हास्यकवी अशोक नायगावकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९४७ रोजी वाई येथे झाला. मोठाल्या मिशांचे कवी अशोक नायगावकर हे घरोघरी हास्याची कारंजी फुलवत असतात. अशोक नायगावकर यांचे लहानपण गरीबीमुळे कष्टात गेले. त्यांची आई जी कामे करत असत त्याला ते मदत करत. आईबरोबर पापड करणे, मसाले कुटणे अशी सर्व कामे अर्थार्जनासाठी केली. याचवेळी प्र. के. अत्रे, लोहिया, दादासाहेब जगताप अशा अनेक लोकांची भाषणे त्यांनी ऐकली.
नायगावकरांनी बी.कॉम. पदवीपर्यंत शिक्षण केले. लग्न झाल्यावर नायगावकर हे करंबेळकर वाडी, गावठाण चेंबूर येथे राहत असत. शिक्षणानंतर त्यांनी बँकेत ३१ वर्षे नोकरी केली आणि मग स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते उत्तम सतार वादकही आहेत. तसेच त्यांचा अध्यात्माकडे ओढ आहे. योगी पुरुष बाबुराव कुळकर्णी हे त्यांचे अध्यात्मिक गुरू आहेत असे मानले जाते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते २०१० पासून सदस्य होते. २०१२ मध्ये दापोली येथे झालेल्या १४ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अशोक नायगावकर भूषविले होते.
त्यांना महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार, तसंच विशाखा पुरस्कार मिळाला आहे. उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. वाचनाने संस्कृती सुधारते, वाचन वाढवा, त्यामुळे तुम्ही समृध्द व्हाल, असे ते म्हणतात. लोकसत्ता या वृत्तपत्रात गद्य लिखाणही त्यांनी केले आहे. त्यांच्या कविता सत्यकथा या प्रतिष्ठेच्या प्रकाशनात छापून आल्या होत्या. अशोक नायगावकर ह्यांनी प्रेमकविता, ग्रामीण कविता, पर्यावरण जाणीवेच्या कविता, सामाजिक, राजकीय कविता अशा अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत.
कतार, सिंगापूर, बँकॉक, दुबई, इस्त्रायल, लंडन, न्यूकॅसल, शिकागो, डेट्राईट, लॉसएंजेलिस, बफेलो, पिट्सबर्ग, फिलाडेल्फिया, इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र मंडळामध्ये कवितेच्या मैफली त्यांनी केल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट