नवीन लेखन...

असाही पोलिसांचा वापर… दृढ विश्वास पोलिसांवरचा

सर्वसाधारण समाज व भारतीय समाज व्यवस्था ही भारताच्या घटनेला अनुसरुन साकारलेली आहे. अशी समाज व्यवस्था सुव्यवस्थित रहावी, सुरक्षित रहावी या करीता एक विभाग पूर्वापार कालापासून स्थापन केलेला आहे आणि तो विभाग म्हणजे ‘पोलीस दल’ हे आहे. भारतीय लोकशाही मध्ये अंतर्गत सुरक्षा राखणे व कायदयाची अंमलबजावणी करणे हे मुख्यत्वे पोलीस खात्याचे काम आहे.

आपल्या देशाच्या सिमेवर देशाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय सैन्य दल तर अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस दल काम करीत आहे. अंतर्गत सुरक्षितते बरोबरच लहान-सहान घटना असतील किंवा २६/११ सारखा देशावरील अतिरेकी हल्ला असो, नैसर्गिक आपत्ती असो अगर कोणतेही मोठे संकट येवो, त्या ठिकाणी हजर राहण्याबाबत आदेश प्राप्त झाले न झाले तरी केवळ अशा घटनेची माहिती मिळताच प्रथम पोलिसच तेथे धावून जात असतो. ती त्याची जबाबदारी असते पण सर्वात महत्वाचे. तो ते स्वत:चे कर्तव्य समजूनच तेथे हजर झालेला असतो.

सण, उत्सव, मेळावे, मोर्चे, संप, सभा अनेक आंदोलन या ठिकाणी तर अगोदरपासूनच पोलीस आपली हजेरी लावत असतात. पण तेच जर पोलीस दिसले नाहीत तर मात्र जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण होते. पोलीस हजर असतांना काही घटना किंवा अनुचित प्रकार घडत नाहीत, असे मुळीच नाही. परंतु तो खाकी वर्दीवाला अधिकारी किंवा अंमलदार हजर असला म्हणजे सहजा सहजी कोणी गुन्हा करण्यास धजावत नाही.

पोलीस हा समाजातील एक महत्वाचा परंतु दुर्लक्षित असा घटक आहे. जनतेमध्ये पोलिसांचे अस्तित्व सर्वांना हवेहवेसे वाटत असते. परंतु कायद्याची अंमलबजावणी करतांना मात्र त्याच पोलिसांचा मनोमन राग येत असतो किंबहुना तो पोलीस नकोसा वाटू लागतो.

बरीच भारतीय जनता हल्ली कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी परदेश वाऱ्या करु लागली आहे. परदेशात काही दिवस वास्तव्य करुन स्वदेशात परत आल्यानंतर ते लोक त्या कायदयाचे व अस्तित्वात असलेल्या नियमांबाबत तोंडभरुन कौतुक करतांना दिसतात. आपल्या देशात राहून आपणच कायदे मोडायचे, नियमांचे उल्लंघन करायचे आणि बाहेरच्या देशांचे गोडवे गायचे ही कोणती मानसिकता आहे ते समजत नाही.

अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला जरी एखाद्या पोलिसाने हटकले तरी त्याचा ‘मी’ पणा जागा झाल्याशिवाय रहात नाही. लगेच त्याच्या मनाला ठेच लागते, मानहानी होते, अपमान होतो.

अरे पण पोलिसाने तुला त्याच्या घरचे काही काम सांगितले होते का? फक्त कायदा पाळण्याचाच आग्रह केला होता ना? मग का एवढं अकांडतांडव करतोयस?

आज समाजमनाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज भारतीय समाजाला प्रबोधनाची गरज आहे असे आपण सर्व म्हणत असतो, पण प्रबोधन झाल्यानंतर ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याची मानसिकता असलेले थोडेथोडकेच असतात. भारताचे आदरणीय पंतप्रधान स्वत: हातात झाडू घेऊन “स्वच्छ भारत” चा नारा देत आहेत. हा त्यांनी केलेला प्रबोधनाचाच एक स्तुत्य प्रयत्न आहे.

ज्याप्रमाणे संतमंडळी त्यांच्या मधूर वाणीतील प्रवचनातून प्रबोधन करीत असतात, त्याचप्रकारे पोलीस हा देखील त्याच्या कर्तव्यातुन कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाज प्रबोधनाचे काम उत्तमरित्या करीत असतो. आज काही समाजविघातक तत्वे “पोलिसांना थोडावेळ बाजूला करुन बघा, आम्ही काय (विनाश) करतो ते’. असे छाती बडवून सांगत आहेत. त्याचे हे ते बेलगाम वक्तव्यच समाजात ‘पोलीस’ हा घटक किती अत्यावश्यक आहे, हे पटविणारे आहे. अशा समाजविघातक व कायदा न पाळणाऱ्या लोकांसाठी पोलिसांच्या हातात दंडूका दिलेला असतो व त्याचबरोबर त्यांच्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्यातच पोलिसांच्या कामाचे स्वरुप दडलेले आहे. सज्जनांचं रक्षण व दुर्जनांचं निर्दालन करुनच पोलीस समाजव्यवस्था सुस्थितीत चालवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याकरीता समाजात ‘पोलीस’ या घटकाची नितांत गरज असते. परंतु आज देखिल समाजामध्ये काही घटक असे आहेत की, जे पोलीस दलाचा, त्यामधील व्यक्तींचा गैरवापर कधी स्वत:च्या स्वार्थासाठी, तर कधी हेतूपुरस्कार, खोडसाळपणे करतांना दिसतात.

आजकाल तर आधुनिक तंत्रज्ञानाची अनेक द्वारे सहज रित्या उपलब्ध झालेली आहेत. अशा अत्याधुनिक साधनांपैकी मोबाईल हे यंत्र तर लोकांच्या हातात मिळालं आहे. ज्या कोणी हया मोबाईलचा शोध लावून गतीमान समाज बनविला आहे, त्यामुळे समाजाच्या पर्यायाने देशाचा विकास साध्य झाला आहे. परंतु आपल्या समाजात अशी एक मानसिकता दिसून येते, ती म्हणजे चांगल्या कामातून किंवा संशोधनातून समाजासाठी काही हिताच्या गोष्टी न करता त्याचा गैरवापर करुन समाजाचं स्वास्थ्य बिघडेल, असे प्रकार केले जातात. मग अशा वेळी गैरवापर करुन घेण्यासाठी एकमेव घटक २४ तास जनतेत असतो तो म्हणजे, ‘पोलीस’! त्याला काहीतरी खोटे फोन करायचे, अफवा पसरवायच्या, जनतेमध्ये घबराहट पसरवायची, अशी कामे काही विकृत मनोवृत्तीचे लोक करीत असतात. जो कोणी असा एखादा फोन करुन पोलिसांना खोटी माहिती देतो किंवा प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांचा वापर करुन घेतो, अशा लोकांना, ना कायदयाची भिती, ना पोलिसांची भिती असते. कायदयामध्ये असलेल्या अनेक पळवाटांचा वापर करुन, असे समाजकंटक गुह्यातून सहिसलामत सुटतात. आणि वर आपण कस कायदयाच्या कचाटयातून सुटले, याची समाजात शेखी मिरवितांना दिसतात.

पोलिसांचा वापर विनाकारण करुन घेण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करतांना अनेकजण दिसतात. आम्हा पोलिसांना तर असे अनुभव पदोपदी येत असतात. काही वेळेला एखाद्या घटनेकडे दुर्लक्ष करावं म्हटलं, तर लोकटिकेची व शिस्तभंगाची भिती मनामध्ये असते. त्या घटनेबाबत प्रत्यक्ष जाउन खात्री केली, तर त्या ठिकाणी काहीही घडलेलचं नसतं. परंतु पोलिसांची मात्र उगाच धावपळ होत असते.

पोलिसांकरीता धावपळ ही गोष्ट काही नविन नाही. पण केलेली धावपळ, केलेले कष्ट, जर वाया गेले तर मग भ्रमनिरास होतो. अशा वेळी पोलिसांकडून थोडी जरी चूक झाली तर समाज त्यावेळी राईचा पर्वत करुन सर्व पोलिस दलाला टिकेचं लक्ष्य करुन त्याची अभ्रु वेशीवर टांगतो.

असे अनेक अनुभव पोलिस दलात नोकरी करतांना येत असतात. त्या अनुभवांपैकीच एक किस्सा मी आपल्याला सांगणार आहे……..

आपल्या उत्सवप्रीय भारतीय समाजात सण आणि उत्सवांना काही मर्यादा नाहीत. मर्यादा हा शब्द एवढयाचसाठी वापरला, कारण आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये एक वेळ सण उत्सव सुरु झाले की त्याची मालिकाच सुरु होते. असे सण-उत्सव सुरु झाले की, पर्यायाने पोलिसांना त्या ठिकाणी हजर होवून सर्व जनता सण उत्सव आनंदात साजरी करुन होईपर्यंत डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करणे भाग असते. जनतेच्या आनंदामध्येच तो आपला आनंद पाहात असतो. अशाच एका वर्षी नेहमीप्रमाणे श्री गणेश उत्सव सुरु होता.

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील खेडयापाडयांपासून ते मोठ्या शहरापर्यंत ठिकठिकाणी श्री गणेशाची स्थापना करुन उत्सव साजरा करतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्व भारतीय जनतेला एकत्र आणून ब्रिटीशांविरुध्द लढण्यासाठी, त्यांच्यात एकजुट निर्माण करण्याच्या उद्देशाने मा. लोकमान्य टिळकांनी ‘सार्वजनिक गणेश उत्सव’ हा सण सुरु केला. परंतु आज जो समाजात गणेश उत्सव साजरा केला जात आहे, ते पाहिले म्हणजे आमचा समाज कोठे चालला आहे, हे सर्वसामान्यांना कळत नाही, हे आमच्या लोकशाहीचं पर्यायाने देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल.

अशाच एका श्री गणेश उत्सवाच्या वेळी एका शहरात बंदोबस्ताकरीता हजर असतांना एका अजब व्यक्तीचं दर्शन घडलं. गणेश उत्सवाच्या काळात पुणे, मुंबई या मोठ्या शहरांत वेगवेगळ्या भागांत, गल्ल्यांमध्ये काही मानाचे गणपती तर काही पूर्वापार प्रसिध्द गणपती उत्सव मंडळे दिसून येतात. मग आमचा हा सर्वसामान्य माणूस त्या विधात्याचं दर्शन घेण्यासाठी लांब-लांबून येत असतो.

अनेक मंडळांना भेटी देऊन तेथील वेगवेगळे गणपती, त्या गणपतीच्या ठिकाणी केलेली मनमोहक आरास पाहात असतात. काही लोक एकटे येतात, काही कुटुंबियांसह तर काही लोक आपल्या मित्रमंडळींसह गणेश दर्शनासाठी अलोट गर्दी करीत असतात. मग अशा वेळी आपोआपच पोलीस यंत्रणेवर ताण वाढतो.

जमलेल्या लोकसंख्येच्या मानाने पोलीस बळ अत्यल्प असते, अशा वेळी पोलिसांची तारेवरची कसरत सुरु होते. साप्ताहीक सुट्टी बंद, ऑन ड्युटी २४ तास, रस्त्यावर तासंतास उभं राहून कर्तव्य बजावायचं असतं.

आम जनतेला माझी विनंती आहे की, ‘एक वेळ कल्पनेतील पोलीस होऊन पहा. त्याच्या वर्दीच्या आतील माणूस नावाच्या प्राण्याला जवळून पहा, म्हणजे अशा वेळी काय अवस्था असते. त्याची प्रचिती येईल. सतत तो कर्तव्यात कोणतीही कसुरी न करता, उत्सव शांततेत कसा पार पडेल यासाठी प्रयत्नशिल असतो व मनोमन त्याच्या बंदोबस्ताच्या जागेवरुनच त्या गणरायाला त्यासाठीच आळवित असतो.

गर्दीमध्ये समाज कंटकांवर नजर ठेवायची, काही विक्षिप्त, पांचट लोकांपासून महिलांना त्रास होणार नाही, याकडे लक्ष ठेवायचं, कोणी लहान मुलं हरवली, तर त्यांना शोधायचं, जी मुलं सापडली असतील, त्यांच्या नातेवाईकांना शोधून, त्यांना त्यांच्या स्वाधीन करायचं, अशा एक ना अनेक कामांमध्ये कंटाळा न करता त्याला तत्पर रहावे लागते. कधी तो नम्रपणे तर कधी कठोरपणे त्याचे काम/कारवाई करीत असतो.

अशाच एका ठिकाणी गणेश उत्सवामध्ये बंदोबस्त करीत असतांना (मी या ठिकाणी मुद्दाम त्या ठिकाणाचे व त्या व्यक्तीचे नांव देण्याचे टाळत आहे.) माझ्या एका पोलीस अंमलदाराने पोलीस मदत केंद्रात (मोठया बंदोबस्ताच्या ठिकाणी तात्पुरते तंबू (Tent) उभारले जातात, त्याला मदत केंद्र असं म्हणता). एक ४ ते ५ वर्षाच्या मुलाला हजर करुन, तो मुलगा गर्दीत सापडल्याचं सांगितलं व त्या मुलाला तेथे हजर असलेल्या स्टाफच्या ताब्यात देऊन, तो त्याच्या नेमलेल्या जागी कर्तव्यासाठी निघून गेला.

संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. लोकांची गर्दी वाढत होती. अधुन-मधुन एखादी पावसाची सर येत असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

काही अंमलदार तसेच मंडळाचे स्वयंसेवक सापडलेल्या मुलाबद्दल लाऊडस्पिकरवरुन माहिती देत होते. जी मुलं हरवली आहेत, त्यांचे वर्णन सांगून लोकांना मदतीचे आवाहन करीत होते. काही मुलांचे पालक चिंतेमध्ये पोलिसांना वारंवार प्रश्न विचारुन हैराण करीत होते. ज्या पालकांची मुलं हरवली होती ती मिळेपर्यंत ते पालक व पोलीस सुध्दा अतिशय काळजीमध्ये वावरत होते. एखादं मुल त्या गर्दीत सापडलं तर आई-वडिलांच्या आनंदाला पारावार रहात नव्हता. दोन्ही हात जोडून ते नम्रपणे, पोलिसांनी धन्यवाद देत व त्या विधात्याचे आभार मानून घरचा रस्ता धरत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व डोळयातील आनंदाश्रू आम्हा पोलिसांनाही कर्तव्य केल्याचं समाधान व आनंद देऊन जात होते.

अशा गर्दीच्या वेळी जो एक ४ ते ५ वर्षांचा सापडलेला मुलगा एका अंमलदाराने आणून दिलेला होता, त्याचे अद्याप पालक मिळालेले नव्हते. रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजत आले होते. तो मुलगा रडून कासाविस झाला होता. आमच्या महिला पोलीस त्याला खाऊ देत होत्या, अधुन मधुन पाणी प्यायला देत होत्या. हळुहळु तो मुलगा देखिल पोलिसांमध्ये रमलेला दिसत होता. महिला पोलिसांनी त्याला आपलसं केलं होतं. परंतु त्याचे पालक मिळत नसल्याने, जसजशी रात्र पुढे सरकत होती, तसतशी पोलिसांची चिंता वाढत होती. आणि त्याच वेळी एक जोडपे पोलिस मदत केंद्रात आले. त्यांना पाहाताच त्या महिला पोलिसांजवळ बसलेल्या मुलाने पळत जाऊन त्याच्या आईला मिठी मारली व रडू लागला. त्या बाईने मुलाला उचलून घेऊन शांत केलं. तो मुलगा आता खुष झाला होता.

त्याला त्याचे आई-वडील मिळाले होते.

त्याच बरोबर पोलिसांच्या मनावरील ताणसुध्दा कमी झाला होता.

त्या मुलाला महिला पोलीस अंमलदाराने त्या पालकाच्या ताब्यात दिले.

त्यांनी पोलिसांचे आभार मानले. परंतु माझ्या पोलिसी नजरेतून एक गोष्ट सुटली नाही, ती म्हणजे त्या दांपत्यापैकी आई किंवा वडिलांपैकी कोणाच्याही  चेहऱ्यावर मुलगा हरवल्याबद्दलची चिंता काळजीचा लवलेशही दिसत नव्हता.

एरव्ही एखादं मुल एक-दोन तासांसाठी देखिल हरवलं असेल, तर त्याचे आई-वडिल काळजीने कासावीस झालेले आणि मूल सापडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, हे सर्व मी पाहिले होते. परंतु हे दांपत्य मात्र त्या सर्वांहून वेगळे असल्याचे त्यांच्या निर्विकार चेहऱ्यातून मला स्पष्ट दिसत होते. आणि त्यामुळेच माझ्या पोलिस आणि त्या पोलिसातील चौकस बुध्दी अधिक ताजी-तवानी झाली. मी पुढे होऊन, त्या गृहस्थाच्या खांदयावर हात ठेवून त्याला विचारलं,

“साहेब, कुठं राहता तुम्ही? ”

“सर, मी कल्याणला राहतो”, त्याने उत्तर दिलं.

“किती वेळापासून तुमचा मुलगा हरवला होता? ” मी विचारलं.

“सर, संध्याकाळी साधारण सहा-साडेसहा वाजता हरवला होता. ” तो

म्हणाला.

“मग, तुम्ही मागच्या चार-पाच तासांत तुमच्या मुलाला शोधण्यासाठी कुठे-कुठे गेला होता? कोणत्या पोलिसाकडे तक्रार केली होती? ” मी विचारलं.

मी सहजपणे विचारलेल्या दोन-चार प्रश्नांची उत्तरं देतांना त्या गृहस्थाचे त-त-प-प झालं होत. तो अडखळत व असंबंध असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु माझ्या प्रतिप्रश्नांनी त्याला आणखीनच गोंधळात टाकलं होतं. माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, तो काहीतरी लपवित आहे. साधा सरळ निसर्गनियम आहे.

‘माणूस सत्य गोष्ट स्पष्ट आणि बेधडकपणे बोलतो, परंतु खोटे बोलण्यासाठी त्याला थोडा विचार करुन, ठरवून बोलावं लागतं.

मी विचारलेल्या प्रश्नांनी तो गृहस्थ व त्याची पत्नी पुरती गोंधळून गेली होती. “बोला साहेब, खरं सांगा, खरा काय काय प्रकार आहे? ’’ मी थोडा अंदाज घेत, त्यांच्याकडून सत्य उगळण्यासाठी प्रश्न केला असता, ते एकमेकांकडे गोंधळलेल्या नजरेने पाहू लागले.

“तुमचा मुलगा तुम्हाला मिळाला आहे. आता काळजी नाही. सांगा. नक्की तुमचा मुलगा गर्दीत हरवला होता की, तुम्ही मुद्दाम त्याला सोडला होता? ”

आता मात्र माझ्या या प्रश्नाने एखाद्या बाणाने जखमी झालेल्या हरिणासारखी त्या गृहस्थाची अवस्था झाली.

त्या गृहस्थाने आपल्या बॅगेतील पाण्याची बाटली बाहेर काढली. त्यातील दोन-तीन घोट पाणी पिऊन बाटली पुन्हा बॅगेत ठेवत तो म्हणाला, ‘साहेब, माफ करा, आम्ही तुम्हाला नाहक त्रास दिला. ”

‘काय कारण? कशासाठी त्रास दिलात, जरा सविस्तर सांगितलं तर बरं होईल”. मी म्हणालो. कारण आता माझ्यातील पोलीस त्या गृहस्थाला दाखवायचा होता.

‘‘माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मिस्टर.” मी थोडा आवाज चढवून म्हणालो.

माझा चढलेला आवाज ऐकताच, पती-पत्नी दोघांनीही हात जोडले व म्हणाले, “साहेब, आम्हाला माफ करा. खरं काय ते सांगतो”

“बोला, काय प्रकार आहे? ” मी पुन्हा विचारले.

“साहेब आम्ही कल्याणला राहतो. मी रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. त्यामुळे बऱ्याच पोलिसांना मी ओळखतो आणि पोलिसांच्या कोणत्याही कामात मदत देखील करीत असतो. ” असे सांगून तो पुढे बोलू लागला.

“साहेब, ही माझी बायको, मुलगा आणि मी यावर्षी पहिल्यांदाच मुंबईचे गणपती बघण्यासाठी आम्ही दुपारी घरातून निघालो. संध्याकाळी पाच वाजता गणपती पाहायला सुरुवात केली. एक-दोन गणपती बघेपर्यंतच ह्या आमच्या पोराने भंडावून सोडलं. कधी उचलून घे, तर कधी फुगा दे, तर कधी खायला दे व नंतर घरी चल.. म्हणून रट लावली होती. एक-दोन चापट्या लावल्या तरी ऐकेना. एक तर आम्ही पहिल्याच वेळी गणपती बघायला एवढ्या लांब आलो….. तर ह्या पोरानं असं डोकं उठवलं की काय सांगू तुम्हाला.” असं म्हणून तो गृहस्थ थांबला. खिशातून रुमाल काढून तोंडावरुन फिरवून, पुढे बोलू लागला.

“साहेब, आम्हाला गणपती बघायचे होते, पण पोर ऐकत नव्हतं. मग मी माझ्या बायकोला म्हणालो, “हे बघ आता आपण जाऊया घरी.”

“अहो, असं काय करता? तुम्ही जरा वेळ घ्या त्याला, मग मी जरा वेळ घेते. पण इथले सगळे गणपती बघूनच जाऊया” बायको म्हणाली.

मग पुन्हा आम्ही थोडावेळ फिरलो. पण पुन्हा ह्या कारट्याने सतवायला सुरुवात केली.” तो गृहस्थ म्हणाला.

“अहो मिस्टर महत्वाचं बोला. बाकी तुमचं गुऱ्हाळ बंद करा.” मी म्हणालो.

“साहेब खरं सांगतो. मी गेली १० वर्षांपासून रिक्षा चालवतो पोलिसांबद्दल माझा अनुभव खूप चांगला आहे. मी विचार केला, पोलिसांइतकी दुसरी कोणतीच सुरक्षित जागा नाही. म्हणून मी मुद्दामहून माझ्या मुलाला पोलिसाच्या बाजूला उभा करुन, हळूच गर्दीत सामिल होऊन मी व माझी पत्नी दुरुन मुलाकडे पहात होतो. जेमतेम पाच मिनिटांतच आम्ही न दिसल्याने आमच्या मुलाने रडण्यास सुरुवात केली. तो रडत असल्याचे पाहून बाजूला असलेल्या पोलिसाने त्याला जवळ घेतले, त्याच्याशी बोलू लागला.

नंतर पोलिसाने माझ्या मुलाला उचलून घेतले, ” तो गृहस्थ गळ्याला हात ‘

लावून शपथ घेत म्हणाला, “साहेब, माझी खात्री होती, माझा मुलगा पोलिसांच्या हातात आहे, त्याला काहीही होणार नाही आणि तो कोठेही जाणार नाही. म्हणून मी व माझी पत्नी पाच-सहा गणपतींचे दर्शन घेवून आलो. एवढं बोलून त्या गृहस्थाने एक मोठा श्वास घेउन पुन्हा दोन्ही हात जोडून म्हणाला, “साहेब, एक वेळ माफ करा. पुन्हा असं नाही करणार.

त्या गृहस्थाने पूर्ण शरणागती पत्करली होती. दोघेही गयावया करुन म्हणाले, “साहेब, आता तुम्ही काहीही शिक्षा करा, गुन्हा कबूल आहे”.

त्या गृहस्थाने तसा कोणताही गुन्हा केलेला मला दिसत नव्हतं. फक्त त्या दोघांनी पोलिसांचा वापर पध्दतशीरपणे आपल्या स्वार्थासाठी केला होता.

“जर तुमच्या मुलाला पोलिसांनी पाहिलं नसतं, आणि एखाद्या दुसऱ्या कोणा गुंडाच्या तावडीत तो सापडला असता, तर काय प्रसंग ओढवला असता, तुमच्यावर आणि आमच्यावर देखिल? ” मी विचारलं.

त्या गृहस्थाने माझे दोन्ही हात हातात घेऊन, स्वत:च्या कपाळाला लावले व म्हणाला, “साहेब चूक झाली, माफ करा. पण साहेब एक गोष्ट छातीठोकपणे सांगतो. आमचे पोलिस जनतेच्या सदैव बरोबर असतात, म्हणूच ही जनता सुखानं घरी झोपते !.

“साहेब, मी माझ्या पोटच्या गोळ्याला ज्या विश्वासाने, त्या पोलिसाजवळ सोडून बाजूला गेलो व ज्या क्षणी पाहिले की, त्या पोलिसाने माझ्या मुलाचा हात हातात धरला, त्या क्षणीच मी पुरता निश्चींत झालो व पत्नीला म्हणालो, “चल आता बिनधास्त पाहिजे तितका वेळ गणपती दर्शन घेऊन परत येऊ.” तो गृहस्थ एवढं बोलून थांबला.

काय बोलावं हे मला कळत नव्हतं. एकीकडे खूप राग आला होता. परंतु त्या गृहस्थाने पोलिसांच्या प्रती दाखविलेला विश्वास आणि त्याला पोलिसांबद्दल असलेला आपलेपणा यामुळे मनाला थोडं बरं वाटलं. सध्याच्या  कलीयुगात देखिल कोणीतरी पोलिसांना चांगलं म्हणणारं आहे, नाहीतर पोलिसांना सदैव टीकेला व रोषाला बळी पडावं लागतं.

त्या गृहस्थाने स्वत:च्या स्वार्थाकरीता “पोलिसांचा असाही वापर करुन घेतला होता. पण त्याने कबूली देऊन, माफीही मागितली होती आणि पोलिसांवर अपार विश्वास दाखविला होता.

शेवटी मी ही वर्दीच्या आत माणूसच होतो. कधीकधी जनतेने चूक केली तर दुर्लक्ष करावं लागतं.

आता केव्हाही एखादे हरवलेले किंवा सापडलेले मूल मिळाले की माझ्या डोळ्यासमोर तो रिक्षावाला उभा राहतो आणि माझा मीच म्हणतो, ‘असाही पोलिसांचा वापर’ होतो.

व्यंकट पाटील

व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.

Avatar
About व्यंकट भानुदास पाटील 15 Articles
सहायक पडोलिस आयुक्त या पदावरुन निवृत्त झालेले श्री व्यंकटराव पाटील ह पोलीस कथा लेखक आहेत तसेच त्यांच्या कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..