झिपऱ्या आज भलताच खुशीत होता, कारण कधी नव्हे ते त्याला अनेक नेते भेटले होते, आणि त्या सगळ्यांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून चॅनेलवाल्यांच्या माईक समोर बाईट देण्यासाठी उभे केले होते . टीव्हीच्या पडद्यावर दिसणार म्हणून तो भलताच खुशीत होता.
सगळ्या विरोधकांनी मिळून तयार केलेले अनेक मुद्दे त्याच्या हातात होते . त्याने कागदावर नजर टाकली .
मुद्दे तसे बरेच होते, काही कळत होते, काही डोक्यावरून जात होते. तरीही चिकाटीने तो वाचत राहिला…
…हा अर्थ संकल्प विनाशकारी आहे, यामुळे अनेकांचे डोळे पांढरे होणार आहेत.
…सर्वसामान्यांना सर्वच गोष्टी मोफत मिळतील याचा उल्लेख नाही, वीज, शिक्षण, सर्व प्रकारची कर्ज, घर,जमीन, पेट्रोल,अन्न प्रवास,कपडे ( हे सगळं मोफत )आणि घरात आयतं बसून खायला दरमहा आळसभत्ता यात दिलेला नाही.
तो अमलात येण्यासाठी कायदा व तदनुषंगिक खर्चाची तरतूद नाही.
…सरकार विरोधी आंदोलन करण्यासाठी सरकारनेच हत्यारे, दगड,बॉम्ब काठ्या इ खर्चाची तरतूद नाही .
…समाजात भेदभाव निर्माण करणाऱ्यांसाठी, जातीभेद निर्माण करण्यासाठी, भारताचे तुकडे करू म्हणणाऱ्यांसाठी , सैनिकांवर दगडफेक करणाऱ्यांसाठी कुठल्याही पुरस्काराच्या खर्चाची तरतूद नाही .
…अनैतिक, बेकायदेशीर,भ्रष्टाचारी आणि देशविघातक कृत्ये करून तुरुंगात जाणाऱ्यांसाठी पंचतारांकित व्यवस्थेची तरतूद नाही .
…अशा अनेक मुद्यांची यादी झिपऱ्याकडे होती .
अर्थात त्याला विचार करायला वेळ मिळाला नाही.
एव्हाना सगळ्या चॅनेलवाल्यांच्या हातातलं माईकचं दांडकं त्याच्यासमोर होतं आणि झिपऱ्या बावचळून गेला होता…
बिच्चारा झिपऱ्या !
तुम्हाला कुठं दिसला तर सावरा त्याला…
अर्थ संकल्पावरील चर्चेत गोंधळलाय हो तो …
( काल्पनिक . गांभीर्याने घेऊ नये , घेतल्यास ती जबाबदारी घेणाऱ्यांची )
— डॉ.श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
दि. १ फेब्रुवारी २०२१
९४२३८७५८०६
(नावासह शेअर करायला हरकत नाही .)
Leave a Reply