आज १ नोव्हेंबर.. आज संगीतकार,संयोजक ,वादक ”अरुण पौडवाल यांची पुण्यतिथी
प्रो.बी आर.देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी एस.डी.बर्मन ,कल्याणजी आनंदजी ,लक्ष्मीकांत प्यारेलाल ,बाप्पिलाहिरी ,आर.डी.बर्मन यांच्याकडे अॅकॉर्डीयन वादन केले. संगीत संयोजन करताकरता अरुण पौडवाल यांनी १९७१मधे संगीतकार म्हणून आशा भोसले यांच्या आवाजात एक ध्वनिफीत केली.”ओटीत घातली मुलगी विहीणबाई ”गदिमांनी केलेली हि विहीण पारंपारिक होती पण नवेपण घेऊन आली होती.”हरीनाम मुखी रंगते”हे गोड भक्तीगीत तसेच ”रुपेरी वाळूत माडांच्या बनात”,”येऊ कशी प्रिया”हि गीते आधुनिक वाद्यवृंद आणि सुंदर चाली यामुळे तरुणाईत विशेष लोकप्रिय झाली.
ससा तो कसा हे बालगीत,सूर सनईत नादावला सारखे गंभीर प्रकृतीचे गीत,गंधित धुंदीत होऊनी सजणा सारखे उडत्या चालीचे गाणे त्यांनी दिले. तसेच आपली पत्नी अनुराधा पौडवाल यांना ”डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली ”हे गझल सदृश गीत आणि ”रसिका मी कैसे गाऊ गीत”हि दादरा तालातील गीते अरुण पौडवाल यांनी दिली.
एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी-हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. मराठीतले शंकर-जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकीर्द विलक्षण गाजली. या जोडीने मराठी चित्रपट संगीताचा चेहरा-मोहरा बदलवुन टाकला, मराठी भावगीत पाश्चात्य वाद्यांनी, कुशल वाद्यवृंदाच्या ताफ्यात सजविले, अनेक चित्रपटांना उत्तम संगीत दिले.
मराठी चित्रपटसृष्टीत अनिल-अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल या जोडगोळीने यानंतरही अनेक अप्रतिम गाणी दिली. शब्द-सुरांवर जबरदस्त हुकुमत असलेल्या या संगीतकार जोडीने अनेक हिट गाणी दिली आहेत. निर्माते शरद व सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटातील अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वच गीतांनी गोल्डन व सिल्व्हर ज्युबिली साजरी केली आहे. संगीतात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या या संगीतकारांच्या गीतांची जादू आजही आहे.
मा.अरुण पौडवाल यांचे १ नोव्हेंबर १९९१ रोजी निधन झाले.
भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाटय़गीत अशा सगळ्या सर्व दालनांत मुशाफिरी करणाऱ्या या संगीतकार जोडीतील अरुण पौडवाल यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply