नुकताच पावसाळा सुरु झालेला होता. पावसाच्या सरी सारख्या अधून मधून पडत होत्या. सर्वत्र हिरवळ दिसू लागली होती. थोड्याच दिवसांनंतर त्या हिरवळीचे धागे, निसर्ग दाट व पक्के करणार. आणि एक अप्रतिम हिरवागार असा गाल्लीचा सर्व उघड्या रानोमाळ जागांमध्ये पसरुन टाकल्याचा आनंद निर्माण होणार. हा गाल्लीचा, त्या वर्षाऋतूच्या स्वागता साठीच असावा. अशा हलक्या फुलक्या अगमन प्रसंगीच्या नव पावसाळी वातावरणात प्रवास करावा. खिडकीजवळ बैठक मिळालेली असावी. बाहेरील नयन मनोहर द्दष्य टिपताना मिळणारा आनंद, वर्णन करण्याच्या पलीकडला.
ठाण्याहून पुण्याला रेल्वेने चाललो होतो. खिडकीजवळची जागा. बाहेरील वातावरण वर वर्णन केल्या प्रमाणे. आणि तो आनंद लूटण्यात मग्न झालो होतो. इतक्यांत माझे लक्ष विचलीत झाले एका घटनेमुळे. माझ्या समोरच्या बाकावर एक वयस्कर बाई बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी एक पंधरा वर्षाचा मुलगा देखील होता. बाईंच्या हातात एक पिशवी होती. त्यातून त्या काहीतरी काढून त्या मुलाच्या हाती देत होत्या. मुलगा बाहेर बघून, ती वस्तू जोरकस प्रयत्न करीत, बाहेर दुर अंतरावर फेकून देत असे. त्या बाई व मुलाच्या या हरकती सतत चालू होत्या. मला काहींच बोध होईना, की तो बाहेर काय फेकीत होता.
बराच वेळ पर्यंत मी हे सारे बघत राहीलो. बेचैन होऊ लागलो. त्यांच्या ह्या बागण्याचे कोडे कांही उलगडेना. शेवटी विचार मालीकेचा बांध तुटला.
मी त्या बाईनाच विचारले. “ आजी मला क्षमा करा. मी एक गोष्ट वियारुं का तुम्हाला ? मी मघापासून बघतो आहे, तुम्ही ह्या मुलाला कांही तरी देत आहांत. हा मुलगा तेच बाहेर दुर फेकून देत आहे. मला ह्याचा काहीच उलगडा होत नाही. त्या बाई एकदम हसल्या. प्रथम त्या मुलाकडे बघू लागल्या. हा माझा नातू. मुलाचा मुलगा. आम्ही सर्वजण एकत्र राहतो. नेहमी मी आपल्या मुलीकडे पुण्याला जात असते.
“ मला एक सवय म्हणा वा छंद आहे. घरांत नेहमी अनेक प्रकारची फळे आणली जातात. जसे चिकू, सिताफळ, बोर, मोसंबी,संत्री, आंबा, रामफळ, चिंचा, पेरु, पपई, कलींगड, खरबूज .इत्यादी. मी त्यांच्या बिया एकत्र करुन, एका टोपलीत जमा करुन ठेवते. गच्चीवरील टेरेसवर ठेऊन देते. सर्व बियाणे सुकतात त्याना पिशवित ठेवते. पावसाळ्याचा मोसम सुरु झाला की जेव्हां माझे पुण्याला जाणे होते, मी ती बियाने बरोबर घेते. ती मी रस्याने फेकीत जाते. बी, जमीन व पाणी याच्या संपर्कात अल्यास त्या रुजण्याची बरीच शक्यता असते. मला माहीत नाही, की काय होत असेल त्या बियांचे. अंकुरल्या, रुजल्या वा कुजल्या. न त्यांच्यसाठी पोषण, न संरक्षण, न योजना. फक्त एक अंधारामधला प्रयोग. सर्व कांही अज्ञानामध्ये. फक्त एकच हेतू मनांत ठेऊन हे केले जाते. झाडे लावा, निसर्ग वाढवा, आणि पर्यावरण सांभाळा. खारीचा हा माझा वाटा समजून समाधान मानते. “
त्या बाईंचे डोळे सर्व सांगताना पानावलेले दिसले. त्यात दिसली चमक, तगमग आणि वयाची जाण. तरी देखील काहींतरी रचनात्मक करण्याची जीद्द.
सारे एकून माझे ह्रदय भरुन आले. मी त्यांच्या वयाला व कार्याला अभिवादन केले.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply