रात्री उशिराचा एक रेडिओ कार्यक्रम ऐकत होते. श्रोत्याने फोनवरुन आपली समस्या सांगणे,त्यावर निवेदकाने सल्ला देणे, मग एक चित्रपट गीत. पुन्हा पुढची समस्या. पुष्कळसे इंग्लिश शब्द मिश्रित असलेल्या हिंदी भाषेतील त्या कार्यक्रमाचे स्वरुप असे होते. फोनवर एका मुलाने सांगितले की त्याची ‘गर्लफ्रेंड’ सतत काही ना काही कारणाने व परत करण्याच्या बोलीवर पैसे मागते. ‘इमेज’ आणि प्रेम दोन्ही जपण्यासाठी तो पैसे देत गेला.आतापर्यंत मैत्रिणीला त्याने ५५००० रु.दिले आहेत.परत मात्र एकही रुपया आलेला नाही.आता त्याचा प्रेमावरचा विश्वास उडू लागला आहे. हे सगळं सांगून त्याने ,’आता मी ‘काय करु? ‘ असे विचारले.
यावर गुरुरुपी निवेदकाने खरंच खूप चांगला सल्ला दिला. तो म्हणाला की स्वतः मदत करणे व स्वतःचा वापर करु देणे यात फरक आहे. तुझा वापर होत आहे, त्यामुळे आता मदत करणे थांबव व त्यानंतर तिचे प्रेम टिकते का बघ. मग एक गाणे वाजले. पुढची समस्या अशी होती की एका मुलीचा ‘बॉयफ्रेंड’ नुसतेच लग्नाचे वचन देत झुलवत ठेवत़ आहे. तर आता तिने काय करावे? त्यावर नकार देऊन त्याला सोडून दे व सरळ मोकळी हो असा तिला सल्ला मिळाला. मग आणखी एक गाणे वाजले. पुढची समस्या तर आणखी गंभीर होती. ‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’ मध्ये असणारी एक मुलगी विचारत होती की दूर राहणाऱ्या त्या मुलाच्या प्रेमावर किती ‘ट्रस्ट’ करावा ? प्रेमाची साक्ष स्वतःच्या मनाला पटावी लागते. तिने तिच्या प्रेमावर विश्वास ठेवावा की नाही हे दुसरा कसं सांगणार? या विचाराने त्याचा सल्ला न ऐकता मी स्टेशन बदलले.
प्रेम ही अत्यंत सुखद, उदात्त व जीवनव्यापी भावना आहे. वरचे तिन्ही प्रश्न प्रेमाच्याच संदर्भात आहेत.तिन्ही महत्त्वाचेच आहेत. आजच्या युवा पिढीच्या विचारांची झलक यातून दिसते. सध्या कोण कोणाला कसं वापरेल याचा काही नेम नाही. तरुण पिढीसमोर आकर्षणे खूप आहेत. ती पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड असते. कधी रुपाचे तर कधी रुपयांचे आमिष दाखवून संबंध ठेवले जातात. त्याला प्रेम हे नाव दिले जाते. पण ते इतके शारीरिक पातळीवर उतरते की त्यातली उदात्तता हरवून जाते. हे वास्तव कुणी नाकारु शकत नाही. मी स्टेशन बदलले खरे, पण तिकडेही असाच संवादरूपी कार्यक्रम सुरू होता. प्रेमाच्या उदात्त भावनेला छेद देणारे आणखी एक उदाहरण त्या दुसऱ्या स्टेशनवर ऐकायला मिळाले. एक तरुणी फोनवर सांगत होती की सध्याच्या ‘बॉयफ्रेंड’ पेक्षा त्याचा भाऊ तिला जास्त आवडू लागला आहे. त्यावर निवेदिकेने विचारले की हे तिने बॉयफ्रेंडला सांगितले आहे का? त्यावर ती म्हणाली की, “मला असं वाटतं की भावानेच त्याला सांगावे आणि त्याला असं वाटतं की तो माझा बॉयफ्रेंड असल्यामुळे मीच त्याला सांगायला हवं त्यामुळे अजून त्याला हे कोणीच सांगितलं नाही.” बॉयफ्रेंडचा भाऊ अत्यंत ‘हँडसम’ असल्यामुळे त्याच्या रूपाचे, त्यांच्या भेटीचे वर्णन तिने अतिशय रसभरीत शब्दात केले आणि या संवादात ती तरुणी व निवेदिका दोघीही त्या रोमांचकारी विषयाची मजा घेत बोलत होत्या.
हे रेडिओ कार्यक्रम मनोरंजनासाठी असल्यामुळे काल्पनिक संहिता असेल तर चांगलेच म्हणावे लागेल.पण हे अनुभव खरे असतील तर कुठे चालली आहे आजची तरुणाई हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. प्रेमाची आजची व्याख्याच बदलली आहे काय? सतत पैसे मागत राहणे, दिलेले पैसे परत मिळण्याची अपेक्षा करणे, लग्नाची वचने देऊन तीष्ठत ठेवणे, दूरस्थ प्रेमीवर विश्वास ठेवावा की नाही याची शंका येणे आणि अगदी सहजतेने प्रेमातली व्यक्तीच बदलणे…. हे असं असतं का प्रेम? ही तर सगळी प्रेम नसण्याचीच लक्षणे आहेत. हे प्रेम नव्हेच, यात केवळ आर्थिक लोभ आणि शारीरिक आकर्षणच आहे यात काही शंका नाही. दुसरे असे की जाहिररित्या रेडिओ कार्यक्रमात इतके व्यक्तिगत प्रश्न का जाहीर केले जातात? हे सांगणे म्हणजे स्वतःचा अपमान जगजाहीर करणे नाही का? अस्वस्थ होऊन मी रेडिओ बंद केला आणि झोपेची आराधना करू लागले, पण ती पार गायबच झाली. खूप वर्षांपूर्वी कधीतरी वाचलेल्या ओळी आठवत राहिल्या
Love is not love which alters when it alteration finds;
love alters not with brief hours and weeks,
but bears it out even to the edge of doom.—william Shakespeare
– आराधना कुलकर्णी
Leave a Reply