कृष्णाबाईच्या काठावरच्या त्या आसमंतात त्या भल्या पहाटे सुखद गारवा होता. नदी संथ वाहात होती. धुक्याचा मुलायम पदर नदीवर … शेतशिवारांवर पसरलेला होता. घाटावरच्या देवळातल्या घंटांचा मंद नाद मनाला सुंदर स्पर्श करत होता. काकड आरतीची वेळ समीप येत होती. तीर्थक्षेत्रावरच्या गर्दीचा ओघ सुरु झाला नव्हता. पादुकांचं मनोभावे दर्शन झालं. मन खूप प्रसन्न झालं. थोड्याच वेळात पूर्वा उजळली आणि आम्ही नरसोबाच्या वाडीतून निघालो.
कुरुंदवाड …. गेली अनेक वर्ष मनात दरवळत होतं. हाक मारत होतं. पटवर्धनांचा राजवाडा, कुरुंदवाडचा घाट बघायचा होता. वाडीच्या वेशीबाहेर आलो. नदीवरचा पूल ओलांडला. वाडीच्या वेशीला लागूनच कुरुंदवाड असल्याचं माहित होतं. धुकं, थंडी यामुळे वर्दळ सुरु झाली नव्हती. एक सद्गृहस्थ त्याच दिशेने चालत होते. मी जीप थांबवली. पायजमा, सदरा आणि कपाळावर गंध, चेहेऱ्यावर अतिशय निर्मळ भाव. मी नमस्कार करून त्यांना कुरुंदवाडच्या राजवाड्याबद्दल विचारलं. ते म्हणाले आता राजवाडा उरला नाही. मध्ये तो पाडला. मात्र तुम्ही गावातल्या विष्णूच्या देवळात जा. अगदी पुरातन आहे. मूर्ती त्यावेळची आहे. पूर्वीच्या वैभवाची कल्पना देणारी हीच वास्तू आता इथे आहे. तिकडेच चाललो आहे. मी म्हटलं बसा ना. त्या वृद्ध गृहस्थांनी नजर खाली केली. नम्रपणे नाही म्हणाले. मी येतो. तिथे भेटू.
देऊळ त्या जागेपासून अगदी जवळच होतं. आम्ही गेलो. कोणीही नव्हतं. देवळाबाहेर तुळशी वृंदावन आणि चाफ्याची झाडं. कलाकुसर केलेल्या सागाच्या लाकडी खांबांचं प्रशस्त प्रांगण. ते भले मोठे देखणे खांब खरंच पूर्वीच्या वैभवाची साक्ष देत होते. आता त्यावरची लकाकी गेलेली असली तरी. थोडंसं वरच्या बाजूला मोठया जोत्यावर मोठा गाभारा. गाभाऱ्याच्या आत भगवान विष्णूची सालंकृत, विलक्षण देखणी मूर्ती. आत निरांजन तेवत होतं. हात नकळत जोडले गेले.
काही वेळातच ते सद्गृहस्थ आले. आमच्याशी काही बोलले नाहीत. देवाला साष्टांग नमस्कार केला. उभं राहून डोळे मिटून … हात जोडून उभे राहिले. मग आमच्याशी बोलले. म्हणाले आता कुरुंदवाडमध्ये पूर्वीचं काही उरलं नाही. पटवर्धन मंडळी पुण्याला गेली. राजवाडा देखील जीर्ण झाला होता. तो पाडला. हे देऊळ मात्र पूर्वीच्या सगळ्या आठवणी जपून आहे. गावातली देखील जुनी लोकं इथे दर्शनाला येतात. मी गेली चाळीस वर्ष इथे रोज सकाळी येतो. हा नेम कधी चुकला नाही. चेहेऱ्यावर कमालीचं मार्दव आणि निर्मळता होती. सध्याच्या काळात अतिदुर्मिळ असलेल्या सच्चेपणाचं … साधेपणाचं मूर्तिमंत रुप समोर दिसत होतं. श्रद्धेचा अतिशय सुंदर स्पर्श आम्हाला वेढत होता. उठा पांडुरंगा … दर्शन द्या सकळा … झाला अरुणोदय …मनात गाभाऱ्यातल्या उदबत्तीचा सुगंध दरवळत होता. मृदूंगाचा गजर गुंजत होता. देवाचं सगुण रुप खऱ्या अर्थाने मनाला जाणवत होतं. पटवर्धनांच्या त्यावेळच्या संस्थानी वैभवाच्या दिवसातलं हे सुंदर देऊळ दिसत होतं.
मन पन्नास वर्ष मागे गेलं. खरं त्याही मागे. आजीबरोबर गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात जात असे. देऊळ अगदी साधं. मातीचं. कौलारू. एका बाजूला दूरवर डोंगर …तर एका बाजूला क्षितिजरेषेपर्यंत मोकळा आसमंत. वरती दिगंत आभाळ. अविरत वाहणारा सुंदर वारा. देवळाला बाहेर, तीन बाजूंना, मोकळी मोठी पडवी. चोपून सारवलेली जमीन. देवळाच्या बाहेर चाफ्याची फुललेली झाडं. देवळाच्या गाभाऱ्यात तेवत असलेलं निरांजन. देवाला फुलं वाहून नमस्कार करून आजी त्या पडवीत बसत असे. डोळे मिटून स्तोत्र म्हणत असे. त्यावेळी फार काही कळत नसे. पण देवाला डोळे मिटून नमस्कार केला जाई. एक वेगळीच प्रसन्नता देवळात वाटत असे. देवळाची ती पडवी, वाऱ्याच्या झुळका, चाफ्याच्या फुलांचा सुगंध … खूप मंगल वाटत असे. त्या अजाणत्या वयातही देवावरची श्रद्धा पुरेपूर होती. तिथेच बसावं असं वाटे. त्या पूर्वीच्या श्रद्धेचा निर्मळ स्पर्श त्या सद्गृहस्थांकडून होत होता. घनश्याम सुंदरा श्रीधरा … अरुणोदय झाला …त्या सुंदर सकाळी देसकाराचे मंगल स्वर खऱ्या अर्थाने मनात गुंजत होते.
-प्रकाश पिटकर
9969036619
7506093064
जानेवारी ८, २०२३
Leave a Reply