अत्यंत विनोदी शैलीने राशी भविष्य उलगडणारे ज्योतिषी शरद उपाध्ये यांचा जन्म २१ सप्टेंबरला झाला.
अत्यंत विनोदी शैलीने राशी भविष्य उलगडणारे शरद उपाध्ये हे लेखक, ज्योतिर्विद्या जाणणारे उत्तम वक्ते व नाटककार आहेत आहेत. शरद उपाध्ये त्यांच्या ‘राशीचक्र’ या कार्यक्रमासाठी ओळखले जातात. शरद उपाध्ये हे श्रीनृसिंहवाडीच्या पुजाऱ्याचे उपाध्ये असून मुंबईमध्ये ‘ज्ञानब्रम्ह ज्योतिष संस्था’ गेली अनेक वर्षे चालवीत आहेत. आठवड्याच्या सातही दिवशी सात वेगवेगळे फलज्योतिष वर्ग सुशिक्षित स्त्री- पुरुषांच्या भरगच्च गर्दीत अव्याहतपणे इतके वर्षे चालविणारी ही एकमेव संस्था आहे. ज्योतिष वर्गाव्यतिरिक्त जाहीर व्याख्याने, प्रवचने, ‘राशीचक्र’ हा एकपात्री प्रयोग, श्री जगदंबेचा गोंधळ, शिवरात्र- नवरात्र असे उत्सव इत्यादी विविध कार्यक्रमांच्या द्वारे श्री शरद उपाध्ये यांनी खूपच अध्यात्म प्रसार केला आहे. श्रीलक्ष्मी-नृसिंह ट्रस्टचे ते प्रमुख विश्वस्त असून श्रीनृसिंहवाडी येथे भाविकांसाठी ‘वेदभवन’ ही भव्य वास्तू १९९१ मध्ये त्यांनी बांधली व तेथे आता सतत धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होत असतात. ट्रस्टची ‘श्री भक्तीसागर’, ‘श्रीदत्तप्रबोध’, ‘श्रीनृसिंह माहात्म्य’, ‘श्रीशाकंभरी माहात्म्य’, ‘अशी जन्मली श्रीनृसिंहवाडी’, ‘श्रीदत्तस्तवनामृत’, ‘प्रासादिक श्री दत्तउपासना’ ही प्रकाशने तसेच ‘वेदभवन’ च्या सात स्मरणिका ट्रस्टतर्फे प्रसिध्द केल्या आहेत. ही सर्व प्रकाशने अत्यंत लोकप्रिय झाली आहेत.
‘श्रीजगदंबेचा गोंधळ’ ही ध्वनिफित भक्तांना फारच आवडली. ट्रस्टतर्फे वेदभवन वर्धापनदिनानिमित्त वैद्यक-शिबिरे आयोजून हजारो रुग्णांची विनामूल्य तपासणी व औषधोपचार केले जातात. ‘राशीचक्र’ हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम तर देशभरात रसिकांनी डोक्यावर घेतला आहे. राशीचक्र या कार्यक्रमाचे त्यांनी विक्रमी ३००० हून अधिक प्रयोग केले आहेत.
ज्योतिषविषयक लेख व विपुल ललित लेखन शरद उपाध्ये यांनी केले आहे. ‘वंदना’ हा ललितकथासंग्रह तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय. ‘भविष्यरंजन’ हा कार्यक्रमही रसिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेला आहे. त्यांचे ज्योतिषविषयक ‘राशीचक्र’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी १२ राशी व त्यांचे स्वभाव गुणवर्णन केले आहे. याच विषयावर आधारीत ते राशीचक्र व राशीरंजन हे एकपात्री कथाकथनाचे प्रयोग करतात.
शरद उपाध्ये यांनी “वंदना” ही कादंबरी व प्रारब्ध हे दोन अंकी नाटक लिहीले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
खूप छान … शरदजींवर पुन्हा अशी विस्तृत लेखन आवडेल…त्यांचे ज्योतिषविषयक अचूक निदान आणि राशींची ओळख आजच्या पिढीला घडवेल..पुन्हा एकदा त्यांचे विचार दूरवर पसरावेत हीच दत्तचरणी प्रार्थना.