लता मंगेशकरांना जाऊन चारेक महिने लोटले. काही “क्षण” आपल्यात कायमचे वस्तीला राहूनही दशांगुळे वर उरतात.
आज एके ठिकाणी भूपेंद्र आणि सुवर्णा माटेगांवकरांचे गीत दिसले म्हणून ऐकले- ” बिती ना बिताई रैना “. गुलज़ार /पंचम जोडी, जया /संजीव दुसरी जोडी आणि लता/भूपेंद्र ही तिसरी जोडी. यांपैकी नक्की कोणत्या जोडीने हे गीत अजरामर केलंय, मला १९७० पासून आजतागायत ठरविता आलं नाहीए. यापैकी एक जोडी पडद्यावर दिसली, एक कागदावर आणि वाद्यांमध्ये भेटली तथा तिसरी सरळ आतमध्ये घुसली.
संजीवने क्षणभराच्या भूमिकेला “जगून “दाखवलंय. शक्यतो गुलज़ारकडे भेटणारा गुणी पण विनाकारण काहीसा पिछाडीवर असलेला भूपेंद्र आणि लता दीदींबद्दल काय बोलणार? वरीलपैकी प्रत्येक जोडीतील आता एकेकजण नाहीएत. तिघंच उरलेत- गुलज़ार / जया/ भूपेंद्र.
या गेलेल्या लोकांपैकी तुम्हाला परत आणायला मिळालं तर कुणाला आणाल, या प्रश्नाचं उत्तर सोप्पं नाहीए. माझ्या मते-प्रत्येकाला!
आणि आज तिथे सुवर्णा माटेगांवकर दिसल्या. “शो मस्ट गो ऑन ” या तत्वाला धरून हे चालूनही जाईल. याला “रिप्लेसमेंट ” म्हणत असावेत. नुक्त्याच येऊन गेलेल्या ऋषीच्या चित्रपटात त्याच्या जागी परेश रावल दिसला. एका मराठी चित्रपटात सुधीर जोशी गेल्यावर असेच आनंद अभ्यंकर त्यांच्या जागी आले होते.
पण पहिल्या अनुभवाचे काय करायचे? भूपेंद्रला सुवर्णा माटेगावकरांबरोबर गाताना मनातल्या मनात काय वाटत असेल? मूळ गाण्याच्या, लताबरोबरच्या आठवणी कोठे असतील त्याच्यामध्ये? रेकॉर्डिंगचे किस्से, आरडी बरोबरची धमाल त्याला परत नव्याने स्टेजवर रिक्रिएट करता येईल का? पण त्या साऱ्यांना मागे सारून तो आज नव्या गायिकेबरोबर जुळवून घेताना दिसला.
परेशला त्या चित्रपटातील संरचनेत comfortable वाटलं असेल कां? मला तरी तो तिथे आक्रसलेला वाटला आणि त्याला ती भूमिका करताना त्रास झाला असावा असा माझा कयास आहे. अंगीभूत कौशल्याने त्याने वेळ मारून नेली खरी पण आपण “मूळ” भूमिकेसाठी निवडलो गेलो नव्हतो हे सत्य त्याला नजरेआड करता आले असेल कां?
वेगळे प्रयोग असेही आढळून आलेले आहेत की दिलीपने गाजविलेली भूमिका कालांतराने शाहरुखने केली, अमिताभचा डॉनही त्याने प्रयत्नपूर्वक करून पाहिला. चित्रपटांमधील हाणामाऱ्या, ऑर्केस्ट्रा इंडस्ट्री अशा “डबल्स” वरच चालत आलेली आहे आणि त्यांचे सध्याचे धाकटे भावंड – रिऍलिटी शोजही!
तेव्हा – ” जीवन चलनेका नाम ” हेच शेवटी खरं ! तुमच्या असण्या-नसण्याने फारसा फरक पडत नाही.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply