पावसाच्या सरी पाहून आपण धुंद होऊन हात बाहेर घ्यावा.. दोन चार सरी ओंजळीत घेण्यासाठी.. तर ह्याने बरोब्बर आपली ओंजळ सोडून सारं शिंपून काढावं!
अगदी दिवस सुरू होताहोताच दाटून आलेला अंधार पाहून, आपण आपलं बाहेर जाणं दोन-एक तासांनी पुढे ढकलावं.. तर पावसाने, ना वाऱ्याने, ना काळ्या ढगांनी, आख्ख्या दिवसभरात ईकडंच तिकडेसुद्धा होऊ नये!
सूर्यास्ताचा फोटो काढायला जावं, तर ह्याने लागलीच ढगांशी शर्यत लावावी..!
जणू आपण एखाद्या सुंदरशा फुलपाखराचा पाठलाग करावा, नि त्याने आपल्या हाती बिलकूल न येता आपल्याला पळ पळ पळवावं..
आयुष्य तर किती एकसारख्या अशा हुलकावण्या आपल्याला देत असतं ना! अगदी आता-आता आपलं सारं सुख, आपला आनंद, किंवा आयुष्याचं मर्म आपल्या जवळ दिसू लागलंय, म्हणेपर्यंत निसर्गाने कूस बदलून घ्यावी, साऱ्या दिशाच विस्कटून, टाकाव्यात, असे काहीसे खेळ चालू असतात त्याचे!
न जाणो! हा सगळा.. स्वकेंद्रित भावनांचा खेळ असतो… किंवा आपल्या कल्याणासाठी..कदाचित आपल्यातील प्रत्येकासाठी, कोण्या अद्भूत शक्तीने केलेली, काही अतर्क्य तरतूद…!
— प्रज्ञा वझे घारपुरे
Leave a Reply