श्री कांतजींच्या निधनानंतर काही दिवस मी कार्यक्रम करणे थांबवले होते. आमच्या स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीत मात्र दिवसभर गाणे शिकवायचो. एक दिवस एक तरुण मुलगा गाणे शिकण्यासाठी आला. तो म्हणाला,
“मला गाणे शिकायचे आहे सर, पण मला गायक बनायची इच्छा नाही.” मला नवलच वाटले. मी विचारले,
“मग तुला गाणे का शिकायचे आहे?”
त्यावर तो म्हणाला, “मला संगीतकार बनायचे आहे. मी बांधलेल्या स्वररचना मला इतर गायकांकडून गाऊन घ्याव्या लागतील. ते योग्य गात आहेत की नाही ते पहावे लागेल. या दृष्टीकोनातून मला गाणे शिकवा सर!”
मी चकितच झालो आणि मला त्या मुलाचे खूप कौतुक वाटले. कारण आपल्याला पुढे नक्की काय करायचे आहे ते त्याला ठाऊक होते. माझ्या दृष्टीनेही हे एक वेगळे आव्हान होते. मी हे आव्हान आनंदाने स्वीकारले. त्यानेही संगीतात अल्पकाळात मोठी प्रगती केली. हा मुलगा म्हणजे मला ‘वेड लागले प्रेमाचे’ ह्या लोकप्रिय गाण्याचा संगीतकार चिनार-महेश मधील चिनार खारकर. लवकरच हा माझा शिष्य माझा संगीतकार झाला. त्याच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘४०५ आनंदवन’ आणि ‘सासू पाहून लग्न करा’ या व्यावसायिक नाटकांसाठी मी पार्श्वगायन केले. ‘चुटकी’ या मराठी चित्रपटासाठीदेखील मी एक गाणे गायले. चिनार-महेशसाठी रेकॉर्डिंग करणे हा आजदेखील एक आनंददायक अनुभव असतो.
अजून एक नवीन संगीतकार हेमंत साने यांच्याबरोबर मी मराठी गझलचे एक प्रोजेक्ट केले. ‘ऋतुरंग संगतीला’ या मराठी गझलच्या सीडीसाठी मी तीन गझल गायल्या. माझ्याबरोबर स्वप्नील बांदोडकर आणि गौरी कवी हे कलाकारही होते. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते या सीडीचे प्रकाशन झाले.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply