( जुन्या काळीं, अर्जन्सी दर्शविण्यासाठी असें लिहीत –
‘जेवत असलात तर हात धुवायला इकडेच या’.
त्या आधारानें, हें काव्य, जरासें खट्याळ ).
तुम्ही
तातडीनें इकडे या,
अर्जंट या.
जेवत असलात तर
हात धुवायच्या आधी
इकडे या.
अन् मत द्या.
पाणी पीत असलात तर
फुलपात्रं खाली ठेवण्यांआधी
इकडे या.
अन् मत द्या.
आंघोळ करत असलात तर
कपडे बदलण्यांपूर्वी,
ओल्या कपड्यांनीच
इकडे या.
अन् मत द्या.
पण दुसरा ‘अर्जंट कॉल’
आला असला,
आणि तुम्ही
टॉयलेटमध्ये असलात तर,
तर घाई करूं नका,
तुमचा वेळ घ्या,
तिकडेच हात धुवा,
नंतर या.
मात्र, या.
अन् मत द्या.
(आणि तेंही आम्हालाच). १
कारण,
तुमच्या भेटी घेऊन,
अन् तुम्हाला ‘भेटी’ देऊन
आम्ही इनव्हेस्ट केलेलं आहे,
त्याचं ‘रिटर्न’
नको कां आम्हाला मिळायला ? २
आमचा कँडिडेट
निवडणुकीतून ‘रिटर्न’ होऊन
घरीं बसायला नको ;
तर, तो
MLA म्हणून
विधानसभेत
‘रिटर्न’ व्हायला हवा. ३
म्हणून,
जेवत असलात तर
हात धुवायच्या आधी
इकडे या.
अन्, टॉयलेटमध्ये असलात तर
दमानं या,
हात धुवून या.
पण या जरूर. ४
हात धुवा किंवा धुवूं नका,
पण धुतल्या तांदळासारखं वर्तन ठेवा,
या, आम्हांलाच मत द्या,
आणि आम्हांलाच जिंकवा. ५
– – सुभाष स. नाईक