नवीन लेखन...

असे गुरू ! असेही गुरू !

१. असे गुरू : ( प्राचीन-अर्वाचीन ) :
गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूपूजेसाठी किंवा गुरूस्मृती जागवण्यासाठी असतो. शतकानुशतकें आपल्या संस्कृतीत गुरूचें महत्व अधोरेखित केलें गेलेलें आहे. खालील संस्कृत श्लोक प्रसिद्धच आहे –

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:
गुरुर्साक्षात् परब्रह्म: तस्मै श्रीगुरवे नम: ।

संत कबीर यांचा दोहासुद्धा प्रसिद्ध आहे –
गुरु गोविन्द दोऊ खड़े, काके लागूँ पाँय ?
बलिहारी गुरु आपकी, गोविन्द दियो बताय ।

एका अन्य पदामध्ये रचयिया म्हणतोच –
गुरुबिन ज्ञान कहाँ से पाऊँ ?

दत्तात्रेयाच्या एका भजनात म्हटलेलें आहे –
स्मरा स्मरा रे दत्तगुरू । दत्तगुरू भवतापहरू ।।
ध्यानीं घ्या, रचयिता इथें दत्ताला ‘देव’ म्हणून भजायला सांगत नाहीं ; तर ‘गुरू’ म्हणून स्मरायला सांगतो आहे.

माझ्यासारखा एक ‘अदना-सा’ कवीही म्हणतो –
गुरु की गरिमा का बरनन सब बड़ों बड़ों ने है किया ।
*
शास्त्रीय संगीतात गुरुचें स्थान अतिशय महत्वाचें मानलें जातें. त्या क्षेत्रातील प्रत्येक गायक-वादक आपल्या गुरूंचें नांव काढतांच कानाच्या पाळीला हात लावून आपला आदर व्यक्त करतो. संगीत क्षेत्रातील व्यक्तींना तर गुरुपौर्णिमेचें फारच महत्व. संगीत क्षेत्रामधील थोर व्यक्ती आपल्या गुरूच्या स्मरणार्थ उत्सवही साजरा करतात जसें की पं .भीमसेन जोशी यांनी सुरूं केलेला ‘सवाई गंधर्व महोत्सव’. पं. देवधरही विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या स्मरणार्थ मैफलींचें आयोजन असत. या व अशा अन्य, गुरुस्मरणार्थ आयोजलेल्या संगीतोत्सवांमध्ये आपली कला सादर करणें याला गायक-वादक आपलें महद्.भाग्य समजतात. शास्त्रीय संगीतात गुरुला उल्लेखून बांधलेल्या चिजाही आहेत. एकीत गायक, ‘गुरुजी ऽ ’ अशी गुरुला साद घालतो. पं. भीमसेन जोशी व विद्वान डॉ. बालमुरलीकृष्णन् यांच्या सहगायनातील ‘भज रे गुरुदेवम्’ हें भजन प्रसिद्धच आहे. वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये व लेखांमध्ये ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक-वादकांनी ( उदा. विदुषी किशोरी आमोणकर , उस्ताद अल्लारखा खाँ , विदुषी धोंडूताई कुलकर्णी इ.) आपल्या गुरूचें आपल्या जीवनातील महत्व सांगितलें आहे व आपल्याला दिलेल्या कलाज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.
*
उस्ताद या शब्दाचा अर्थ ‘हुशार, ज्ञान असलेला, expert, wise’ असा होतो ; तसेंच ‘गुरु’, ‘शिक्षक’ असाही होतो. कुस्तीच्या क्षेत्रात उत्तर भारतात तालमीतल्या गुरूला ‘उस्ताद’ म्हणतात, तर मराठीत ‘वस्ताद’. अर्थात्, इथें ‘वस्ताद’ चा अर्थ ‘उस्ताद’ म्हणजे ‘गुरु’ असाच होतो.

उर्दू शायरीच्या क्षेत्रातही गुरूला ‘उस्ताद’ म्हटलें जातें. थोर शायर ‘ज़ौक़’ हा, शेवटचा मुघल बादशहा बहादुरशहा जफ़र याचा शायरीतला गुरू होता. शिष्य आपल्या उस्तादाकडे आपली शायरी ‘इस्लाह’ साठी (सुधारण्यासाठी) देत असत. प्रसिद्ध मराठी गझलकार सुरेश भट यांनीसुद्धा बर्‍याच तरुण शायरांना इस्लाह देलेली आहे. ते ‘शिष्य’ आज स्वत: प्रसिद्ध गझलकार झालेले आहेत, अणि ते आवर्जून सुरेश भटांचें ऋण मान्य करतात.

पूर्वीच्या काळीं प्रत्येक क्षेत्रात ‘गुरू’ असत. पूर्वी व्यवसाय वंशपरंपरागत चालत असत, मग शेती असो, चर्मकारी असो, केशकर्तन असो, लोहारकर्म असो, वा कांहीं अन्य असो. त्या काळात मुलें आपल्या पित्याकडून किंवा कुटुंबातील अन्य ज्येष्ठांकडून व्यवसायातील खाचाखोचा शिकत असत. ते ज्येष्ठ म्हणजे त्या तरुणांचे गुरूच की.

पूजा सांगणार्‍या, धार्मिक विधी करवून घेणार्‍या, भटजींना म्हणजेच पुरोहितांना, ‘गुरुजी’ म्हणतात. तें कां, तर, पूर्वी, ज्ञानवंत ऋषी, नृप व सम्राट यांचे गुरू असत; आणि यज्ञयाग, होमहवन, वगैरे प्रसंगीं तेच पौरोहित्य करत. ती परंपरा चालूच राहून, आजही पुरोहितांना ‘गुरू’ म्हणून संबोधतात. त्याला ‘जी’ हा प्रत्यय मध्ययुगात लागला.
*
भारतात पूर्वी अशी परंपरा होती की मुलें एका विशिष्ट वयानंतर (जसें की १२ वर्षें वयाचें झाल्यावर ) गुरुकडून ज्ञानसंपादन करीत, जसें की श्रीकृष्णानें गुरु सांदीपनी यांच्या आश्रमात राहून ज्ञानार्जन केलें. सांदीपनी यांच्या, गुरु म्हणून श्रेष्ठत्वाबद्दल एवढें सांगणें पुरेसें आहे की, त्यांनी श्रीकृष्णासारखा श्रेष्ठ शिष्य तयार केला. द्रोणाचार्य स्वत: श्रेष्ठ धनुर्धर होतेच, पण त्यांचे मोठें महत्व हें की त्यांनी अर्जुनासारखा एकमेवाद्वितीय धनुर्धर घडवला.

गुरूचा प्रत्येक शिष्य श्रेष्ठत्व किंवा प्रसिद्धी पावेलच असें नाहीं , उदा. सुदामा. जो गरीब होता,अप्रसिद्ध होता . (पण तो किती विद्वान, किती ज्ञानवंत होता याचा उल्लेख केला गेलेला नाहीं ) . मात्र श्रीकृष्णासारखे श्रेष्ठ , अद्वितीय शिष्य घडवायला श्रेष्ठ गुरूच लागतात, हें निश्चित. चाणक्याचें श्रेष्ठत्व केवळ ‘कौटलीय अर्थशास्त्र’ व ‘चाणक्य सूत्रें’ रचली एवढेच नसून, त्यानें चंद्रगुप्त मौर्यासारखा शिष्य, सम्राट म्हणून तयार केला, खरेंतर हेंच आहे. विद्यारण्यस्वामींनी त्यांचे शिष्य हरिहर-बुक्कराय हे विजयनगर-साम्राज्याचे-स्थापक तयार केले, एवढेंच नसून त्यांनी स्वत: सुरुवातीच्या काळात त्यांचा ‘प्रमुख अमात्य’ म्हणूनही कार्य पाहिलें, व तिथेंही त्यांना मार्गदर्शन केलें. चाणक्यानेंही चंद्रगुप्ताचा ‘प्रमुख अमात्य’ बनून त्याला याच प्रकारें मार्गदर्शन केलें होतें. संत एकनाथांसारखा शिष्य असलेल्या जनार्दनस्वामींचे गुरू म्हणून महत्व वेगळें सांगायला लागत नाही. आपल्या अनेक रचनांमध्ये एकनाथ ‘एका जनार्दन’ असा उल्लेख करतात. ज्ञानेश्वरही ‘निवृत्तिदासु’ अशा नांवानें स्वत:ला म्हणत, आपले थोरले बंधू निवृतिनाथ यांच्या , ‘आपले गुरु‘ या श्रेष्ठ नात्याचा आदरपूर्वक उल्लेख करतात.

दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू होतें की नाहीं, या विषयावर हल्ली बराच वादंग माजलेला आहे. आपण त्यात जाऊं या नको. मात्र एक गोष्ट खरी की शिवराय बालवयाचे असतांना दादोजी पुण्यातच होते, आणि त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा शिवबांना नक्कीच उपयोग झालेला असणार , आणि त्या अर्थानें, (कांहीं अंशीं तरी ) दादोजी नक्कीच शिवबांचे ‘गुरू’ होते, आणि ते श्रेष्ठ गुरू होते. शिवबांच्या अन्य गुरूंबद्दलही तेंच म्हणावें लागेल, की ते श्रेष्ठ गुरू होते.

पुरातन ग्रीसमधील सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल, अशा फिलॉसॉफर्सची, जे श्रेष्ठ गुरुही होते, नांवें आदरानें घेतली जातात. अॅरिस्टॉटल ज्याचा गुरू होता, त्या सिकंदराला कोण विसरेल ?

आधुनिक काळातही आपल्याला असे श्रेष्ठ गुरू दिसतात. जागतिक कीर्तिची हेलन केलर हिची शिक्षिका
अॅन सुलिव्हान हिची अशा श्रेष्ठ गुरूंमध्ये गणना करावी लागेल. आणि, हेलनला अॅननें दिलेलें शिक्षण ही घटना १९व्या शतकाच्या अखेरची आहे, म्हणजे फार जुनी नव्हे.

रामकृष्ण परमहंस स्वत: एक थोर साधू तर होतेच, पण तितकेंच महत्वाचें त्यांचें कार्य आहे, स्वामी विवेकानंदासारखा शिष्य घडविण्याचें.

सचिन तेंडुलकर या विश्वविख्यात क्रिकेटरचे क्रिकेटमधील गुरू रमाकांत आचरेकर हे असेच, आधुनिक काळातले एक श्रेष्ठ गुरू.

प्रो-लीगमधील कबड्डीपटू सुरेंदर नाडा म्हणतो, ‘गुरूमुळेच कोणत्याही गोष्टीचें शास्त्रशुद्ध ज्ञान मिळतें’. (संदर्भ- लोकसत्ता मुंबई आवृत्ती, दि. १७.०७.१७). गुरूचें महत्व असें आहे.

सिक्ख ( शीख) पंथात गुरुला फार महत्व आहे. शिक्ख म्हणजे ‘शिष्य’. शिष्यांना गुरुचें महत्व असणारच.
आपल्याकडे म्हणच आहे, ‘ग्रंथ हेच गुरू’. शिखांनी ती त्यांच्या धर्मामध्ये प्रत्यक्षात उतरवली आहे. शिखांच्या दहा गुरूंनंतर, शिखांचा पवित्र ग्रंथ ‘ग्रंथसाहिब’ यालाच गुरू मानलें जातें, व त्याला ‘गुरु ग्रंथसाहिब’ म्हटलें जातें.
*
‘साधारण’ समजल्या जाणार्‍या व्यक्तीही ‘असाधारण गुरू’ असूं शकतात. माझे शाळेतील एक ‘गुरुजी’ , केळकर सर हे स्कॉलरशिपला बसणार्‍या विद्यार्थ्यांची, त्या परिक्षेसाठी शिकवणी विनामूल्य घेत असत, कां तर आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स चांगला व्हावा. त्याव्यतिरिक्त अनेक वर्षें त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवलें होतें, कां तर, शिकून ते विद्यार्थी जीवनात पुढे यावेत. हें कार्यही आधुनिक काळातलेंच आहे, साठएक वर्षांपूर्वीचें. हे ‘सर’ निवृत्तीनंतर पुणें येथें स्थायिक झाले. तेथेंही त्यानंतर, विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवण्याचें व्रत त्यांनी निधनापर्यंत सुरूंच ठेवलें होतें.
नंतर मी इन्दौरला उच्च-माध्यमिक शिक्षणासाठी होस्टेलमध्ये असतांना, एक सहाध्यायाला ‘प्लूरेसी’ झाली, व त्याचे वडील त्याला ट्रीटमेंटसाठी घरी घेऊन गेले ; बरा होईतो कांहीं महिने त्याला क्लासेस मिस् करावे लागले. पण प्रिंसिपॉल व शिक्षक इतके empathetic and considerate की, हजेरी कमी म्हणून त्याला penalize केलें नाहीं, एवढेंच नव्हे तर, त्याचे टर्मिनल परीक्षेचे कांहीं पेपर मिस् झाले होते, त्यांची खास परीक्षा घेतली ; एका हुशार मुलाचें वर्ष त्यांनी वाया जाऊं दिलें नाहीं . ही घटनाही २०व्या शतकाच्या ५च्या-६०च्या दशकातील, म्हणजे तशी आधुनिक काळातीलच.
असे गुरुजन, सांदीपनींसारखे, चाणक्यासारखे प्रसिद्ध होतील न होतील ; मात्र त्यांचें, गुरु म्हणून श्नेष्ठत्व त्याच दर्जाचें आहे, यात शंका नाहीं. Hats off to all such devoted great Gurus !
*
अशा प्रसिद्ध-अप्रसिद्ध, श्रेष्ठ गुरूंना माझा हा प्रणाम –
तृषितांची आस गुरू, शिष्यांचा ध्यास गुरू, विद्येचा श्वास, गुरु महान्
विश्वाचा आंस गुरू, ज्ञानद सुवास गुरू, देवांहुन खास, गुरु महान्
तोडी नेणीव-पाश , काजळिचा करि विनाश , घनतमीं प्रकाश, गुरु महान्
वंदावे थोर चरण, प्रथम तयाचें स्मरण, ब्रह्माहुनही पावन, गुरु महान् ।।
*
२. असेही गुरू : (हल्लीहल्लीचे ) :
पूर्वीच्या काळीं विद्येला महत्व असे. नीतिसूत्रांत म्हटलेंच आहे, ‘विद्येनेंच मनुष्या आलें श्रेष्ठत्व या जगामाजी’. पुरातन काळीं विद्येचें महत्व अशा शब्दांमध्ये व्यक्त केलेलें आहे –
अन्नदानम् परमदानम् विद्यादानम् मत:परम्
अन्नेन क्षणिकातृतिर् यावज्जीवच विद्यया ।
अन्नदान हें श्रेख्ठ दान आहे, पण विद्यादान त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण, अन्नानें क्षणभर तृप्ती मिळते , मात्र विद्येनें ती जन्मभर मिळते. विद्या महत्वाची, म्हणजेच, पर्यायानें, विद्यादान करणारा गुरूही महत्वाचा.

प्रश्न असा आहे की, आज, हल्लीच्या आधुनिकतम काळात, २१व्या शतकात, सर्वत्र तशी परिस्थिती आहे कां?
*
काळ बदलला तसें ‘गुरु-जी’ चें अनेक ठिकाणी ‘गुर्जी’ झालें. शालेय शिक्षकांना ‘मास्तर’ म्हणूं लागले, ‘सर’ म्हणूं लागले ( दोन्हीही, इंग्रजीवरून; ‘master’ व ‘sir’ यांवरून ) . कॉलेजमधील लेक्चररनासुद्धा ‘प्रोफेसर’ म्हटलें जाऊं लागलें. पण, हल्लीहल्ली, म्हणजे गेल्या कांहीं दशकांमध्ये, विद्येचें commercialization मात्र झालें. शिकवणार्‍या व्यक्ती विद्येपेक्षा पैशाचा विचार जास्त करूं लागल्या. शिक्षण ही एक सेवा, कर्तव्य, एक श्रेष्ठ कार्य न समजलें जातां , पैशाच्या तराजूत तोललें जाऊं लागलें आहे. असा हिशेब केल्यावर, मग , empathy, devotion, dedication वगैरेंचा प्रश्न येतोच कुठे ?
*
दोनतीन उदाहरणांनी ही गोष्ट स्पष्ट होईल. म्हणतात ना, ‘शितावरून भाताची परीक्षा’.
पहिलें उदाहरण – एका मुलाला eye-hand-coordination problem होता. त्याच्या घराच्या जवळच रहाणार्‍या ओळखीच्या तरुणानें त्या मुलाला Basics of Typing शिकवलें, अर्थातच प्रॅक्टिकलसह. यानंतर कांहीं काळानें त्या मुलाच्या पेरेंटस् ना वाटलें की आतां त्याला कंप्यूटरचे बेसिक्स् शिकवायला हवेत. म्हणुन त्यांनी त्याला एका NGO नें चालवलेल्या कंप्यूटर क्लासमध्ये घातलें. क्लासमध्ये एका वेळी ३-४च जण शिकत असत. याचा अर्थ असा की तेथील Instructor ला एका वेळी फार जास्त काम नव्हते, म्हणजेच पर्यायानें तिला प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देणें शक्य होतें. कांहीं दिचसांनंतर तो मुलगा घरीं शांगूं लागला, की माझी टीचर मला फार ओरडतें ; एखादी गोष्ट नीट समजली नाहीं किंवा टाइप करायला वेळ लागला, की ती फार ओरडते. ध्यानात घ्या, नुसतें संचालक empathetic असून चालत नाहीं , तर टीचरनें, म्षणजेंच गुरूनेंही तसें असायला हवे. या टीचरनें त्या विद्यार्थ्याचा problem ध्यानातच घेतला नाहीं, किचवा त्या गोष्टीला महत्व दिलें नाहीं. त्यामुळे, त्या मुलाचें त्या क्लासमध्ये जाण्याचें थांबलें. अर्थात्, यात त्या गुरूचें नुकसान कांहींच नाहीं. म्हणूनच त्या गुरूचा attitude असा callous असेल कां ?

दुसरें उदाहरण – R & Music Teacher ( datar)

हें आणखी एक उदाहरण. हें उदाहरण एका parent चें व ‘Special (challenged) persons’ साठी असलेल्या एका इस्टिट्यूशनमधील एका ‘गुरू’चें आहे. या parent चा ward (पाल्य) त्या इस्टिट्यूशनमध्ये जात असे. त्याच्या कांहीं problems ची चर्चा करायला तो/ती parent त्या संस्थेच्या गुरु-cum-संचालकाला/संचालिकेला भेटला/ली . त्याला/तिला काय उत्तर मिळालें असेल – ‘हें आमचें काम नाहीं ’. या विषयावर आणि अन्यही problems नरमगरम चर्चा झाली, जिच्यात पालक नरम तर गुरू गरम. गुरूनें (इंग्रजीत) या चर्चेचा शेवट असा केला – ‘इथें नको, तुमची काय ती बडबड councellor पुढे करा, तुम्हाला तेंच आवश्यक आहे’. आपण असें धरून चालूं की, या ‘गुरू’ला राग आलेला होता, मग त्या रागाच्या योग्यायोग्यतेबद्दल काय असेल तें असो. पण तरीही , एका पालकाशी असें unmannerly वागायचें, असें rude बोलायचें ? आणि तेंही पाल्यासमोर ! ‘गुरू’च्या अशा वागण्याचें-बोलण्याचें कारण काय असावें , तर तें म्हणजे, एक , हा विचार, ही वृत्ती की, ‘या विषयातलें मला सर्व कळतें, पालकांना काय कळतें ?’ ; आणि दुसरें म्हणजे अशी भावना की, ‘तुमच्या पाल्याला या संस्थेत शिकायची संधी देऊन आम्ही तुमच्यावर उपकारच करतो आहोत !’ . जसा विचार, तसा आचार (आचरण) !

आज अनेक शाळा-कॉलेजांमध्ये संचालक आणि पालक यांच्यात संघर्ष होतो आहे, याचेंही कारण तेंच आहे, (अन्य कारणें काय असतील ती असोत ).

विविध क्षेत्रांमधील गुरूंनी आपल्या शिष्येचा गैरफायदा घेतल्याची उदाहरणें हल्ली नेहमीच वाचायला, व टी. व्ही. वर ऐकायला मिळतात. ही बातमी पहा – ( संदर्भ – टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई आवृत्ती, दि. १०.०७.१७) – ’51 Year old Yoga Trainer held for molesting his (woman) student’. शिक्षणक्षेत्रातील शाळा-कॉलेज व टीचिंग क्लासेस् मधील शिक्षक म्हणजेच गुरू , स्त्री-विद्यार्थ्यांचें कसें exploitation करतात, हें आतां ‘ओपन सीक्रेट’ झालेलें आहे. तीच गोष्ट corporations, organisations, defence- services ची. कुठल्याही संस्थेतील अधिकारी ( ‘बॉस’ ) हा सबऑर्डिनेटस् चा mentor असतो, म्हणजे एक प्रकारच पालक असतो व एक प्रकारचा गुरूही असतो. तोच जर अयोग्य वागत असेल तर करायचें काय ? योगाच्या क्षेत्रातील बातमी वर दिलीच आहे. अध्यात्मही यातून सुटलेलें नाहीं. तिथेंही, कांहीं ‘तथाकथित गुरूं‘नी आपल्या शिष्येचा sexually गैरफायदा घेण्याच्या घटना आपण वाचतोच.
*
कुठे ते सांदीपनी, चाणक्य यांच्यासारखे महान् गुरू आणि कुठे हे आजचे ‘गुरू’ ! (अर्थात् हल्लीच्या काळातही कांहीं चांगले गुरू आहेत ; पण ‘अपवादानें नियम सिद्ध होतो’ या न्यायानें, तें संख्येनें कमी आहेत. यात नवल तें काय ? , कारण हल्लीच्या , विद्येपेक्षा धनाला अधिक महत्व असलेल्या ज़मान्यात ती बाब तशीच असणार ! )

थोडक्यात काय, तर, हल्लीचे , (‘थोडेफार’ म्हणा किंवा ‘बरेच’ म्हणा, पण, नक्कीच, कांहीं ) ‘गुरू’, हे , गुरू या अभिधानाला पात्र नसतात. त्यांच्याबद्दल बोलावें तेवढें कमीच !

‘बुवा’बाजी करणारे, smooth-talking, unscrupulous तथाकथित ‘गुरू’ समाजासाठी जितके हानिकारक, तितकेच अपायकारक आहेत शिक्षणक्षेत्रामधील ( वर उल्लेख केलेल्या ‘गुरू’सारखे ) unmannered, uncivilized, and uncouth ‘गुरू’. तेंच इतरही क्षेत्रांमधील गुरूंबद्दल म्हणतां येईल. अशा ‘गुरूं’चें ‘पवित्र चरण-अमृत’ सर्वत्र शिंपडावें कां ?
*
पुरातन काळीं ‘गुरुकुल’ पद्धति होती. शिष्य गुरुगृहीं राहून अध्ययन करत. आणि, असें आहे की, गुरुकुल म्हणजे, केवळ गुरूचें गृह नव्हे ; तर, एकाच गुरूचे शिष्यगण हेंच खरें गुरुकुल (कुटुंब). एकाच (the same) गुरुकुलातील शिष्य हे एकमेकांना बंधुवत् मानीत. श्रीकृष्ण व सुदामा हें उदाहरण या संदर्भात बोलकें आहे.

आजही कांहीं ठिकाणीं गुरुकुल पद्धतीनें शिक्षण देलें जातें. आजही ‘गुरुग्रामें’ आहेत, वा नवीन निर्माण होताहेत. (जातां जातां : दिल्लीजवळील ‘गुरगाँव’ याचा मूळ शब्द ‘गुरुग्राम’च आहे, मग भलेही आज तिथें ‘गुरुकुल’ नसो). आजही, संगीताच्या क्षेत्रात, गुरुबंधु व गुरुभगिनी अशा नात्यांचा आदरपूर्वक, स्नेहपूर्वक उल्लेख होतो. इतर क्षेत्रांमध्येही असें प्रेम आढळून येतें.

शिक्षणाच्या क्षेत्रात, आतां गुरुगृहाची जागा शाळा व उच्च-शिक्षणाच्या-संस्थांनी घेतली आहे. आजही शाळेतून, कॉलेजमधून किंवा अन्य संस्थेमधून ( जसें की, आय्. आय्. टी. वगैरेंमधून ) पास झालेले
माजी-विद्यार्थी आपल्या बॅच् च्या पास होण्याची ५० वर्षें समारंभपूर्वक साजरी करतात. आपल्या त्या संस्थेबद्दल, आपल्या त्या वेळच्या गुरुजनांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड प्रेम, अतीव आत्मीयता असते. पण , ध्यानात घ्या की , त्या त्या संस्थांमधील त्यांचें शिक्षण ५०-५५ वर्षांपूर्वीच्या काळात झालेलें असतें. (म्हणजे, आधुनिक काळ म्हटला तरी, तो आधुनिकतम काळ नव्हे). आतां, मोठी शंका ही आहे की , हल्लीच्या ‘नव’-वातावरणातील तरुण विद्यार्थी आजपासून ५० वर्षांनी असे get-togethers साजरे करतील काय, त्यांच्या मनांत आपल्या गुरुजनांबद्दल प्रेम राहील काय ?
*
म्हणूनच, अखेरीस हेंच खरें की –
क़ाबिल उस्ताद मुक़द्दस, जैसे काबा
अगर नाक़ाबिल हो, तो तौबा तौबा !

जर गुरू, capable असेल, worthy असेल, तर त्याला ( मक्केतील ‘काबा’ प्रमाणें ) पवित्र मानावें , श्रेष्ठ मानावें, (त्याला वंदावें) . पण जर गुरू नाक़ाबिल असेल, ( ज्ञान अथवा आचार-विचारानें) capable नसेल, worthy नसेल, तर, (तौबा, तौबा!) , अशा गुरूपासून दूरच रहावें ! (तेंच श्रेयस्कर).

सूज्ञांस अधिक सांगणें नलगे.

– – –
– सुभाष स. नाईक
Subhash S. Naik

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..