वार्धक्यावस्थेचे नियोजन करणे आज गरजेचे झाले आहे. या नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते आर्थिक नियोजन. त्यामुळे सुरुवातीपासूनच आर्थिक शिस्त अंगी बाणवून घेणे अत्यावश्यक ठरते. त्यामुळे निदान आर्थिक परावलंबित्वापासून सुटका होणे शक्य आहे. आर्थिक स्वातंत्र्य आणि शारीरिक स्वावलंबन हा आदर्श वार्धक्याचा पाया आहे.
हल्लीच एका परिचित वृद्ध स्त्रीच्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही केली. निघताना वकील मैत्रिणीनं त्यांना परत परत बजावून सांगितलं, की या मृत्युपत्राच्या तीन-चार प्रती काढून त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. जवळच्या लोकांना सांगून ठेवा की तुम्ही मृत्युपत्र केलं आहे. बाई मान हलवून हो हो म्हणत होत्या पण त्यांना त्याचा अर्थ नीट समजला आहे का, याची खात्री वाटत नव्हती. त्यामुळे त्यांना घरी सोडताना पुन्हा सगळं समजावून सांगितलं. मी घरी आले तरी तो विषय मनातून जाईना. वयाच्या 89 व्या वर्षी, अगं गलितं पलितं मुंडम् अशी अवस्था झालेली असताना त्यांना मृत्युपत्र करावंसं वाटलं हेच विशेष होतं. सगळं आयुष्य स्वतःच्या अटींवर, स्वाभिमानाने आणि स्वयंपूर्ण रीतीने जगल्यावर शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटणं अतिशय स्वाभाविक आहे. पण शेवट गोड होणे काही अंशी तरी आपल्या हाती आहे. कसं ते समजून देण्यासाठी सिमॉन द बोव्हा या फ्रेंच विचारवंत लेखिकेचं ‘ओल्ड एज’ हे पुस्तक वाचायला हवं. मुळात हे पुस्तक म्हणजे सहाशे पन्नास पानांचा दणदणीत ग्रंथराज आहे. केवळ वार्धक्यविचार या विषयाला वाहिलेला. या पुस्तकाचा संक्षिप्त मराठी अनुवाद ‘वार्धक्यविचार’ या नावाने मंगला गोडबोले यांनी केला आहे. या पुस्तकातील लेखिकेच्या निरीक्षणांचा आधार प्रस्तुत लेखाला आहे.
मानवी शरीर हळूहळू निश्चितपणे क्षीण होऊ लागते. माणसाच्या कृती मर्यादित होतात, दिसणे, ऐकणे इत्यादी क्षमता क्षीण होतात, आकलनशक्ती मंदावते. हळूहळू एकूणच परावलंबित्व वाढू लागते. त्यामुळे वार्धक्याचा विचारही माणसे टाळू पाहतात. मृत्यूपेक्षाही वार्धक्य अधिक वेदनादायी, अधिक दुःखदायी आणि म्हणून अधिक अस्वस्थ करणारी अवस्था आहे. ती अपरिहार्य आहे, कधी ना कधी तिला तोंड द्यावे लागणार आहे हे नीट जाणून वार्धक्यावस्थेचे नियोजन करणे आज गरजेचे झाले आहे. या नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते आर्थिक नियोजन. त्यामुळे सुरुवातीपासूनच आर्थिक शिस्त अंगी बाणवून घेणे अत्यावश्यक ठरते. त्यामुळे निदान आर्थिक परावलंबित्वापासून सुटका होणे शक्य आहे. आर्थिक स्वातंत्र्य आणि शारीरिक स्वावलंबन हा आदर्श वार्धक्याचा पाया आहे. आपल्या अनुभवाच्या बळावर शक्य तितके सामाजिक काम करीत राहणे, एकटेपणावर मात करण्यासाठी कोणत्याही मोबदल्याशिवाय लहानमोठ्या पण झेपेल इतक्या कामात गुंतून राहणे याची पूर्वतयारी करायला हवी.
विकसित देशांमध्ये वृद्धांना नियमित निवृत्तीवेतन, आरोग्यविमा, करमणुकीची साधने इत्यादी सुविधा उपलब्ध असतात. आपल्यासारख्या देशात मात्र या सुविधा अजून बर्याच दूर आहेत. त्यामुळे सध्यातरी स्वतःच्या वृद्धत्वाचे शक्य तितके नियोजन स्वतःच करणे क्रमप्राप्त आहे.
इंग्रजी भाषेत वयाच्या या अवस्थेला ओल्ड – म्हणजे जुना-पुराणा, टाकावू, निरुपयोगी असा शब्द आहे तर मराठीत वृद्ध! वृद्ध म्हणजे वाढलेला. वयाने, ज्ञानाने, अनुभवाने समृद्ध तर ही अशी समृद्धी अखेरपर्यंत टिकावी, तिचा सार्थ अभिमान वाटून कृतार्थ वाटावे, यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. आनंदी वृद्धत्वासाठी मालकी हक्काची भावना मोठाच अडसर ठरू शकते. माझ्या वस्तू, माझी जागा, माझी वेळ या माझेपणातून मन सोडवून घेणं ही पहिली पायरी. कुठून येतं हे माझेपण? शरीरमनाच्या दुर्बळ अवस्थेत आधारासाठी किंवा संरक्षणासाठी जुन्या सवयीच्या वस्तू, व्यक्ती, ठिकाणं, जागा यांना अधिकाधिक धरून ठेवण्याची वृत्ती हे या माझेपणाचे मूळ आहे. कोणतीही नवी गोष्ट स्वीकारणे किंवा जुन्यामध्ये बदल करणे टाळले जाते आणि त्यामुळे हे गुंतलेपण अधिकाधिक वाढत जाते. सत्ता, अधिकार, खराखुरा आदर यांची आस प्रत्येकच माणसाला असते पण वार्धक्यात ही पकड हळूहळू सुटत चालली की आटापिटा करून ते धरून ठेवावेसे वाटते. त्यातूनही अनावश्यक गुंते वाढतात. तरुण पिढीकडून केल्या जाणार्या अपेक्षा, पारंपरिक सणवार, खाणेपिणे, पेहराव, जाण्यायेण्याच्या वेळा इतकेच नव्हे तर अगदी तरुणांच्या खरेद्यासुद्धा वृद्धांना रुचत पटत नाहीत. त्यातूनही आमच्यावेळी असं नव्हतं, माझ्या राज्यात मी असे घडू दिले नसते इत्यादी विधाने केली जातात. स्वतःच्या तब्येतीविषयी सतत तक्रारी करणे व त्यायोगे सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेणे, आपल्याकडे कुणी लक्ष देत नाही या भावनेने न्यूनगंड निर्माण होणे, सतत चिंताग्रस्त राहणे, निराशेने पछाडणे इत्यादी मानसिक विकार त्यातूनच उद्भवतात. विविध आर्थिक गटातल्या वृद्धांचे प्रश्न आणि गरजा वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, कनिष्ठ आर्थिक गटातील वृद्धाला लहान घर, गैरसोयी, रंजन व करमणुकीचा अभाव हे प्रश्न भेडसावतील तर उच्च आर्थिक गटातील वृद्धाला एकटेपणाचा प्रश्न सतावेल. एकटेपणा, निष्क्रियता यांमुळे शरीराचा व मनाचा तोल जाण्याचा धोका असतो.
सदोष नातेसंबंध हे या एकटेपणाचे मूळ आहे. तारुण्यात नाती जोपासणे, माणसे जोडणे, वेळप्रसंगी कमीपणा घेऊन नात्यांची जोपासना करणे या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले की एकटेपणा अटळ होतो. विशेषतः शहरांमधील माणूस अधिक एकटा होत चालला आहे.
अविकसित देशांमध्ये मर्यादित संसाधने आणि त्या तुलनेत भरमसाठ लोकसंख्या यामुळे जिथे तरुण आणि मुले यांच्या शिक्षण, पोषण आणि संस्करणासाठी अधिकाधिक शासकीय प्रयत्न होतात. विविध योजना राबवल्या जातात, ते रास्तच आहे पण त्याचाच व्यत्यास म्हणजे वृद्धांची जास्तीत जास्त आबाळ होते. जिथे तरुणांना घरे व नोकर्या नाहीत तिथे वृद्धांसाठी वेगळ्या तरतुदी कशा करता येणार? शासनाने त्या करायला हव्यात यासाठी वृद्धांची संघटित शक्ती उभी करणे देखील अवघडच आहे.
दिवसेंदिवस धावपळीच्या दिनक्रमात वृद्धांना कुटुंबात सामावून घेणे जसजसे अवघड होत जाईल तसतशा वृद्धगृह, सुश्रुषागृह, वृद्धांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था किंवा डे केअर सेंटर्स अशा संस्थांची गरज वाढत जाणार. वृद्धांना सांभाळण्याचा यशस्वी धंदा परदेशात अनेक संस्था इमानेइतबारे करतात. आपल्याकडे अजून तितकी चोख व्यावसायिकता दिसत नाही हे खरे, पण ती यावी म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. वृद्धांसाठीच्या संस्थांचा स्वतंत्र विचार आणि अभ्यास करून आदर्श वृद्धगृहे निर्माण करणे ही काळाची गरज आहे. अशा संस्थांच्या परिसरात एखादं बालक मंदिर, एखादी शाळा, एखादे वाचनालय, देवालय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सभागृह अशी विविधता असणे गरजेचे आहे. त्यामुळे तो परिसर एकांगी व एकरंगी न राहता जीवनाने रसरसलेला राहील. या दृष्टीने वृद्धाश्रमांची आखणी आणि नियोजन करणे शक्य आहे.
वृद्धाश्रम आकाराने लहान आणि व्यवस्थापनास सुलभ असावा. गावापासून फार दूर नसावा पण गावातील कोलाहलाचा फारसा संपर्क नसावा. अन्न, वस्त्र, निवार्याचा गरजा सन्मान्य रीतीने अल्प मोबदल्यात भागाव्यात. उद्योगसमूहांनी किंवा शासनाने वृद्धाश्रमांना ठराविक निधी द्यावा. आहारविहाराचे किमान स्वातंत्र्य तिथे असावे. म्हणजे ज्यांना इच्छा आहे आणि शक्य आहे, त्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करण्याची मुभा असावी. आप्तेष्टांना भेटण्यासाठी केव्हाही येण्याजाण्याची सवलत असावी. इच्छा आणि क्षमता असलेल्या वृद्धांना वृद्धाश्रमाच्या दैनंदिन कामकाजात आर्थिक मोबदला देऊन समाविष्ट करून घेतले जावे. वैद्यकीय सेवा आणि करमणूक या दोन ठळक गरजा तिथे भागवल्या जाव्यात. भावनिक ऊब, आपुलकी या गोष्टी संस्थांमध्येही मिळाव्यात. तरच एकमेकांना पूरक व्यवहार करीत, समानतेच्या पातळीवर आणि सुखदुःखाची देवघेव करीत आयुष्याचा हा अखेरचा कालखंड निरामयपणे घालवणे शक्य होईल.
कमी होत जाणारे व्याजदर आणि वाढणारी महागाई, भरमसाठ वैद्यकीय खर्च, मदतनिसांना द्यावा लागणारा मोबदला इत्यादी अनेक खर्च आणि त्यांची तरतूद हे वृद्धत्वाचे खरे आव्हान आहे. त्यामुळे समाजमानस बदलणं, वृद्धांच्या प्रश्नांबाबत जाणीव आणि जागृती निर्माण करणं आणि वृद्धांचा जगण्याचा हक्क मान्य करणे, यातूनच काहीतरी मार्ग निघू शकेल.
वृद्धांसाठी मासिके, पुस्तके व इतर करमणूक हवी. स्वतंत्र कार्यक्रम आणि सहली हव्यात. प्रवास व औषधोपचार स्वस्तात हवेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदे हवेत. या मागण्या अवास्तव नाहीत पण त्यांची पूर्तता करण्यात आपल्यासारख्या विकसनशील देशाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याचे भान ठेवून या मागण्यांचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. पूर्वी आपल्याकडे आध्यात्मिक बैठकीचे महत्त्व होते. आज आध्यात्मिकतेची ही कल्पना थोडी लवचिक करून घ्यावी लागेल. क्षुद्र स्वार्थ, स्पर्धा, मत्सर आणि हेवेदावे यांच्या अतीत नेणारा एखादा ध्यास, एखादा छंद सापडणे हे खरे महत्त्वाचे. आयुष्याच्या शक्य तेवढ्या अखेरीपर्यंत झोकून देण्याचे एखादे काम, एखादा प्रकल्प किंवा प्रयोजन मिळवणे व्यक्तीच्या आवाक्यातले असते. दैनंदिन जगण्यातले संघर्ष संपणारे नसले तरी मग ते कमी महत्त्वाचे वाटू लागतात. त्यावर वेळ व शक्ती खर्च करू नये हे जाणवते आणि बाह्य परिस्थितीने वृद्धांचे जगणे कितीही निरर्थक ठरवले, तरी आपल्यापुरता अर्थ आपल्याला गवसतो. त्यामुळे एकाचवेळी व्यक्तिगत पातळीवर आणि संस्थात्मक पातळीवर ’वृद्धत्वाचे नियोजन’ अत्यावश्यक ठरते.
–डॉ. वंदना बोकील कुलकर्णी
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply