असा कसा फसवशी कृष्णा,
जाऊन बसतोस कदंबावरी, पाण्यात आम्ही सचैल,
घेऊन गेलास वसने वरी,–!!!
थंडगार वार्याच्या झुळका,
अंगागाला कशा झोंबती,
पाण्यातून बाहेर येण्या,
अशक्य वाटे आम्हा किती,–!!!
काय हवे तुझं सांग तरी,
आमुची वसने दे झडकरी,
कितीदा कराव्या विनंत्या,
काकुळतीला आलो आम्ही,–!!!
अर्ध्या पाण्यात उभे राहुनी,
दमलो आम्ही साऱ्या सख्या,
किती छळणार अजून सांग,
नाही कुणीच निर्जनस्थळी,–!!!
मुरली तुझी नको वाजवू ,
नको आम्हास असे खेचू,
वारंवार तुज हात जोडूनी,
आर्जवे करतो क्षणोक्षणी,–!!!
तुझ्या हातात आमुची लाज,
अरे वय कोवळे रे तुझे आज,
शोभते का तुला नंदलाला,
गोपिका तर आम्ही खानदानी,–!
वस्त्रांशिवाय कसे राहू,–
शिक्षा ही आम्ही कशी साहू,-?
पाण्यातून बाहेर कशा येऊ,
विचार करा तुम्ही थोडातरी,–!!!
सवंगड्यांना गोळा करुनी ,
सतत आमच्या खोड्या काढशी,
जाता-येता मस्करीत उगीच,
आमच्याशी छेडाछेडी करीशी,–
कळत नाही आम्हा,तुम्ही
कसे, केव्हा,उगवता सामोरी,
गांगरून जातो आम्ही,
तुमचे हे पवित्रे पाहुनी,–!!!
नको रे,नको, कान्हा ,
अंत असा आमचा पाहू,
दिली नाहीस जर वस्त्रे तर,
घरी कशा आम्ही जाऊ,–!!!?
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply