नवीन लेखन...

सुलभा तेरणीकर यांचा सकाळ मधील अमीन सयानी यांच्या वरील लेख

आपल्या सरल, सुस्पष्ट, सुमधुर निवेदन शैलीतून, सलग 41 वर्षे चालणाऱ्या गीतमालेतून भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील संगीतप्रेमी श्रोत्यांना एका सुरेल सूत्रात बांधून ठेवणारे सदाबहार आवाजाचे रेडिओसाथी अमीन सयानी 21 डिसेंबर या दिवशी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहेत. आजही कार्यमग्न असणाऱ्या अमीन सयानींच्या कार्याची, जीवनाची झलक, श्रोत्यांच्या शुभेच्छांसह…

“भाईयों और बहनों‘ अशी अकृत्रिम स्वरात साद घालत, “अगले बुध की शाम फिर मिलेंगे‘ असा वादा करत “अगले पायदान‘पर असणारं गाणं कोणतं असा सवाल करत अमीन सयानी आपल्याला भेटत राहिले. आणि आपण चित्रपट संगीताच्या सोनेरी कालखंडात मुक्तपणे विहार करीत राहिलो. दूरदर्शन तर दूरच, पण त्याचा अभाव जाणवू न देणारं श्रवण आणि संवाद इतका उत्कट होता की ध्वनिलहरींनी मनाचं अवकाशही भरून राहिलं. संवादक, निवेदक, सूत्रधार अमीन सयानी आपल्या बालपणीचे जणू सवंगडी, दर बुधवारी भेटणारे मित्र आता ऐंशी वर्षांचे होत आहेत यावर विश्वा्स ठेवणं कठीण गेलं. आवडती “बिनाका गीतमाला‘ 3 डिसेंबर 1952 रोजी सुरू होऊन आज साठीची झाली हेही खरं वाटेना.

गीतमालेची जन्मकथा सांगताना ते म्हणतात, “”साल 1952. एका तरुण ब्रॉडकास्टरला सांगण्यात आलं होतं की, एक प्रायोगिक तत्त्वावर गीतमालेचा कार्यक्रम लिहावा, सादर करावा, श्रोत्यांना उत्तरंही द्यावी, त्याचं मानधन रुपये पंचवीस प्रत्येक आठवड्याचे मिळतील.‘‘ तो तरुण ब्रॉडकास्टर मीच होतो… कार्यक्रम तयार केला. बुधवार 3 डिसेंबर 1952 रोजी रेडिओ सिलोनवरून रात्री 8 ते 8.30 या वेळात प्रसारित झाला आणि थेट श्रोत्यांच्या हृदयात पोचला. पहिल्याच आठवड्यात श्रोत्यांची 9000 पत्रं आली, नंतर 15000 आणि आकडा वाढतच गेला…‘ रेडिओ सिलोनचा ट्रान्समीटर अत्यंत प्रभावशाली असल्याने त्याचं प्रसारण दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व आफ्रिका येथे सर्वदूर स्पष्ट ऐकू येई. कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी वाढली की, 3 डिसेंबर 1952 रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता एप्रिल 1994 रोजी झाली. 41 वर्ष गीतमाला चालली. हा एक विश्वाविक्रमच होता.

रेडिओ सिलोनच्या प्रभावी ट्रान्समीटर इतकाच प्रभावी, आकर्षक निवेदन शैलीचा, विशीचा युवा निवेदक एक इतिहास घडवीत होता. चित्रपट संगीताचं सुवर्णयुग तर उगवलं होतंच. नवे चित्रपट, तारे, तारकाही अवतरत होते. अमीन सयानी एका प्रभावी, परिणामकारक संवादशैलीतून अवघ्या भारतातल्या तरुणाईला बोलावीत होते, त्यांच्याशी साध्या, सरल हिंदीतून बात करीत होते. कोणताही भारतीय एकात्मता साधण्याचा तो राष्ट्रीय सरकारी कार्यक्रम नव्हता की हिंदी भाषेची प्रसारसभा नव्हती. आपलं उत्पादन विकणाऱ्या कंपनीसाठी तो एक व्यावसायिक कार्यक्रम होता, पण त्यात अमीन सयानींनी असे प्राण ओतले की एक पिढी हिंदी बोलू लागली, नव्हे हिंदी फार सोपी भाषा आहे. हे त्यातून भारतात कुठेही संचार शक्यल आहे, हे समजलं. या सोप्या भाषेचं श्रेय ते आपले वडील बंधू-गुरू व निवेदक हमीद सयानींना आणि म. गांधींच्या अनुयायी असलेल्या आपल्या मातोश्री कुलसुम सयानी यांना देतात.

आई-वडिलांची दोन्ही घराण्यांची पार्श्विभूमी डॉक्टधर, समाज सेवकांची. 21 डिसेंबर 1932 रोजी कच्छी खोजा मुस्लिम घरात जन्मलेल्या अमीन सयानींचे वडील डॉक्टभर, आईचे वडील डॉ. रजबअली पटेल, महात्मा गांधींचे निकटवर्ती, मौलाना अबुल कलाम आझादांचे मित्र. दोन्ही कुटुंबं पुरोगामी विचारांची, शिक्षणाला महत्त्व देणारी. महात्माजींच्या आदेशानुसार कुलसुम सयानींनी प्रौढ शिक्षणाचं कार्य हाती घेतलेलं. 40 वर्षांपासून त्या “रहबर‘ (पथदर्शक) हे पाक्षिक चालवीत. हिंदी, ऊर्दू आणि गुजराती भाषा व लिपीतून. वयाच्या तेराव्या वर्षांपासून आईला मदत करणाऱ्या अमीन सयानींना उर्दू, गुजराती, हिंदीचा चांगला परिचय घडला.

भारतातल्या साध्या माणसासाठी संभाषणाची भाषा, कशी असावी ते नकळत उमगलं. न्यू एरा हायस्कूलमध्ये गुजराती माध्यमातून, तर ग्वाल्हेरच्या सिंदिया हायस्कूलमध्ये इंग्रजीतून शिक्षण झालं. सेन्ट झेव्हियर्समध्ये छोटी नाटकं, एकांकिका लिहून करण्याचा छंद जडला. घरातलं वातावरण स्वातंत्रसैनिक, विचारवंत यांचा राबता असल्याने अतिशय मोकळं, सेक्युदलर. संस्कृत, अरेबिकची खास शिकवणी होती. आजूबाजूला मराठी गोतावळा. विजया मेहता, दामू केंकरे यांची प्रायोगिक नाटकं पाहायला जायचा उत्साह असे.

संभाषणाच्या ओघात अमीन सयानी बिनचूकपणे गणपतीची आरती, संस्कृत सुभाषितंही आठवतात. वयाच्या सातव्या वर्षीच रेडिओच्या इंग्रजी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या छोट्या भावाला-अमीनला मोठ्या हमीदनं कानमंत्र दिला. “समोर असणाऱ्या व्यक्तीशी बोलशील तसा मायक्रोफोनमधून बोलत जा.‘

सही म्हणजे बिनचूक, सत्य म्हणजे खरं, फसवाफसवी नको, स्पष्ट- संदिग्ध नको, सरल- समजेल असं, सभ्य- अश्लीजलता, उद्धटपणा, उथळपणा नको, सुंदर म्हणजे आकर्षक अशी सहासूत्रं अमीन सयानींनी पाळली आणि त्याला सहृदयतेची, प्रेमाची जोड दिली. निवेदन एका उंचीवर नेऊन ठेवलं.

बालगोविंद श्रीवास्तव यांनी रेडिओ सिलोनच्या “फुलवारी‘ या नवोदितांच्या कार्यक्रमासाठी निवेदन करायला बोलावलं. तेव्हा कॉलेज झाल्यानंतर एलएलबी करून वकील होण्याचं घरच्यांचं स्वप्न तसंच राहिलं खरं, पण एक उमदा, हरहुन्नरी निवेदक रेडिओत दाखल झाला आणि त्यानं इतिहास घडवला.

52 व्या वर्षीच्या 3 डिसेंबरपासून सुरू झालेल्या गीतमालेनं संगीतप्रेमी सिनेप्रेमी रसिकांच्या भावजीवनात एक रोमहर्षक पर्व सुरू केलं. त्यात खूप बदल झाले. 54 व्या वर्षापासून अर्ध्या तासाचा कार्यक्रम एक तासाचा करण्यात आला. खास लोकाग्रहास्तव! गीता दत्तनी “आसमान‘ या चित्रपटात गायलेल्या गाण्याची धून बिनाकाची सिग्नेचर ट्यून होती. ओ.पी. नय्यरच्या या संगीताची धून लोकांच्या हृदयात जाऊन बसलेली होती. ती 70 व्या वर्षांपर्यंत वाजत असे.

प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊन गाण्याचा पसंतीक्रम अमीन सयानींनी लोकांवर, रसिकांवर सोपवला. देशभरात नियमित गाणी ऐकणारे श्रोतासंघ तयार झाले ते अमीन सयानींमुळे. श्रोते आणि चित्रपट निर्माते आणि रेकॉर्ड विक्रेते याच्या संयुक्त पसंतीनं निर्णय झाल्यामुळे संपूर्ण लोकशाही तत्त्वाचा आधार असलेला गीतमाला हा कार्यक्रम चांगलाच बहरला.

गीतमालाचे अभ्यासक जयपूरचे अनिल भार्गव म्हणतात. “”41 वर्षांच्या प्रसारणात एकूण 2081 कार्यक्रमांत केवळ 80-85 कार्यक्रम काही कारणास्तव घडू शकले नाहीत. खुद्द अमीन सयानी काही अपरिहार्य कारणास्तव केवळ फक्त 30 वेळा हजर राहू शकले नाहीत.‘‘
थोडं मागे वळून पाहिलं तर ज्या वेळी अमीन सयानींचा चिरपरिचित स्वर ऐकू आला नाही त्या वेळी श्रोत्यांच्या मनातही काही चुकल्यासारखे झाले होते, हे आठवते.

अमीन सयानींचे अनेक रेडिओ प्रोग्रॅम्स गाजले.
“सॅरिडॉन के साथी‘, “एस. कुमार्स का फिल्मी मुकद्दमा‘, “मराठा दरबार की महकती बातें “जोहर के जबाब‘ इत्यादी; पण खुद्द अमीन सयानी म्हणतात, “”मी कॉलेजात मुलींशी बोलत असे, मिसळत असे; पण तेवढंच. माझी खरी “स्वीटहार्ट म्हणजे गीतमाला. मी हा कार्यक्रम समरसून करीत असे. यावर माझं नितांत प्रेम आहे.‘‘

अमीन सयानी त्यांना कामात मदत करणाऱ्या “इव्हज वीकली‘ची टॉप मॉडेल असलेल्या देखण्या काश्मियरी रमा मट्टूच्या खरोखरीच प्रेमात पडले. 58 व्या वर्षी विवाहबद्ध झालेल्या अमीन सयानींचं रमाबरोबरचं सहजीवन सुरेल, समाधानी ठरलं.

2002 साली रमाच्या निधनानंतर एकाकी झालेल्या अमीन सयानींचे काम अखंडपणे सुरू आहेच. त्याचा मुलगा राजील त्यांना कामात मदत करतो.

“फिल्म फेस्टिव्हल‘, “सौंदर्य स्पर्धा‘, “फॅशन शो‘ किंवा महत्त्वाचे प्रतिष्ठित कार्यक्रम अमीन सयानींनी शैलीदारपणे सादर केलेत. पसंतीच्या टॉप गाण्यात आपल्या गाण्यांचा समावेश नाही म्हणून नाराज झालेल्या काहींनी त्यांच्यावर आरोप केले; पण पारदर्शकता आणि निर्दोष कार्यप्रणालीमुळे अमीन सयानी आजही टिकून आहेत. “बिनाका‘ “सिबाका‘ अशी नावं बदलली, बुधवार बदलला, निवेदकही बदलले; पण गीतमाला आणि अमीन सयानी मात्र अजूनही लोकप्रियता टिकून आहेत.

चित्रपटाचं आणि चित्रपट संगीताचं सुवर्णयुग ही त्यांची “मर्मबंधातली ठेव‘. अभिनेते, अभिनेत्री, गीतकार, संगीतकार यांच्या दिलखुलास मुलाखतींचं ध्वनिमुद्रण हा त्यांचा लाडका विषय. नर्मविनोदाची पखरण, स्पष्टता, खेळकरपणा यांचा सुंदर मिलाफ असलेल्या त्यांच्या मुलाखती केवळ श्रवणीय, बालकलाकार, रेडिओ, टीव्हीची सम्राज्ञी असलेल्या तबस्सूमची ओळख “मेरी छोटी और मोटी बहन‘ अशी कौतुकानं करून देतील. अशोककुमारना त्यांच्या पहिल्यावहिल्या “शॉट‘बदल विचारतील. लतीदीदींना त्यांच्या आशाताईंशी असलेल्या व्यावसायिक स्पर्धेबद्दल प्रश्नि विचारतील तर किशोरकुमारची फिरकी घेतील; पण संयमाचं सूत्र कधीच सुटत नाही.

रेडिओ सिलोनचं “श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन‘ झालं. एकेकाळचा “पॉवरफुल‘ ट्रान्समीटर क्षीण, दुर्बल झाला. पण त्यांच्या सुस्पष्ट आवाजात ऐकू येणारा पत्ता “सेसिल कोर्ट, लॅन्सडाऊन रोड, मुंबई‘ मात्र तोच आहे. पहिल्यापासून असणारा रेकॉर्डिस्ट जॉन नियमित येतो. अमीन सयानी नेहमीप्रमाणे येतात. गीतमालेचा विषय निघाला की खुलतात.

भाषा बिघडली, परस्परांतला भाईचारा, गोडवा हरवला म्हणून व्यथित होतात. रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेची आठवण त्यांना होते-where the mind is without fear… त्यावर “मन जहॉं न डरे, सर जहॉं न झुके ऐसा हो देश हमारा‘ अशा ओळी सुचतात.

त्यांचं आवडतं गीत ही आठवतं “मन रे, तू काहे ना धीर धरे‘ पलीकडेच गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेलचा परिसर गजबजलेला असतो, समुद्राची गाज येते.

अमीन सयानी मात्र कामात बुडून जातात. गीतमालाची सावली गडदही असते अन्‌ फार सुमधुरही.

सुलभा तेरणीकर
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..