नवीन लेखन...

अश्रू : गोठलेले आणि गोठवलेले ! (भाग एक)

एस. टी. सड्यावर येऊन थांबली. आणि घामाने प्रचंड भिजलेला ड्रायव्हर कसाबसा खाली उतरला. आणि रस्त्यातच मटकन बसला.

एस टी च्या मागून चालत आल्याने दमल्याभगल्या कंडक्टरने, डोक्यावरचा जांभा दगड शेजारच्या झुडुपात फेकला आणि तो सुद्धा त्याच्या शेजारी येऊन बसला.

दोघेही घामानं चिंब भिजले होते. दोघांचेही छातीचे भाते जोरजोरात हलत होते. दोघांच्याही डोळ्यात रक्त पेटलेलं दिसत होतं.

पण दोघेही निःशब्द बसले होते. सगळीकडे अंधार दाटला होता. एसटीच्या मिणमिणत्या दिव्यात दोघांच्या सावल्या केविलवाण्या वाटत होत्या.

गाडी वस्तीची होती. गाडीत मी एकटाच पॅसेंजर होतो. मी हातातली चार्जिंगची मोठी बॅटरी घेऊन खाली उतरलो आणि त्या दोघांकडे आलो.

अजूनही दोघे न बोलता तसेच बसून होते. अंगातला घाम, मनातला संताप आणि शरीराला झालेले श्रम थंडावण्याची वाट बघत.

एसटी वेळेवर सुटली होती. चाळीस पन्नास पॅसेंजर होते. आणि पहिल्याच चढावाला ड्रायव्हरच्या लक्षात आलं, गाडीला पिकअप नाही. पण तरीही गिअरशी झटापट करीत तो गाडी चालवत होता.

त्याच्या पोटात गोळा उठला. या लहानशा चढावाला ही अवस्था तर वस्तीच्या गावात शिरण्यापूर्वीच्या अवघड वळणावळणाच्या, एकावेळी जेमतेम एकच गाडी जाऊ शकेल अशा अरुंद कच्च्या रस्त्याला काय होईल?

एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी अशी भयानक स्थिती असणाऱ्या रस्त्यात गाडीने स्पीड घेतलाच नाही तर काय होईल? या चाळीस पन्नास पॅसेंजर्सचं काय होईल? जेमतेम दुसऱ्या दिवशी पोहोचता येईल इतकंच डिझेल मिळालेलं असताना ऐनवेळी डिझेल संपलं तर काय होईल? पिकअप न घेतल्यानं गाडी पाठीपाठी जायला लागली तर पॅसेंजर्स किती बोंबलतील?

त्याने हळूच खूण करून कंडक्टरला जवळ बोलावून सगळ्या गोष्टीची कल्पना दिली.

” एक काम करशील काय? ”

” करतो हजार कामं, बोल. ”

” राईचा घाट सुरू झाला की मी गाडी थांबवतो, सगळ्यांना कल्पना देतो आणि तू खाली उतरून एक मोठा दगड घेऊन गाडीबरोबर चाल. गाडी थांबली आणि पाठीपाठी यायला लागली तर तो दगड टायरीखाली घाल. इतकंच आपल्या हातात आहे.”

कंडक्टर विचारात पडला आणि होकार दिला.

” आज आपला शिव्या खायचा दिवस आहे, चिडू नकोस. ”

” अरे पण साडेतीन मैलांचा घाटरस्ता आहे. ”

” मग मी तरी काय करू? ”

त्या दोघांचं बोलणं हळुहळू सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि एकच कालवा सुरू झाला. आरडाओरडा, आयमाय वरून शिव्या, सगळ्यांचा उद्धार आणि पैसे परत मागण्यासाठी कडाक्याची भांडणं सुरू झाली.

त्यातले काही सूज्ञ होते. त्यांनी घाट लागण्यापूर्वी गाडी थांबवायला सांगितली आणि निमूटपणे चालायला लागले. भांडण करून, शिव्या देऊन गाडी चालणार नाही हे लक्षात आल्यावर उरलेले खाली उतरले आणि चालू लागले. शेवटी मी सुद्धा उठलो आणि दारापर्यंत आलो.

इतक्यात पाठून हाक आली. ” सर, तुमच्याजवळ चार्जिंगची बॅटरी असते ना, मग किमान तुम्ही तरी गाडीत थांबा. समजा गाडी बंद पडली, चालू झालीच नाही किंवा लाईट काम देईनासे झाले तर तुमच्या बॅटरीचा उपयोग होईल. उपकार होतील आमच्यावर. ”

त्याचा केविलवाणा, हृदयद्रावक स्वर ऐकल्यावर माझ्या मनात गलबलून आले. मी ड्रायव्हरजवळ आलो. ” थांबतो मी ”
त्या दोघांचे डोळे आनंदाने लकाकले.

आणि मला एकदम शॉक बसला. ड्रायव्हर ज्या सीटवर बसतो, तिथे केवळ चौकोनी लोखंडी पट्या होत्या आणि त्यावर जांभ्या दगडाचा चिरा ठेवून ड्रायव्हर गाडी चालवत होता. पाठ टेकण्याच्या जागी अनेक चिंध्या एकाला एक जोडून तात्पुरती सीट बनवली होती. मी पाहतोय हे ड्रायव्हरच्या लक्षात आलं. तो कसनुसा हसला. कंडक्टरसुद्धा ओशाळला.
आणि तो खाली उतरला. एक दगड डोक्यावर घेतला आणि चालू लागला. गाडी रडत रखडत, मागं पुढं जात कशीबशी पुढं जात होती.

बरोबरीचे सगळे पॅसेंजर एव्हाना पुढे गेले होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती. सुदैवाने गाडीचे दिवे सुरू होते.

आणि कसाबसा घाट संपला. मी त्या दोघांजवळ गेलो. ” निघायचं? ” मी त्या दोघांना विचारलं. ” आणि जेवणाचं काय? डबा आणला असेल ना? ”

उत्तर देण्याऐवजी दोघे उठले आणि केबिनमधले डबे घेऊन आले.माझ्यासमोरच उघडले. दोघांच्याही डब्यात भाकरी होती, लसणीची चटणी होती आणि दोनचार लहानसे कांदे होते.

” कालपासून पुरवून पुरवून खातोय डबे.”

” म्हणजे? ”

” सर, तुमच्यासारखं जेवण नाही परवडत आम्हाला. घराबाहेर पडताना बायको चार दिवसांच्या भाकऱ्या भाजून देते. पण पोरांकडे बघितल्यावर त्यातल्या दोन भाकऱ्या काढून ठेवतो आम्ही आणि उरलेल्या पुरवून खातो.”

त्यांनी मान खाली घालून सांगितलं.

मला कसंतरीच झालं.

मी घरी फोन केला.

” दोघे पाहुणे येत आहेत माझ्याबरोबर, जास्तीचा स्वयंपाक करून ठेव.”

मी घरी सांगितलं

” आज माझ्या घरी तुम्ही जेवायला यायचं आहे.”

त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

“तुम्हाला कशाला त्रास?”

” असू दे, माझ्या गावात तुम्ही येताय, इतकं तर केलंच पाहिजे आम्ही. मला कल्पना नव्हती, तुमच्या परिस्थितीची.”

दोघेही हसले.

मला चमत्कारिक वाटलं.

” काय झालं? मी काही चुकीचं बोललो का?”

” नाही सर, तुमचं काहीच चुकलं नाही. आमच्या परिस्थितीची तुम्हाला कल्पना कशी असेल? काही तासांकरता पॅसेंजर्स आणि आम्ही एकत्र असतो. पॅसेंजरचं गाव आलं की तो उतरून निघून जातो. गरजेपुरता संवाद होतो. ओळख विसरली जाते.आम्हीसुद्धा ड्युटी लागेल तशी, मिळेल ती गाडी घेऊन सांगतील त्या गावाला जातो. आरामगाडी आहे की खटारा आहे हे आम्हालाही माहीत नसतं. मिळेल ती गाडी, मिळेल तेवढं डिझेल, भेटतील ते पॅसेंजर्स आणि येईल तो प्रसंग, यांना सामोरं जात नोकरी करतो. हां, आता पगार विचारू नका, संसार कसा चालतो ते विचारू नका, सणसमारंभात आम्ही कुटुंबाबरोबर असतो का ते विचारू नका, कर्जबाजारी किती आहोत ते विचारू नका, नोकरी टिकवण्यासाठी कुणाकुणाची बोलणी खातो, चूक नसताना शिव्या खातो ते का हे विचारू नका.रस्ते कसे आहेत, आम्ही त्यातून गाडी कशी चालवतो, बंद पडली तर वरिष्ठांची बोलणी कशी खातो, ते विचारू नका. वस्तीच्या गाडीला आम्हाला तीन रुपये भत्ता मिळत होता, त्याचं काय झालं ते विचारू नका, आम्ही व्यसनाधीन का होतो, आत्महत्या का करतो ते विचारु नका.मुलामुलींची शिक्षण, लग्नकार्य यातलं काही विचारू नका. आला दिवस कसा घालवतो हे विचारू नका. पगार वेळेवर होतो का हे विचारू नका. आमच्या शारीरिक आणि मानसिक यातना कधी संपतील हे विचारू नका. आमचं भविष्य कसं असेल, मृत्यू कसा असेल, लाल परीचं भवितव्य काय यातलं काही काही विचारू नका. आजचा क्षण आमचा इतकंच आम्हाला ठाऊक. आम्ही घरी जातो तो दिवस आमचा सणसमारंभाचा असतो, इतकंच माहीत आहे. आणि आता तर डोळ्यासमोर भयंकर अंधार आहे. ही एसटी हेच आमचे जग. उद्या सकाळी याल तेव्हा पुन्हा आम्ही हसतमुखाने स्वागत करू तुमचं. आजच्या यातना विसरून.तुमचं जग आणि आमचं जग वेगळं आहे. आम्हाला डिझेलच्या वासाशिवाय, गंजलेल्या फाटलेल्या सीटशिवाय झोपच येत नाही. तुमच्या शिव्या, वरिष्ठांची बोलणी खाल्याशिवाय पोट भरत नाही. टोचणाऱ्या सीटशिवाय सुख लाभत नाही. जरा वाईट बोललोय पण विषय निघाला म्हणून बोललो.हो आणखी एक आहे सर, आमची बाजू कुणी ऐकून घेत नाही. आमच्याबद्दल गैरसमजच भरपूर आहेत, त्यामुळं मोकळेपणानं बोललो. ”

दोघेही उठले.

” चला, उशीर झाला.”

कंडक्टरने घंटा वाजवली आणि तेवढ्यात घंटेची दोरीच तुटली.

” असंच आमचं आयुष्य आहे.”

तो म्हणाला अन पुन्हा कसनुसा हसला. ड्रायव्हरने गिअर बदलला.

गाडी सुरू झाली.

माझं लक्ष त्या तुटलेल्या, घंटेच्या दोरीकडे वारंवार जात होतं. आणि डोळ्यांतून अश्रू वहात होते. अविरत!

— डॉ. श्रीकृष्ण जोशी,

९४२३८७५८०६

रत्नागिरी.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..