अस्थमा (दमा) हा मध्यम व लहान श्वासनलिकांच्या अरुंदीकरणामुळे निर्माण झालेला दीर्घकाळ टीकणारा विकार आहे. दमा का होतो? कोणाला होतो? तो एवढा दीर्घकाळ पाठपुरावा का करतो? तो फक्त वृद्धांनाच होतो, की लहान मुलेही त्याचे शिकार होतात? दम्यावर गुणकारी उपचार आहेत का? असे अनेक प्रश्न दमेकरी व त्यांचे नातलग नेहमी विचारतात.
श्वासनलिका अरुंद झाल्याने त्यातून हवा मोकळेपणाने आत-बाहेर जाऊ येऊ शकत नाही. अशा वेळी श्वास घेण्यास अधिक जोर लावायला लागतो व रुग्णाला गुदमरल्यासारखे वाटते. अरुंद श्वासनलिकेतून हवा आत-बाहेर जाताना ‘शिट्टी’सारखा आवाज येतो (व्हिजिंग) आणि हे दम्याचे प्रमुख लक्षण आहे.
श्वासनलिकांतील स्नायू आकुंचन पावल्याने, नलिकांना सूज आल्यामुळे व नलिकांत अत्याधिक श्लेश्मा (कफ) साचल्याने या नलिका अरुंद होतात. या सर्व गोष्टी ज्या कारणांमुळे होतात त्यांना ‘ट्रिगर’ असे म्हणतात. धूळ, पुष्पपराग (पोलन), पाळीव प्राण्यांचे केस, गादी चटईतील सूक्ष्म किडे, झुरळे, भिंतीवरील बुरशी, तीव्र गंध, रासायनिक द्रव्य- भुकटी- वायू, प्रदूषण इत्यादी हे काही सामान्य ट्रिगरस आहेत. शारीरिक व्यायाम, श्रम, मानसिक ताणतणाव, चिंता, काळजी व दडपण असल्यासही दम्याचा त्रास होतो. दमा हा लहान मुलांमध्ये किंवा प्रौढ वयोगटांत कधीही सुरू होऊ शकतो. आई-वडिलांना दमा असल्यास मुलांना दमा होण्याची शक्यता अधिक असते; पण हे बंधनकारक नव्हे. श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे, छातीवर दडपण येणे, श्वास घेताना छातीत घरघर होणे, वारंवार होणारा खोकला, रात्रीचा खोकला इत्याद
ही काही अस्थमाची प्रमुख लक्षणे आहेत. शारीरिक व्यायामामुळे येणारा खोकला हेसुद्धा दम्याचे लक्षण असू शकते. अस्थमाचे निदान स्पायरोमेट्री या तपासणीने केले जाते. या चाचणीत फुप्फुसाच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतला जातो व अस्थमाच्या औषधांची उपयुक्तता मोजली जाते.
-कविता मोदी-कुबल
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply