आफ्रिकेतून आशियात जाण्यासाठी माणसानं कुठला मार्ग वापरला असावा, हा मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीनं पूर्वीपासून कुतूहलाचा विषय ठरला आहे. तो अरेबिआतून आशियात शिरला असण्याची शक्यता खूपच आहे. मात्र त्यानं अरेबिआ नक्की कुठून पार केला, याबद्दल संशोधकांत एकमत नाही. काही संशोधकांच्या मते तो खालच्या बाजूनं – दक्षिण अरेबिआतून – तांबड्या समुद्रामार्गे आशियात शिरला असावा; तर काही संशोधकांच्या मते, तो वरच्या बाजूनं – उत्तर अरेबिआतून – जमिनीमार्गेच आशियात गेला असावा. मात्र पुरेशा पुराव्यांच्या अभावी याबाबतीत कोणतंच मत खात्रीशीर ठरलेलं नाही. जर्मनीतील मॅक्स प्लँक इंस्टिट्यूट फॉर द सायन्स ऑफ ह्यूमन हिस्टरी ही संस्था, ‘ग्रीन अरेबिआ’ या आपल्या प्रकल्पाद्वारे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं आता दिसून येत आहे!
ग्रीन अरेबिआ प्रकल्पाद्वारे अरेबिआतील अतिप्राचीन मानवी संस्कृतीचा अभ्यास केला जातो. आजच्या वाळवंटी अरेबिआत एके काळी मोठ्या प्रमाणात हिरवाई असल्याचं पूर्वीच्या संशोधनानं दाखवून दिलं आहे. ग्रीन अरेबिआ या प्रकल्पामध्ये, अरेबिआच्या वाळवंटी प्रदेशातील जमिनीचं कृत्रिम उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केलं जातं. त्यावरून अतिप्राचीन काळी अरेबिआतल्या, जिथे नद्या वा तलाव असण्याची शक्यता होती, अशा जागा शोधल्या जातात व त्या जागी प्राचीन मानवी खुणांचा शोध घेतला जातो. या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या हूव ग्राउकट आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांनी उत्तर अरेबिआतल्या नेफूडच्या वाळवंटातील, अशाच एका नव्वद मीटर उंच वाळूच्या ढिगाऱ्यांनी वेढलेल्या तलावसदृश जागेवर उत्खनन केलं. जेव्हा त्यांनी मातीचे नमुने घेऊन या पुरातन काळातल्या तलावाचं वय काढलं, तेव्हा त्यांना अगदी अनपेक्षित गोष्ट आढळली. इथे एकच नव्हे तर, वेगवेगळ्या काळात निर्माण झालेले पाच तलाव अस्तित्वात होते. या पाच तलावांच्या परिसरात सापडलेल्या अवशेषांवरून काढले गेलेले निष्कर्ष हे अर्थातच लक्षवेधी ठरले आहेत. हूव ग्राउकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे सर्व संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे.
हूव ग्राउकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या उत्खननाच्या जागेला केएएम-४ (खाल अमायशान-४) या नावानं ओळखलं जातं. ही जागा आज पूर्णपणे कोरडी आहे. इथे आढळलेले पुरातन तलाव हे अनुक्रमे, सुमारे चार लाख, तीन लाख, दोन लाख, एक लाख आणि पंचावन्न हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असल्याचं या संशोधकांना दिसून आलं. या तलावांच्या जागी, हूव ग्राउकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, पाण्यात आढळणाऱ्या विविध मृदुकाय प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत. तसंच त्यांना इथे पाणघोड्याचे अवशेषही सापडले आहेत. पाणघोडा हा गोड्या पाण्याच्या मोठ्या जलाशयात वावरतो. इथे सापडलेले मृदुकाय प्राण्यांचे आणि पाणघोड्याचे अवशेष हे, इथे पूर्वी अस्तित्वात असलेल्या, गोड्या पाण्याच्या मोठ्या तलावांचे स्पष्ट पुरावे आहेत. तसंच या तलावांच्या परिसरात, या संशोधकांना गायी-गुरांसदृश प्राण्यांचे अवशेषही सापडले आहेत. गवत व तत्सम वनस्पतींवर जगणाऱ्या या सर्व प्राण्यांचे अवशेष, या तलावाच्या परिसरातली जमीन पूर्वी गवताळ असल्याचं दर्शवतात.
या सर्व तलावांच्या अस्तित्वाचा काळ हा, ज्या काळात इथलं हवामान पावसाला अनुकूल झालं होतं, त्या काळाशी जुळणारा आहे. यावरून, या काळात हे तलाव पाण्यानं भरत असल्याचं दिसून येतं. आज अत्यंत शुष्क असलेल्या या प्रदेशात अनेक ठिकाणी पूर्वी, काही काळासाठी बदलत असलेल्या हवामानामुळे पाऊस पडून, पाण्यानं भरलेले असे तलाव व हिरवाईही निर्माण होत असे. याचा परिणाम म्हणून, अनेक ठिकाणचे प्राणीही अशा परिसरात मोठ्या प्रमाणात येऊन वसती करीत असत. तलावातलं पाणी जितका काळ टिकून राही, तितका काळ प्राण्यांची ही वसती टिकून राही. प्रतिकूल हवामानाच्या काळात तलावातलं पाणी पूर्णपणे आटलं की, हे प्राणी इतरत्र स्थलांतरीत होऊन तिथली वसतीसुद्धा नाहीशी होत असे.
आता यापुढचा भाग… या तलावांजवळ या संशोधकांना अनेक अश्मयुगीन हत्यारं सापडली आहेत. विविध कामांसाठी वापरली जाणारी ही हत्यारं वेगवेगळ्या काळातली आहेत, त्यांची घडणही वेगवेगळी आहे, ती तयार करण्यासाठी वापरलेले दगडही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या हत्यारांचा काळ आणि ज्या-ज्या तलावाजवळ ती सापडली, त्या-त्या तलावांच्या अस्तित्वाचा काळ हा सारखाच आहे. याचा अर्थ तलाव भरलेला असताना, त्या तलावाच्या काठी मानवी वसतीही असायची. यातील चार लाख वर्षांपूर्वीच्या तलावाजवळ सापडलेली हत्यारं ही आजच्या माणसाची हत्यारं नक्कीच नाहीत. ती दुसऱ्या कोणत्या तरी मानवसदृश प्रजातीची असण्याची शक्यता आहे. कारण आजचा होमो सेपिअन्स हा माणूस, सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी, म्हणजे या तलावाच्या निर्मितीनंतर एक लाख वर्षांनी अस्तित्वात आला. त्यानंतरची, तीन लाख वर्षांपूर्वीच्या तलावाजवळ सापडलेली हत्यारं हीसुद्धा आजच्या माणसाची असण्याची शक्यता वाटत नाही. कारण तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत जन्माला आलेला आजचा माणूस, लगेचच अरेबिआत पोचण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही हत्यारंसुद्धा इतर कोणत्या तरी मानवसदृश प्रजातीनं तयार केली असावीत. या काळात, एकाच वेळी विविध मानवसदृश प्रजाती अस्तित्वात होत्या. मात्र यापैकी नक्की कोणत्या प्रजातींनी इथे वसती केली असावी, हे आज तरी सांगता येत नाही.
तिसऱ्या तलावाजवळची म्हणजे दोन लाख वर्षांपूर्वीची हत्यारं ही, आजच्या आधुनिक माणसाची असण्याची शक्यता आहे. या हत्यारांना सुबकपणा आहे. जवळपास याच काळातली अशी हत्यारं, जवळच्याच ईशान्य आफ्रिकेतही आढळली आहेत. हीच माणसं कदाचित अरेबिआत येऊन पोचली असावीत. चवथ्या, एक लाख वर्षांपूर्वीच्या तलावाकाठची हत्यारं ही मात्र नक्कीच आजच्या माणसाची आहेत. हे होमो सेपिअन्ससुद्धा आफ्रिका सोडून आशियात आले असावेत. अगदी अलीकडच्या म्हणजे पंचावन्न हजार वर्षांपूर्वीच्या तलावाकाठी सापडलेली हत्यारं काहीशी वेगळ्या प्रकारची आहेत. ही आजच्या माणसाचीही असू शकतात किंवा निअँडरटाल या मानवसदृश प्रजातीचीही असू शकतात. कारण युरोपातला निअँडरटाल, सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वीच युरोपातून निघून मध्य-पूर्व आशियात पोचला होता. तिथूनच पंचावन्न हजार वर्षांपूर्वी तो या उत्तर अरेबिआत आला असावा.
हूव ग्राउकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे सर्व संशोधन, माणसाच्या वेगवेगळ्या काळातल्या भाऊबंदांचं, अरेबिआतलं अस्तित्व दर्शवतं. याचा अर्थ माणसाचे भाऊबंद, हवामान अनुकूल असताना, तात्पुरते का होईना, परंतु उत्तर अरेबिआत वावरत होते. निअँडरटाल, होमो सेपिअन्स, अशा विविध प्रजाती इथूनच अरेबिआ पार करून पलीकडील दक्षिण आशियात शिरल्या असाव्यात. हूव ग्राउकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या या शक्यतेनुसार, उत्तर अरेबिआ हे दक्षिण आशियाचं प्रवेशद्वार असू शकतं. यापूर्वीही जरी उत्तर अरेबिआतील मानवी वसतीचे पुरावे मिळाले असले, तरी ते अत्यल्प आणि विखुरलेल्या स्वरूपात होते. यामुळे मानवी स्थलांतरातला उत्तर अरेबिआचा सहभाग स्पष्ट होत नव्हता. परंतु हूव ग्राउकट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेले पुरावे हे अतिशय व्यापक स्वरूपाचे आहेत. माणूस हा दक्षिण अरेबिआतूनही दक्षिण आशियात गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु उत्तर अरेबिआनंसुद्धा माणसाला दक्षिण आशियाकडचा मार्ग दाखवून दिला असल्याचं, या संशोधनावरून दिसून येतं. असं असल्यास, अरेबिआत अधूनमधून येणाऱ्या या हिरवाईनं, पुरातन काळातल्या माणसाच्या प्रवासात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
चित्रवाणी:
https://www.youtube.com/embed/KZGIdepbeXU?rel=0
— डॉ. राजीव चिटणीस.
Leave a Reply