नवीन लेखन...

असहमती… पण आदर राखून

१८६० च्या निवडणुकीत आपल्या विरुद्ध निवडणूक लढलेल्या राजकीय विरोधकांना आपल्या मंत्रीमंडळात सामील करण्याचा निर्णय अब्राहम लिंकन यांनी घेतला होता. (संदर्भ- “टीम ऑफ रायव्हल्स – दि पोलिटिकल जिनियस ऑफ अब्राहम लिंकन “)

यांवर लिंकनचा खुलासा असा होता- देशाला पुढे नेण्यासाठी कणखर, बलदंड आणि कर्तृत्ववान अशा लोकांची गरज आहे आणि मला खात्री आहे- मी निवडलेली विविध क्षेत्रातील माणसे या निकषात बसतात.निवडणुकीत फक्त माझ्या विरुद्ध लढले या एकाच कारणास्तव देशाने अशी बुद्धिमान, कार्यक्षम माणसे / नेते गमावणे योग्य होणार नाही.

या विचारसरणी वरून लिंकनचा आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण अधोरेखित होतात.

एकाचवेळी देश बांधताना, त्याची धोरणे नव्याने तयार करीत असताना ही विचारधाराच लिंकनचे वैशिष्ट्य दाखवून देते.

दुर्दैवाने सध्या सगळेच राजकीय नेते आणि लोकप्रिय मंडळी “माझ्यासह किंवा माझ्याविना ” हा बाणा राबविताना दिसतात आणि “अंध “पाठिंब्याची आस धरतात. त्यांचे पाठीराखे “येस सर ” वृत्तीचा अवलंब करतात आणि “अहो रूपं, अहो ध्वनी “च्या मंत्राचा उद्घोष करताना दिसतात. त्यांना स्वतःभोवती अशा मंडळींचा जमाव आणि “हो ला हो ” म्हणणारे स्तुतिपाठक हवे असतात, विरोधी सूर/स्वर त्यांना खपत नाही, लगेच तलवारी उपसल्या जातात. .

पण व्यवसायातील अग्रणी, नामवंत बिझिनेसमन प्रत्यक्षात याउलटचा पवित्रा अवलंबत असतात. “कमांड आणि कंट्रोल ” या विचारसरणीचा दिवसेंदिवस पराभव होताना त्यांना दिसत असल्याने, ते सगळ्यांनाच, सदैव उपलब्ध असतात. आपल्या पूर्वसूरींपेक्षा अगदी वेगळ्या विचारांच्या वाटेने जाणारी ही नवी मंडळी अधिक पारदर्शकतेचा मार्ग निवडताना आढळतात.

त्यांचे वागणे “ओपन बुक” सारखे असते आणि संस्थेतील सर्वांच्या टीकेला तोंड देण्यास ते कायम सुसज्ज असतात.

नेतृत्वाची ही नवी व्याख्या सध्या लोकप्रिय आहे आणि अनेक संस्थांमधील व्यवस्थापक यानुसार वागण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या सगळ्या ” विषादी “स्वरांचे भेंडोळे करून व्यवसायात टिकून कसे राहायचे, पुढे मार्गक्रमण कसे करीत राहायचे याचा नवा विचार मूळ धरतोय. त्यातूनच नवी उत्पादने, नवीन उपाय सुचत जातात. म्हणजे सदैव “बरोबर” राहण्याचा अट्टाहास न धरता नवउद्यमी सध्या काय “योग्य “आहे असा मार्ग निवडत असतात.

रे डॅलिओ (” प्रिंसिपल्” या जगद्विख्यात पुस्तकाचा लेखक आणि नेतृत्व या विषयावरचा अग्रणी भाष्यकार) मानतो- संघात परस्परविरोधी स्वर हवेतच, ” वादे वादे जायते तत्वबोधः ” या तत्वावर त्याचा प्रगाढ विश्वास आहे. आपल्याला काय ऐकायला आवडते,तेच अवती-भवती सातत्याने बडबडणारी मंडळी आपले सर्वात जास्त नुकसान करतात.

डॅलिओ म्हणतो- “मानवजातीची सर्वात मोठी शोकांतिका काय असेल तर ती आहे- सत्य शोधनासाठी आवश्यक असलेली असहमती दर्शविण्याची लोकांची अकार्यक्षमता! ”

जीवन आणि व्यवसाय जगण्याचे त्याचे एक सारभूत तत्व आहे- ” वेगळ्या विचारांवर विश्वास ठेवण्याची तयारी. ”

निर्णय घेताना सगळी मते टेबलावर मांडायची पण अंतिमतः ठरविताना, ज्यांचा पूर्वानुभव सततचा मार्गदर्शक आहे,त्यांच्यावरच विश्वास ठेवायचा आणि इतरांचा आदरपूर्वक, न दुखविता दूर सारायचा.

लिंकनप्रमाणे अग्रगण्य नेते नेहमीच असहमत होणाऱ्यांना जवळ करतात आणि स्वतःच्या समजुती यानिमित्ताने तपासून घेत असतात. यातूनच निर्णयांची गुणवत्ता वाढते.

स्वतःच्या संघाची बांधणी करताना नेत्याने स्वतःला कायम विचारायचे असते- मला सर्वोत्कृष्ट संघ घडवायचा आहे का पोपटपंची करणाऱ्यांचे प्रतिध्वनी ऐकायचे आहेत.?

हा प्रश्न तुमचा वारस ठरवीत असतो.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..