भिडतांच नजरेस ती, कुण्या एके क्षणीं ।
कुठेतरी अंतरीं, उठले तरंग प्रतीचे क्षणीं ।।
नयन-कटाक्षांतुनि एकाच, केलेस विद्ध तूं ।
लोटूनि गर्तेत विरहाच्या, गेलीस निघून तूं ।।
क्षणीं अशा या,
एकदां तरी, येशील कां परतूनि तूं ।।१।।
गुंफल्या, स्मृती-पाशीं, मोहक क्षणांच्या पाकळ्या ।
हलकेच हृदय-कोंदणी, ठेविण्या जपून अवघ्या ।।
रम्य तव सहवासांतल्या, परी-कथा त्या आगळ्या ।
कळे न मजसी, कशा त्या, विरुनि सार्या गेल्या ।।
क्षणीं अशा या,
एकदांतरी, येशील कां परतुनि तूं ।।२।।
कधी कळीं अंतरी, डोकावले जरी मी खुषित ।
तरल तव प्रीति-गंध, असेल तरळत स्मृतींत ।।
धुंद गंधातल्या, भाव-विभोर क्षणांच्या मस्तीत ।
कातरवेळीं असशील तूं, माझ्या स्मृतींच्या मिठीत ।।
क्षणीं अशा या,
एकदांतरी, येशील कां परतुनि तूं ।।३।।
भाग्य माझे, लाभला स्वप्नवत, तव सहवास ।
जीवनीं उरल्या, निश्चये, पुरे तो मधुमास ।।
असेल स्मृती-पटलावरी, कोरलेली तव आस ।
गेलो विस्मृतीत तरी, साथीस असेल ती खास ।।
क्षणीं अश या,
एकदांतरी, येशील कां परतुनि तूं ।।४।।
-गुरुदास / सुरेश नाईक
१० फेब्रुवारी २०१२
ओम् नम: शिवाय”
पुणे – ३०
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply