नवीन लेखन...

अशोक…

एका अनोख्या 'राजा' बद्दल

      नाही.. सम्राट अशोकांबद्दल हा लेख नाही.. सम्राट अशोकां सारखा हा अशोक पराक्रमी राजा वगैरे नाही तरी, हा जितका मला विलक्षण वाटतो तितकाच, पुढे वाचल्यानंतर तुम्हालाही विलक्षण वाटेल या बद्दल खात्री आहे..
      तर, हा अशोक म्हणजे आमच्या घरी स्वयंपाक करणा-या छाया ताईंचा मोठा मुलगा.. इथे मी मुद्दाम इंग्रजी शब्दाचा प्रयोग आधी करतेय कारण तोच शब्द जास्तं साजेसा आहे..अशोक हा special child आहे..मराठीत ज्यासाठी ‘मतीमंद’ असा सहज शब्द वापरला जातो..पण माझ्या दृष्टीने अशोक हा एक विलक्षण मुलगा आहे.
आज अशोकचं वय 19-20 वर्षांच्या आसपास असेल..तसा अशोकला भेटण्याचा योग एक दोनदाच आलाय..खूप ओळख नसलेल्यांसमोर अशोक जरा बुजरा आहे. पण त्याचा विषय निघाला की छाया ताईंकडून नेहमी जे जे ऐकलं त्याने मी थक्क होत आलेले आहे..छाया ताई स्वयंपाक काम करतात तर त्यांचे यजमान छत्री इ वस्तुंची दुरुस्ती ची कामं करतात..रोजचा ठरलेला दिनक्रम..तेव्हा अशोक साठी वेगळा वेळ देणं कुणालाही शक्य नव्हतं..तरीही त्यांनी अशोकचं केलेलं संगोपन आणि त्याच्यावर केलेले संस्कार हे वाखाणण्याजोगे आहेत..सुदैवाने अशोक अपंग नाही की अशक्त नाही..एखाद्या धडधाकट मुलाच्या अंगात जेवढी ताकद नसेल तेवढी अशोकमधे आहे. जड वस्तु उचलायला मदत लागली तर अशोक विनासायास त्या उचलतो…विषेश मुलांच्या शाळेत शिकणारा अशोक, शाळेत सर्वांचा लाडका आहे..शाळेत वेगवेगळ्या वस्तु हाताने तयार करण्यापासून ते इतर मुलांना समजलं नसेल ते त्यांना दाखवण्यापर्यंत अशोक सगळं आवडीने करतो. एवढंच काय,शाळेत शिक्षकांपासून शिपायांपर्यंत सर्वांना कामात मदत करणे या त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे अशोक शाळेत सर्वांचा लाडका आहे. एखाद दिवस तो शाळेत आला नाही तर छाया ताईंना शाळेतून अशोक ची चौकशी करायला फोन येतोच.
एकूणच लोकांना मदत करणे हा अशोक चा छंदच जणू..छाया ताई सांगतात, त्यांच्या वस्तीत भंगारच्या दुकानात अशोक आपहूण मदतीला जातो..रद्दी एकत्र लावून ठेवणे ते भंगार सामान वेगळं करण्यापर्यंत सगळी कामं त्याला अचुक येतात..त्याच्या या प्रेमळ स्वभावामुळे त्याला दुकानातले काका 10-20 रुपये बक्षिस देत असतात…त्याने शाळेत तयार केलेल्या वस्तु विक्रीतून मिळणारे आणि हे इतर पैसे हे सगळे छाया ताई ‘अशोक चे पैसे’ म्हणून सांभाळून ठेवतात.
घरातही अशोक चा सक्रीय सहभाग आहे बरं!..रोजचा स्वयंपाक झाला की ओटा स्वच्छ करून ठेवण्याचं काम अशोक चं असतं..छाया ताईंच्या 3 मुलांमधे अशोक मोठा..तेव्हा दादा असल्याने, आपली धाकटी भावंड त्यांची कामं पूर्ण करतात का या कडे अशोक एखाद्या CEO प्रमाणे जातीने लक्ष देतो..घासलेली भांडी जागेवर लावणं ते अगदी इतर साफ सफाई हे सगळं अशोक आनंदाने करतो..
थक्क करणारी गोष्ट ही की हे सगळं अशोक बघून बघून आणि न सांगता आपणहून शिकला आहे..जिथे आपली धडधाकट-हुशार मुलं घरात मदत करायचा आळस करतात, तिथे अशोक सारख्या विषेश मुलाकडे ही समज आली कुठून? ही परमेश्वराची देणगीच म्हटली पाहिजे..अलिकडे तर छाया ताई सांगत होत्या “मी एकदिवस काम संपवून घरी आले आणि बघते तर अशोकने आपणहून भेंडी धुवून चिरून ठेवलेली”.. जिथे विषेश मुलांच्या motor skills तेवढ्या परिपक्व नसतात तिथे अशोकने हे काम अगदी लीलया केलं. भेंडी चिरण्याअगोदर धूवून वाळवतात हे तो बघून शिकला
      असच एकदा, छाया ताईंचा दुसऱ्या दिवशी उपास असून त्या आदल्या रात्री साबुदाणा भिजवायच्या विसरल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर लौकर निघून गेल्या . जेवायच्या वेळेला परत येऊन पाहतात तर अशोक ने साबुदाणा भिजवून ठेवलेला दिसला. त्याची ही समज तर छाया ताईंना नेहमीच थक्क करत आलेली आहे..हे सर्व ऐकून मला त्याच्याविषयी प्रचंड कौतुक वाटलं..
छाया ताई नेहमी म्हणतात..अशोक माझी सासूच आहे..त्यांच्याकडे गौरी गणपती बसतात हे अशोक ला ठाऊक आहेच..तारीख वाराची समज त्याला नाही पण गणपती जवळ आले म्हटलं की अशोक कंबर कसतो. एवढंच नव्हे तर त्याच्या बोबड्या भाषेत आईला घराकडे बोट दाखवत “स्वच्छ कधी करायचं? असा जाब विचारतो..आम्ही सगळे अशोक ला घाबरून असतो असे मावशी अभिमानाने सांगतात..कारण घरात इतर कुणी नसेल एवढा अशोक स्वच्छता प्रिय आहे.
   एवढंच नव्हे तर घरात कुणाला कधी बरं नाहीसं झालं तर अशोक त्या व्यक्तीला बरं वाटावं म्हणून हात पाय चेप, डोकं चेप हे सगळं अगदी प्रेमाने करतो..वाचा शुद्ध नसली तरी अशोक आपलं प्रेम, काळजी आणि आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहत नाही..
अशोक आपला व्यायामाचा नित्यक्रम कधीच चुकवत नाही बरं का?..रोज सकाळी लौकर उठून 5 वाजता बाबांसोबत किंवा कधीतरी आपणहूनच चालायला बाहेर पडतो..इतर कुणी उठलं नाही तर त्यांना उठवून तयार व्हायला लावतो..
छाया ताईंच्या वस्तीत अशोक सगळ्यांचा लाडका आहे..लोकं त्याला प्रेमाने खाऊ घालतात..त्याला सोबत फिरायलाही नेतात..पण अशोक ला उपजतंच समज एवढी आहे की आपल्यासाठी कुणी काही केलं हे लक्षात ठेवून तो त्या व्यक्तीला काही ना काही मदत करतोच..आज छाया ताईंना अशोक ची आई म्हणून जास्तं ओळखतात याचा त्यांना अभिमान आहे.
हे सगळं लिहीत असताना डोळे पाणावले नाही तर नवल..यावरुन एक लक्षात येतं की समज आणि जाणीव ही उपजत असावी लागते..ती शिकवता येत नाही..मतीमंदत्वामधे व्यक्तीनुसार तीव्रता कमी अधिक प्रमाणात असू शकते. पण अशोक सारख्या मुलांच्या बाबती जेव्हा ही समज आणि जाणीव दिसून येते तेव्हा जगात अशक्य असं काही नाही यावरचा विश्वास दृढ होतो..
छाया ताई व त्यांच्या यजमानांसारख्या हातावर पोट असलेल्या आई वडिलांसाठी अशोक सारख्या मुलाचं संगोपन हा विषय कठीण होता..अशोक ला काही महत्वाच्या बाबतीत मदतीची गरज सदैव लागणार हे त्यांनाही ठाऊक आहे. मात्र त्याची मूळ समज जागृत असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने अशोक हा चिंतेचा विषय कधीच राहिला नाही. उलटं अशोक एक विषेश मुलगा असूनही त्याच्या वाचून घरात सगळ्यांचं अडतं हे जेव्हा समजतं तेव्हा तो मतीमंद नाही तर असामान्य मुलगा आहे याची जाणीव होते..
या अशोक ला सुद्धा सम्राट अशोक म्हणावंसं वाटतं.
— गौरी सचिन पावगी 
इमेज सौजन्य: गूगल

Avatar
About गौरी सचिन पावगी 26 Articles
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..