मराठी मना माझ्या नको अंत पाहू
पेटलेल्या युगी या नको मृत राहू ॥ धृ ॥
मराठी मना काय तुझी ही अवस्था
कशी अस्मितेची तुला ही अनास्था
मना-माझ्या मित्रा, ही कोणती रे निद्रा
जिवंतपणाला ही का आली सुस्तमुद्रा
मनोस्फुल्लिंगांना ही टाकतो मी ठिणगी
होण्यासाठी पुन्हा जिवंत, जाग पाहू ॥ १ ॥
कुणी आणावा राजा शिवाजी राणा
मराठी मनाचा ताठ बुलंदी कणा
तुम्हा का न स्मराव्या मराठी मर्दकहाण्या
का न आठवावा तुम्हा लोकमान्यांचा बाणा
आठवणींना उजाळा, का न स्फुरावेत बाहू ॥ २ ॥
कधी जीव जातो उसासून माझा
कधी जिजाई पुन्हा प्रसवेल शिवबा
तगमग जीवनाची भिडे काळजाला
आक्रंदे मन मी, किती वाट पाहू ॥ ३ ॥
मराठीस माझ्या न साहवे कोंडमारा
आवर्तनांची मनास सले वेदना ही
फुटावे काळीज उठावा धुमारा
पिसाटे मन, मी कसा मूक राहू ॥ ४ ॥
दुर्दैव; माते तुझी वेदना ही
तुझ्या अंतरीची, पूतां का न रुतावी
व्यर्थ जन्म त्यांचा क्षुद्र दुर्दैवी ते
कुठे न कळे कशी आग ही चेतवू ॥ ५ ॥
तुझ्यास्तव का न ते उरी फुटावे
तुझ्यास्तव का न मने बंडाने पेटावी
का न प्रतिज्ञा त्यांची रक्ताने सजावी
नको रे नको, असा निर्जीव होऊ
नको मराठी मना अस्मिता गहाण राखू ॥ ६ ॥
महद्भाग्य माझे, मातृभाषा ही माझी
फडकवीन ध्वजा अटकेपार जयाची
मराठी मना, घे हा तुझा पुढारी
उभारा हे बाहू, नका मागे राहू ॥ ७ ॥
— यतीन सामंत
Leave a Reply