ठाणे शहराच्या नाट्य परंपरेत डोकावून पाहिल्यावर एक विलक्षण योगायोग लक्षात येतो तो म्हणजे ठाण्यातील अनेक रंगकर्मी हे शिक्षणक्षेत्रात कार्यरत होते. अनेकांची नाट्यविषयक कारकीर्द विद्यार्थिदशेत अभिनय करण्यापासून किंवा खास विद्यार्थ्यांसाठी नाटके लिहिण्या-बसवण्यापासून सुरू झाली आहे. शिक्षकांमधला नट आणि नटांमधला शिक्षक असे परस्परांमध्ये मिसळलेले अनेक रंगकर्मी या शहराने अनुभवले. शिक्षण आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांत सारख्याच सहजतेने वावरणाऱ्या ठाणेकरांमधील सर्वात आघाडीचे नाव म्हणजे वि. रा. परांजपे!
आता वि. रा. परांजपे हे नाव घेतल्यावर आठवतं ते एम. एच. हायस्कूल आणि एम. एच. हायस्कूल ही तर जणू ठाण्यातील रंगभूमीची गंगोत्रीच. नाटकांच्या तालमींपासून ते राज्य नाट्यस्पर्धेच्या प्रयोगांपर्यंत ‘एमएच’ आणि ठाण्याच्या नाट्यवर्तुळाचं नातं अतूट होतं. साठच्या दशकात याच शाळेत शिक्षक म्हणून दाखल झालेले वि. रा. परांजपे अंतर्बाह्य नाट्यरंगात बुडालेले होते. ‘नाट्यमन्वंतर’ ही संस्था स्थापन करण्यात त्यांचाच पुढाकार होता. ठाण्यात राज्य नाट्यस्पर्धा सुरू झाल्यावर वि.रां.च्या नाट्यकर्तृत्वाला नवं आकाश मिळालं. 1956साली राज्य नाट्यस्पर्धेत पारितोषिक मिळवून ठाण्यातील राज्य नाट्यस्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवणारे पहिले कलावंत ही स्वतची ओळख त्यांनी तयार केली. त्यानंतर ठाणे नाट्यसंघाच्या माध्यमातून परांजपेसरांची रंगयात्रा सुरू राहिली. शाळेतल्या विद्यार्थ्यांचे नाट्यप्रवेश आणि नाटिका बसवण्याबरोबरच त्यांनी ‘अभिरूची मंडळ’ स्थापन करून शिक्षकांचे नाट्यप्रयोगही रंगमंचावर आणले. त्याकाळात परांजपेसर ठाण्यातील कलाकारांच्या संचातील ‘लग्नाची बेडी’ या नाटकात परागची भूमिका करायचे आणि तेव्हा या नाटकाचे 52 प्रयोग झाले होते, तेही एकाच संचात, एकही कलाकार न बदलता. हा एक विक्रम म्हणावा लागेल.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या स्थापनेत स. पां. जोशींसह पुढाकार घेणाऱ्या परांजपेसरांनी ही शाखा स्वतची वैयक्तिक जबाबदारी असल्याप्रमाणे वाढवली, फुलवली. नाटककार राम गणेश गडकरी स्मृतिदिन, रंगभूमी दिन हे दोन दिवस एखाद्या व्रताप्रमाणे निष्ठेने साजरे करण्याची प्रथा परांजपेसरांनी घालून दिली. त्याचबरोबर वेगवेगळ्या निमित्ताने ठाण्यातील हौशी, उत्साही नाट्यवेड्यांना एकत्र आणून त्यांचे नाट्यप्रवेश बसविणे, त्यांना अभिनयाचे मार्गदर्शन करणे हा जणू परांजपेसरांचा ध्यासच होता. 1996 साली नटवर्य मामा पेंडसे यांच्या स्मृती जागविताना परांजपेसरांनी स्वत ‘खडाष्टक’ आणि ‘भाऊबंदकी’मधला जो प्रवेश सादर केला, तो पाहून ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांनी ‘अविस्मरणीय’ अशी दाद दिली होती. गडकरी जन्मशताब्दी वर्षात नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे त्यांनी ‘वेड्यांचा बाजार’ हे नाटक अतिशय फर्मासपणे सादर केले. तेव्हा त्यांचा तो जोशपूर्ण वावर पाहून नाटककार विद्याधर गोखले यांनी त्यांना, ‘विरा, या वयात इतकी एनर्जी कुठून आणता?’ असे विचारले होते. विरांसारख्या अस्सल नाट्यधर्मी व्यक्तिमत्त्वासाठी नाटक, तालीम, प्रयोग हे शब्दसुद्धा एनर्जीचा साठा होता. काम लहानसं असलं तरी ते ठाशीवपणे करायचं ही त्यांची शिकवण होती आणि त्यांच्या प्रत्येक कामातून ते स्वतही ते अंमलात आणत. म्हणून तर 1988साली ‘एकच प्याला’ मधील दुसरा गृहस्थ साकार करताना विरांनी ‘बहुत दिन नच भेटलो…’ गुणगुणत अशी एण्ट्री घेतली की प्रेक्षकांनी कडाडून टाळी दिली.
7 ऑगस्ट 2004 रोजी वि. रा. परांजपे यांनी या जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली. आज ते हयात असते तर 100 वर्षांचे (जन्मतारीख 5 एप्रिल, 1916) असते. पण तरीही उत्साहाने तरुण मुलांना एकत्र करून नाट्यसंमेलनात सादर करण्यासाठी नाटकाचा प्रयोग बसवण्याच्या मागे लागले असते, यात शंकाच नाही.
साभार: नाट्यरंग मासिक २०१६.
Leave a Reply