत केलेली नाही .
आठवे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या दोन्ही कंपन्यांनची कामकाज – पद्धतीच ( -बिझिनेस – मॉडेल अशा अर्थाने ) अशी आहे की यांत बुडीतखाती व्यवहार होण्याची सूतरामही शक्यता नाही . कारण ग्राहकाकडून पैसे जमा झाल्याशिवाय ना आयआरसीटीसी तिकीट देते ना एलआयसी विमा – योजना देते .
या सगळ्या घटकांमुळे जसे आयआरसीटीसीच्या शेअर्स – विक्रीला यश मिळाले …सरकार , कंपनी , गुंतवणूकदार , शेअरबाजार आणि एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्र असं सगळ्यांसाठी …तसं एलआयसीचे आहे …हा खरा अर्थ आहे या अर्थसंकल्पाचा .
त्यामुळे याची पुढची कडी किंवा कड्या कोणत्या हे पाहाण्यासाठि एकतर माझ्या भाषणाला या नाहीतर माझ्या पुढच्या लेखांची वाट पाहा .( हा या लेखाचा अर्थ आहे .)
या अर्थसंकल्पाचा दुसरा अर्थ असा आहे कि मोदी अर्थकारणात महत्वाच्या आर्थिक घोषणा अर्थसंकल्पात कमी आणि अर्थसंकल्पाबाहेर जास्त होतात . हा योगायोग असतो , आपद – धर्म असतो कि कारभाराची शैली असते असा प्रश्न पडणे हा या अर्थसंकल्पाचा एक अर्थ आहे . ही या अर्थसंकल्पावरची टीका नाही . सध्याच्या अर्थकारणाचे स्वरूप पाहाता उपाय – योजनेसाठी अर्थसंकल्पापर्यन्त थांबणे अनेकदा शक्य होणार नाही हे जरासूद्धा विसरता येणार नाही असाही या अर्थसंकल्पाचा अर्थ आहे . याची उदाहरणे आणि त्यांची सविस्तर चर्चा माझ्या ” मोदी अर्थकारण : नीती आणि रणनीती ” या मोरया प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या माझ्या पुस्तकात केली आहे . सध्या या पुस्तकाची दुसरी आव्रुत्ती सुरू आहे ….दोन महिन्यात दुसरी आव्रुत्ती )
पण तरीही काही गोष्टी ज्या अर्थसंकल्प सादर झाल्यापासून अवघ्या १० दिवसांत सांगितल्या त्या तसही अनावश्यकपणे लांबलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगता आल्या नसत्या का आणि त्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगणे जास्त योग्य आणि उचित ठरले असते अशी शंकेची पाल चुकचुकणे हा या अर्थसंकल्पाचा अर्थ आहे ? ” तुझं आहे तुजपाशी ; परंतु जागा चुकलाशी ” असं आहे का ?
उदाहरणार्थ ….GST च्या अंमलबजावणी नंतर अप्रत्यक्ष कर हा विषय आता केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अखत्यारीत राहिला नसून GST council चा विषय बनला आहे हे एकदम मान्य . पण यापुढे GST चे दर आणि फॉर्म्स यापुढे एका आर्थिक वर्षात एकदाच बदलण्यात येतील हे अर्थसंकल्पानंतर दहाच दिवसांत एका व्रुत्तपत्रीय मुलाखतीत सांगण्यापेक्षा अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले गेले असते तर जास्त बरं वाटले असते इतकेच ! कि एकंदरीतच ” स्थानमहात्म्य ” या गोष्टीला फारसे महत्व न देता ” कालमहात्म्य ” या गोष्टीला प्राधान्य द्यावे असा तर या अर्थसंकल्पाचा तिसरा ” अर्थ ” नाही ना ?
या अर्थसंकल्पाचा चौथा अर्थ असा तर नाही ना कि मोदी अर्थकारणात पारंपरिक उत्पन्न अपारंपरिक क्षेत्रांसाठी उपयोगात आणले जाईल ( मी वापरले जाईल असे मुद्दामून म्हणलेले नाही . कारण वापरले जाणे या शब्दाला मराठीत अनेकदा नकारात्मक तर्हेने घेतले जाते आणि ते व तसं मला इथे जरासुद्धा अभिप्रेत नाही ) आणि अपारंपरिक स्त्रोतातून उत्पन्न मिळवण्यावरही तितकाच भर दिला जाईल ?
ब्लू एकॉनमी , वॉटरवेज , होर्टिकल्चर , स्पेस अशी अनेक उदाहरणे या संदर्भात घेता येतील . अशा प्रयत्नांत असणारे सातत्य हा या अर्थसंकल्पाचा अर्थ आहे .
याचा सविस्तर उहापोह माझ्या ” केल्याने देशाटन ” आणि “मोदी अर्थकारण : नीती रणनीती ” या मोरया प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांत आहे .
अगदी असाच प्रकार या अर्थसंकल्पात सांगण्यात आलेल्या वैयक्तिक आयकराच्या दराबाबतही आहे का ? असा प्रश्न पडणे हा या अर्थसंकल्पाचा अर्थ आहे का ?
एकाचवेळी एकापेक्षा जास्त पद्धतीच्या आयकर कर – रचना हा आर्थिक समंजसपणाला सलाम करत आर्थिक लोकशाहीकडे वाटचाल करायला सुरवात आहे असा या अर्थसंकल्पाचा अर्थ आहे ? तसं असेल तर आर्थिक सुधारणा कार्यक्रमाचा ३० वा वाढदिवस साजरा करण्याचा हा चांगला मार्ग आहे हे नक्की !
पण ही आर्थिक लोकशाही तुमच्या – माझ्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांनी – करदात्यानी कशी अंमलात आणायची हा खरा प्रश्न आहे . हे स्पष्ट नसेल तर इथेही आपल्या मतदानाचे प्रमाण कमीच राहील कि काय ?
नवीन कर – प्रणालीचा पर्याय कोणाला आणि कसा आणि केंव्हा उपयोगी पडेल हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे .तरीही बदलत्या अर्थकरणात अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू वयोगट आणि भूगोल असा दोन्ही अर्थाने बदलतो आहे हे स्पष्टपणे हा अर्थसंकल्प सांगतो हा त्याचा अर्थ आहे . आता तो कितपत रूचेल – पचेल हे सांगणे अवघड आहे . पण आहे हे असे आहे.
जो प्रकार वैयक्तिक आयकरात ; तोच प्रकार लाभांश कराबाबत ( डिव्हिडण्ड डिस्ट्रिब्यूशन टक्स ) . तसा हाही एका स्वतंत्र लेखाचा आहे. पण त्या अर्थाचा एक शब्द ही न उच्चारता सरकारी उत्पन्नात एकापेक्षा जास्त मार्गाने एकाच तरतूदीतून जास्त रक्कम मिळवण्याचा हा डोकेबाज आणि अफलातून मार्ग आहे हा या अर्थसंकल्पाचा अर्थ आहे .
या अर्थसंकल्पात अर्थ आहे .
अर्थात आहे .
अर्थातच आहे .
असलाच तर प्रश्न इतकाच आहे की त्या अर्थाला पूर्णविराम आहे कि उदगार – चिन्ह आहे कि प्रश्न – चिन्ह ….
अलीकडे मला असं फार वाटायला लागले आहे कि आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था गतीशील ( डायनामिक अशा अर्थाने ) झाली आहे ; विचारसरणी किंवा विचारधारा मात्र अजून काही प्रमाणात तरी स्थितिशिल ( स्टटिक अशा अर्थाने ) आहे .
त्यामुळे हाच असं नाही तर कोणत्याही अर्थसंकल्पातून ” अंतर ” आणि ” फरक ” यातली शब्द आणि अर्थ आणि परिणाम या तिन्ही अर्थाने तफावत कळत राहते ….हा तो “अर्थ ”
” अर्थ ” संकल्प : अनेक अर्थ ….काही लागलेले , काही न लागलेले ; काही लावलेले , काही न लावलेले .
— चन्द्रशेखर टिळक
११ फेब्रुवारी २०२०
Leave a Reply