नवीन लेखन...

असा पदर पदर

असा पदर पदर,
कुयरी नि मोराचा..
दिसे भर्जरी साजरा,
गुजराती पद्धतीचा..!!

माझं बऱ्याच लग्नसमारंभातून, सोशल गॅदरींगमधून किंवा अशाच काही विशेष घरगुती सोहळ्यांना जाणं होत असतं. बऱ्याच वर्षांपासून मला असं दिसतं की, अगदी फेटेबंद मराठमोळा असलेल्या या कार्यक्रमातून बऱ्याच कुमार-तरुण ललना मला गुजराती पद्धतीची साडी नेसून दिसतात. काही ठिकाणी तर नववधु किंवा सत्कारमु्र्ती असलेली स्त्री ही गुजराती पद्धतीची साडी नेसलेली आढळते. अर्थात त्यांनी कुठल्या पद्धतीची साडी नेसावी किंवा वेष परिधान करावा, हा त्यांच्या त्यांच्या आवडीचा विषय असतो हे मला मान्य आहे. तरी पण गुजराती पद्धतीच्याच साडीचा या स्त्रीयांना इतका सोस का, दक्षिणेकडच्या किंवा ओरीसा-मणिपुर अशा देशातल्या इतर प्रांतातल्या साड्यांचा का नाही, हा प्रश्न मला पडायचा. नाही म्हणायला कोणत्याही वयाच्या काही कन्यका (बायकांना वयाचं बंधन नसतं, म्हणून सर्व कन्यका) पंजाबी पद्धतीचा लेहेंगा-शरारा, वेस्टर्न पद्धतीचे कपडे, घातलेल्याही दिसतात, पण ही मराठी नसलेली वस्त्र मला त्या मराठी कार्यक्रमात वेगळी वाटत नाहीत. मराठी कार्यक्रमातली गुजराती पद्धतीची साडी मात्र, का कोण जाणे, पण मला थोडीशी खटकते..!!

ह्याचं उत्तर कुणाला विचारावं हा प्रश्नच होता. पुरुषांना विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यांना एखाद्या स्त्रीने कुठली साडी नेसली, याच्याशी काहीच कर्तव्य नसतं. ते तिला बघण्यातच मग्न असतात. कशीही असली तरी ते स्त्रीकडे पाहाण्याचा निसर्गाने नेमून दिलेला आपला आपद्धर्म मनोभावे पाळत असतात. स्त्रीयांना विचारावं तर, आज काय एकदम पदरावर घसरलात ते, असं नाहक ऐकून घ्यायची तयारी ठेवावी लागणार. तरीही रेटून उत्तर शोधण्याची थोडी चिकाटी दाखवली तर #MeToo च्या यादीत येण्याची दाट शक्यता.

मग मी आपला चुकला फकीर न्यायाने बायकोकडे (स्वत:च्याच) मोर्चा वळवला. लग्न समारंभात अथवा सोशल गॅदरींग्समधे हल्ली स्त्रीया गुजराती पद्धतीने साडी का नेसतात, या मला पडलेल्या कोड्याचं तिने दिलेलं उत्तर पटण्यासारखं होतं. हेच उत्तर आणखीही एक दोन नात्यातल्या महिलांनी दिलं. साडीचे दोन मुख्य भाग असतात. एक अंग आणि दुसरा म्हणजे पदर. पाहाणारीला (प्रश्न पाहाणारीचाच असतो. आठवा ती जाहिरात, ‘मेरी साडीसे उसकी साडी सफेद कैसे’ वाली. पाहणाराला चेहेरा पुरेसा असतो.) साडीचं बुट्टी, कोयरी किंवा आणखी काही नक्षी असलेलं अंग कुठुनही पाहिलं तरी दिसतं, पण पदराचं तसं नसतं. पदर हा साडीचा खास कलाकुसर केलेला भाग. साडीची मजा या पदरातच (साडीच्याच हो..!) असते व ती दिसण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी म्हणा, पदर फुलवलेला असणं आवश्यक असतो. आपल्या मराठी पद्धतीचा पदर डाव्या खांद्यावरून मागे एकजूट होऊन लटकत असतो आणि मग तो पदरावरचा जरतारीचा मोर व त्याचा फुलवलेला पिसारा पदराच्या मागे लटकणाऱ्या घड्यांमधे पार लपून त्याची लांडोर होऊन जाते. असं झाल्याने कोणी साडीचं व नेसणारीचं कौतुक करत नाही व सर्व खटपट (आणि साडीचे पैसेही) वाया गेल्यासारखं वाटतं. तशी आपल्या पद्धतीच्या साडीच्या पदरावरची कलाकुसरही दिसू शकते, पण मग तो डाव्या मनगटावर आडवा धरून ठेवावा लागतो किंवा शालीसारखा मागून पाठभर पांघरून घ्यावा लागतो. हे दोन्ही तसे उपद्व्यापाचेच प्रकार.

गुजराती पद्धतीच्या साडीचा पदर उजव्या खांद्यावरून पुढच्या बाजुला घेतल्याने व त्याचा एक शेव कंबरेच्या डाव्या बाजूला खोतून ठेवता येतो. त्यामुळे पुढून अंगभर पसरलेला पदर आणि त्यावरचा जरतारीचा मोर किंवा कलाकुसर कुणालाही दिसू शकते. आपल्याकडे कोण कोण पाहातंय, हे हा समजू शकतं. पुन्हा हा पदर सारखा सावरण्याची आपल्या पद्धतीच्या साडीसारखा खटाटोप नसतो, हा एक अन्य फायदा. समारंभात गुजराती पद्धतीची साडी नेसण्याचा सारा अट्टाहास हा ‘पदरावरचा जरतारीचा मोर साजरा हवा. शिवाय तो दिसराही हवा’ ह्यासाठी असतो, मला माझी पत्नी व इतर स्त्रीवर्गाकडून मिळालेलं उत्तर मला पटलं.

तरी या शंकेने माझ्या जागं झालेल्या कुतुहलाला पुढचा प्रश्न पडलाच;की गुजराती आणि मराठी पद्धतीच्या साडी नेसण्यात एवढा १८० अंशाचा फरक का? आता तुम्ही म्हणाल की, गुजराती साडीच का, आपल्या विविधतेने नटलेल्या देशात तर साडी हे वस्त्र अनेक पद्धतीने परिधान केलं जातं, त्यांचा विचार का करु नये?

प्रश्न अगदी रास्त आहे. आपल्या नाना जाती आणि त्यानुसार परंपरा असलेल्या देशात, बहुसंख्य प्रांतातल्या बहुतांश स्त्रीयांची मुख्य वेशभुषा साडी आहे. ती नेसण्याच्या पद्धतीत मात्र प्रचंड वैविध्य आहे. त्या त्या प्रांताच्या हवामानानुसार, कामाच्या प्रकारानुसार वस्त्र आणि अन्न यात वैविध्य आहे. पुन्हा त्या त्या प्रांतातल्या पोटभेदानुसार त्यात पुन्हा विविधता आणलीय. जातीभेदाचे असंख्य तोटे आपण सोसलेत व अजुनही सोसतोय, पण वेश, भाषा आणि खाणं यांत मात्र प्रत्येक जातीने वेगळेपणा आणलाय हे मान्य करायला हवं. जात-प्रांत-पंथ-धर्म यानुसार बनलेल्या वा बनवलेल्या अन्न-वस्त्रादी प्रथा-परंपरांनी आपली हिन्दू संस्कृती विविधतेने समृद्ध केली आहे, यात मला तरी शंका नाही. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी आणि तेवढीच आकर्षक. परंपरांकडे कुतुहलाने पाहाणाऱ्या माझ्यातल्या हुडक्याला हे आश्चर्याचं वाटतं. मी मुंबैकर असल्याने गुजराती साडी दिवसाच्या कोणत्याही प्रहरी आणि कुठेही सतत दिसत असते. म्हणून तर मला आपण, म्हणजे महाराष्ट्रीय स्त्रीया (यात कुशल बद्रीकेही आला हो) आपल्या मराठी पद्धतीने साडी नेसताना, ती कंबरेभोवती घड्याळाच्यी उलट दिशेने गुंडाळून पदर डाव्या खांद्यावरून मागे सोडतात. तर गुजराती स्त्रीया नेमकी उलट क्रिया करतात, ते का हा प्रश्न पडलां. इतर प्रांतातल्या साड्या किंवा वस्त्र हा ही माझ्या कुतुहलाचा विषय आहे आणि मी त्याचाहा अभ्यास करणार आहे, पण तो पुढे. तूर्तास गुजराती साडी समोर आहे.

समारंभतली गुजराती साडी व तिच्या पदराचं उत्तर तर मिळालं. तरी पुढचा प्रश्न, ती आपल्या पद्धतीच्या साडीच्या उलट का नेसतात, याच्या उत्तराच्या शोधात निघालो. अनेक स्त्रीयांना या बद्दल विचारलं, फॅशन डिझायनर्सना विचारलं. बहुतेकांनी त्यांना त्याची कल्पना नसल्याचं सांगितलं. अनेकांनी ‘तशी परंपरा आहे’ असं उत्तर दिलं. पण परंपरा काही उगाच पडत नाही, त्यामागेही काही कारण असतं, असं मी सांगितलं असता, ‘तसं काही कारण असल्यास माहित नाही’ असं सांगितलं. काहीनी हवामानामुळे असेल असं सांगितलं. ते काहीसं बरोबर असावं असं मला वाचलं, पण समाधानकारक वाटलं नाही.इंटरनेटवर शोध घेतला, पण तिथेही काही सापडेना. मग शेवटी तर्काचा आधार घेऊन गुजराती पद्धतीची साडी आपल्या उलट का नेसतात, याचं तर्कसंगत उत्तर शोधायचा प्रयत्न केला.

साडीचा जन्म अंतरीय आणि उत्तरीय या वस्त्रातून झालाय. अंतरीय म्हणजे कंबरेपासून खाली नेसायचे वस्त्र आणि उत्तरीय म्हणजे कंबरेच्यावर दोन्ही खांद्यांवरून दोन बाजुने पुढे घेण्याचे वस्त्र. हे उत्तरीय काही लोक नुसते खांद्यावरही ठेवत. आजच्या पंजाबी ड्रेसची ओढणी हा उत्तरीयाचाच प्रकार. पुरुषांसाठी असलेल्या अंतरीय आणि उत्तरीय या दोन वेगळ्या वस्त्रांचा मिलाफ होऊन ते साडी नांवाच्या एकवस्त्रात रुपांतरीत झालं असावं. सुरुवातीला स्त्रीया वक्षभाग झाकण्यासाठी काही घालत नसाव्यात, असं अनुमान प्राचीन शिल्प किंवा चित्रावरून काढता येतं. आता आता पर्यंत काही प्रांतांत किंवा जमातींत त्यांच्या त्यांच्या समजुतीनुसार स्त्रीयांनी चोळी घालायची पद्धत नव्हती. पुढे कधीतरी स्त्रीयांचा वक्षभाग झाकण्यासाठी त्यात स्तनपट्टची भर पडली असावी (अनेक स्थित्यंतरातून जाऊन ह्याचंच रुपांतर पुढे आताच्या ब्लाऊज नामक वस्त्रात झालं असावं. ‘चोळी ते ब्लाऊज’ ह्या प्रवासावर मी एक स्वतंत्र प्रकरण लिहितोय). अंतरीय आणि उत्तरीय एक होऊन साडी जन्माला आली.

साडीचा मुळ मुख्य उद्देश स्त्रीयांची पाठ आणि पोट दिसू नये हा होता. पोट, विशेषत: बेंबी दिसणं हा त्याकाळात अशिष्टपणा मानला जायचा, असं मी कुठेसं वाचलं होतं. मला आठवतंय, मी तरुण असताना(अजुनही आहे) स्त्रीयांमधे साडी बेंबीच्या खुपच खाली नेसण्याची आणि ब्लाऊज खुपच वरती घालण्याची फ्याशन आली होती. ब्लाऊज आणि साडी यातील या वाढत्या दुराव्यामुळे बायकांची पोटं आणि पाठ सताड उघडी पडत असे. त्याकाळी अशा ब्लाऊजचं नामकरण ‘पो.टि.मा.’ (पोटावर टिचकी मारा आणि साडीचं नामकरण ‘बें.टि.मा.) असं गंमतीनं करण्यात आलं होतं. त्यावेळच्या दिवाळी अंकांतून या प्रकारांची खिल्ली उडवण्यासाठी झालेलं भरपूर लिखाण मी वाचलेलं मला अजुनही जसच्या तसं आठवतं. एका अंकात तर लिहिलं होतं की, जर ब्लाऊजचं रोड होत जाण्याचं प्रमाण असंच राहिलं तर, भविष्यात गळापट्टी आणि दो दंडांवरचे दो काठ येवढाच प्रकार ब्लाऊज म्हणून अस्तित्वत राहील. सध्याची स्री वर्गातली ‘कोल्ड शोल्डर’ची फ्याशन पाहून मला २५ वर्षांपूर्वी वाचलेलं ते वाक्य सतत आठवतं. असो. तर, साडीनामक वस्त्रात पाठ आणि पोट व्यवस्थीत झाकली जाण्याची सोय होती. तशी ही सोय आपल्या देशातील स्त्रीयांच्या सर्वच वस्त्रात होती व आहे (आपण ती गावंढळपणाची व आऊट डेटेड वाटल्याने वापरत नाही, ही बाब अलाहीदा).

गुजरातचा काही भाग रुक्ष असला तरी, हा तसा दुधाचा अभिषेक मागणाऱ्या सोमनाथाचा आणि दह्या-दुधाची चोरी करणाऱ्या कृष्णाचा प्रदेश. दुधा-दह्याने समृद्ध असलेल्या या प्रदेशातील स्त्री-पुरुषांच्या अंगी लागलेलं ते दुध-दही सहज दिसतं. गुजराती लिपी जशी गोलाई असलेली आहे, तशाच तिथल्या ललनाही. तरुणपणी शिडशिडत असलेल्या बहुतेक गुर्जर कन्यांच्या काही ठराविक वयानंतर, त्यांच्या शरीरवर हवा तिथं आणि नको तिथही त्यांनी खालेल्या दह्या-दुधाचा परिणाम(परिणाम या शब्दाच्या अगोदर ‘सु’ किंवा ‘दु’ लावणं हे आपापल्या दृष्टीकोनावर ठरवावं) दिसू लागतो. शरीराच्या काही ठिकाणी आवश्यक आणि काही ठिकाणी अनावश्यक गोलाई घेतलेलं मागचं-पुढचं क्षेत्रफळ सहजतेने दिसू नये, यासाठी ही पुढे पदर घेण्याची प्रथा पडली असावी की काय, अशी सहज शंका मला येते. पुढच्या बाजुला पदर घेताना, त्या पदराचा मागे रुळणारा भाग नितंब झाकण्याचं काम करतो व पुढचा पदर पोट आणि वक्षस्थळाला अगदी सहजपणे पडद्याआड ठेवतो, हे मात्र खरं. मराठी पदरातही ही सोय आहे, पण गुजराती पदराएवढी सहज नाही..!

पुन्हा गाई-म्हशींच्या गोठ्यात किंवा खेतरमधे (गुजरातेत शेताला खेतर म्हणतात) उकीडवं बसून काम करताना, पदर मागच्या बाजूने गुरांच्या शेणा-मुतात किंवा चिखलात लडबडब नये, अशीही दृष्टी अशा पद्धतीच्या साडीची परंपरा पाडणाऱ्यांमधे असू शकते..! आपल्या पद्धतीच्या नऊवारी वा सहावारी साडीत पदर मागे असल्याने, गोठ्यात किंवा शेतात काम करताना तो कंबरेकडे पुढे घेऊन खोचावा लागतो. स्त्री असो की पुरुष, नित्याची कामं करताना अडचणीची होऊ नयेत आणि चालताना गतीला बाधा येऊ नये, अशीच सर्वांची वस्त्र परंपरेने डिझाईन केल्याचं दिसून येतं. कोळणीच्या साडीचा घट्ट कासोटा तिला पाणथळ जागी उकिडवं बसून काम करताना अडचण होऊ नये याचसाठी असतो. गुर्जर स्त्रीयांची साडी आणि त्यांच्याकडची कामं, ह्यामागेही हे तत्व आहे, असं म्हटलं तर चुकू नये..!

दुसरा तर्क असा की, गुजरातवर बराच काळ मुस्लीम शासकांचं राज्य होतं. या काळात शासकांची संस्कृती-पद्धती व त्या प्रदेशातील मुळ संल्कृती व पद्धती यांचा मिलाफ होऊन तिसरीच वेगळी संस्कृती, प्रथा, परंपरा बनतात, हा अनुभव जगभरात सर्वत्र येतो. तसाच तो गुजरात-राजस्थान व काही प्रमाणात महराष्ट्रातही अनुभवायला येतो. मुसलमान शासकांच्या बुरखा पद्धतीकडून आपण डोक्यावरचा पदर, घुंघट किंवा गोषा घेतला. ज्या ठिकाणी मुसलमान शासक पोहोचू शकले नाहीत, तिथे डोक्यावरनं पदर घेण्याची किंवा घुंघट काढण्याची प्रथा नाही. गुजरातेवर बराच काळ मुसलमान शासन असल्याने गुजरात व त्या पलिकडील राजस्थानात पदर किंवा/वा घुंघट घेण्याची प्रथा पडली. गुजराती पद्धतीत उजव्या खांद्यावरुन पुढे येणारा पदर, आपल्या मागे जाणाऱ्या पदराच्या तुलनेत, चटकन डोक्यावर घेण्यास जास्त सोपा आहे. आपल्या पदराचा शेव मागे असल्याने, पदर डोईवर घ्यायचा असल्यास तो प्रथम मागून पाठीवरून घेऊन मग डोक्यावर घ्यावा लगतो व त्याचा शेवही पुढे घ्यावा लागतो. गुजराती पदर पद्धतीत पदर मागून पुढे येत असल्याने, त्या स्त्रीयांना फक्त त्या पदराचा मानेकडचा मागचा भाग डोक्यावर ओढून घेणं येवढी एकच क्रिया करावी लागते व कुणी परकं आल्यास पदर डोईवर घेण्यास सोयीचं होतं. गुजराती साडी नेतण्याची व पदराची पद्धत नेमकी आपल्या उलट का, याचा हा मला सुचलेला आणखी एक तर्क. इथे आपल्या पद्धतीचा पदर खांद्यावरून मागे का, त्याचा अंदाज बांधता येतो. वेगळेपण दिसतं. या त्या प्रांताचा गुणह वस्त्रात आपल्या मराठणी ह्या रणांगणात लढणाऱ्या. त्या उगाच घुंघट वैगेरे काढत बसत नाहीत. सरळ पदर बांधून, घोड्यावर मांड ठेकून आणि हातात तलवार घेऊन सरळ लढायला सज्ज होतात. आपल्या पद्धतीचा पदर कंबरेवर कसायला सोपा.

अर्थात त्या त्या प्रांतातली वस्त्र प्रावरणं कशी विकसीत झाली, हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. त्यासाठी त्या त्या प्रांततल्या साहित्य-संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल. गुजराती पद्धतीची साडी नेमकी तशीच (इथेही प्रांतानुसार भेद आहेतच)का नेसतात, यावरही तिकडे संशोधन झालंच असेल, परंतु मला गुजराती भाषा अवगत असली तरी ती बोलण्यापुरतीच असल्याने आणि ती मला नीट वाचता येत नसल्याने, गुर्जर साहित्य-संस्कृती मला अभ्यासता आलेली नाही. असं असलं तरी किमान या विषयाशी संबंधीत माहिती मिळवण्याचा माझा प्रयत्न यापुढेही असाच सुरु राहाणार.

स्त्रीयांच्या शरीराचा, त्यांच्या शरीरधर्माचा व समाजात त्या काळात अस्तित्वात असलेल्या लाजेच्या कल्पनांचा विचार करुन तयार केलेलं साडी हे वस्त्र मला अत्यंत आवडतं. अत्यंत ग्रेसफुल असलेल्या ह्या वस्त्रात काळानुसार काही बदल झाले असले तरी त्याची मुळ आखणी मात्र तिच राहिलीय. आपल्या देशातील कोणत्याही प्रांतातील कोणत्याही पद्धतीची व ती साडी नेसलेली स्त्री मला आकर्षकच वाटते, हे खरं. इथे गुजराती पद्धतीचा विचार केलाय एवढंच. गुजराती साडी तशीच का नेसतात, ह्याचा माझा शोध सुरुच राहाणार. त्याचं समाधानकारक कारण सापडत नाही तोवर मी बांधलेल्या ह्या लेखातील तर्कांवरच मला समाधान मानावं लागणार..!

-©️नितीन साळुंखे
9321811091

फोटो आणि शीर्षक कविता इंटरनेच्या सौजन्याने.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..