असा कसा, जसा तसा,
जीवनाचा हा प्रवास,
किती कष्ट दुःखे, यातना,
कधी आनंदाचा मधुमास,–
कधी कटू कधी गोड,
कधी तिखट, कधी आंबट,
चवी जितक्या येती वाट्या,
तितुके पडती विविध सायास,–
कधी गंमत, कधी मजा,
कधी जोरा, कधी सजा,
कधी रंक होतो राजा,–
कधी राजाचाच बने दास,–!!!
केव्हा वाटे जीवनगाणे,
सुरेल स्वर्गीय ते तराणे,
कधी अंतर्दुःख पुराणे,
कधीही सोसावे घोर शल्यांस,–!!
पाऊस आठवणींचा जसा,
हृदयात अविरत पडतां,
गहिंवर मनातले संचारता
ओसंडे संयमाची कांस,–!!!
कधी प्राक्तनाचा लचका,
कधी दुष्कर्मांचा फटका,
केव्हा सामोरी अपघाता,
कधी अचानकच हर्षोल्हास,–!!!
वेळ पुढे-पुढे धावता,
आयुष्याला गती मिळतां,
सरता काळाचा महिमा,
भूतकाळी रमणे खास,–!!!
वेदनांची रेलचेल होता,
शारीरिक व्यंगे उफाळता,
यातनांचा करता सामना,
हतबलता करे सारखे उदास,–!
कधी श्रद्धा, तर अंधश्रद्धा,
तोंड देणे, कधी विश्वासघांता,
कधी नात्यांचा होतसे चुरा,
असे शत्रुत्वही घेते घास,–!!!
प्रश्न कधी अस्तित्वाचा,
केव्हा अस्मिता, अहंकाराचा,
कधी दीनदुर्बळ जिकिरीचा,
अपुरे ठरती सारे प्रयास,–!!!
हिमगौरी कर्वे ©
Leave a Reply