लोचनांना दीपविणारे ब्रह्माण्ड!!! असिमीत अमर्यादित सृष्टी! कुठल्याच मोजमाप दंडांनी न मोजता येणारी!! अथांग! महाकाय, भौगोलिक उंची, रुंदी, खोली, लांबी सारं सारं अशक्य अतर्क्य! असिमीत!! आणि तो अनंतरुपी अनामिक जो कुणी आहे तोही दृष्टिपल्याडला असा अदृश्य, अनाकलनीय!!!
पण सारं कालचक्र अव्याहत, अविरत चालविणारा तो कोण ?? हे सारं विचारां पलीकडचं आहे हे मात्र जाणवतं! आपणही कोण ? कुठले ? कुठले हे ऋणानुबंध ? कुठले नाते ? कुणाबद्दल ओढ कां ? तर कुणाबद्दल तिरस्कार कां ? हे सारेच न उमजण्या सारखे!!
जीवित सृष्टी! अगणित योनी! प्रत्येकाला जन्म—मरण प्रारब्ध! भोग! लालसा! मोक्ष —मुक्ती! प्रीती—! भक्ती! विरक्ती! श्रद्धा! सबुरी! पाप —! पुण्य!सुख! दु:ख! वेदना! शाश्वत! अशाश्वत! खात्री, विश्वास, संभ्रम! निश्चिन्त! चिंतीत! विवेकी! अविवेकी कृतज्ञ! कृतघ्न! क्रोध! असूया! भय! अन्याय! अत्याचार! सहाय्य! असहाय्य! अशा या परस्पर विरोधी मनामनांच्या विविध जाणिवा, प्रचिती, अवस्था!!
या सर्वासोबत जीवाजीवांची अविरत वाटचाल युगांनुयुगे अखंड सुरू तर आहे
या साऱ्याच जीवनानुभूतीचे अंतरात अविरत स्मरण असण्याचं वरदान देणाराही तोच, आणि तोच डोळ्यांना दिसत नाही आणि त्याला पाहण्याची, त्याला भेटण्याची प्रत्येकाला तीव्र ईच्छा मात्र आहे
हे वास्तव सत्य आहे!!
प्राचीन कालीन सर्वच ग्रंथ संपदेतून म्हणजे अगदी विष्णूपुराण, रामायण, महाभारत, भगवतगीता, धर्मसिंधु, मनुस्मृती अशा अनेक हिंदू धर्मातुन तर अगदी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, दासबोध तसेच महानुभाव पंथाच्याही वाङ्म्यातुन, अनेक धार्मिक ग्रंथसंपदेतून आपल्या भारतीय संस्कृतीवर प्रकाशझोत टाकलेला आहे आजही अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमातुन प्रवचने, कीर्तने, व्याख्याने तसेच धार्मिक ग्रंथांच्या सामुदायिक कार्यक्रमातून संस्कृतीचा प्रसार होत असून हे जे अतर्क्य आहे, जे अगम्य आहे, जे अनाकलनिय आहे, ज्याला ईश्वर, भगवंत, अल्ला, येशू, इत्यादी नामाभिधानाने आज संबोधले जाते त्या सामर्थ्य शक्तीला त्या रूपाचा शोध घेण्याचा, त्याच्या अस्तित्वाचा अर्थ उलगडण्याचा प्रयास चालू आहे हे आपण जाणतो.
सर्वच समाजात तो अनाकलनिय मुळात नाहीच! किंवा तो अनाकलनीय निश्चित स्वरूपात आहेच!! असे दोन प्रकारचे परस्पर विरोधी मतप्रवाह आहेत ही वास्तवता आपण कुणीच नाकारू शकत नाही.
खरे तर या अगाध शक्तीच्या सत्य अस्तित्वाचे उत्तर हे प्रत्येकाच्या जीवनात झालेल्या संस्कारावर किंवा आलेल्या सश्रद्ध अशा अनुभूतीवर अवलंबून आहे असे मला वाटते
आपल्या नजरेपुढे सातत्याने येणारी निसर्गाची प्रसन्न, विलोभनिय अनेक रूपे पंचमहाभूतांचे नैसर्गिक अदभूत आविष्कार हे सारे मानवी मनाला निःशब्द करणारे आचंबीत आहेत सृष्टीचं सारच रूप देखील अलौकिक स्तिमित करणारं आहे!
चराचराचे हे लाघवी नयनमनोहर असे शांतीचेच मनभावणारे चिदानंदी चित्तस्वरूप आहे!!
अशा चिदानंदी ब्रह्मानंद देणाऱ्या, आत्मशांती देणाऱ्या अगम्य, अतर्क्य आविष्कार स्वरूपालाच तो दयाघन, तो ईश्वर, तो भगवंत, तो घननीळ, तो मेघश्याम, तो विठ्ठल, तो राम, तो कृष्ण, तो, महादेव, तो ब्रह्मदेव, ते विष्णुरुप अशी अनेक नावे दिली आहेत
(अन्य धर्मातही अशीच नावे घेऊन संबोधले जाते)
यांचे अस्तित्व चराचरात व्यापलेले आहे म्हणून तो सर्वत्र पालनकर्ता, सावरणारा, सवेश्वर आहे
जो आहे पण जो दिसत नाही म्हणून अतर्क्य, अनाकलनीय!!
पण हे अतर्क्य, अनाकलनीय रूप समजण्यासाठी, उमजण्यासाठी ऋषीमुनी, संतश्रेष्ठींनी, विद्वानांनी यांच्या तपश्चर्येतुन, साधनेतून ज्या ज्या वाङ्म्याची निर्मिती झाली, त्या अथक उपासनेतून जी विचारसाधना जन्माला आली त्याचा अभ्यास केला तर असे दिसून येते की
या अनाकलनीय अशा स्वरूपाचे वर्णन विष्णु सहस्रनामात केले आहे ते वर्णन सूक्ष्म स्वरूप व स्थूल स्वरुप आहे gravitational waves, पृथ्वी ते धृव यातील forces, waves याचं ही वर्णन अतिशय त्रोटक स्वरूपात आहे
जसे अतिसूक्ष्म quantum तसेच नवनवीन ब्राह्मण्ड गोल जे आपल्या सूर्यमालेतील ग्रह-तारे यांच्या 100 पट आहेत
कुठले देव ? कुठून आले वेद?
वेदकालाच्या निश्चिती संदर्भात स्व लोकमान्य टिळक यांनी केलेल्या संशोधनाला आता पुरातत्व शास्त्रानुसार पुरावे सापडू लागले आहेत
‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य टिळक हे संशोधकही होते आपण राजकारणात पडलो नसतो तर संशोधक होणंच पसंत केलं असतं, असं ते स्वतःच म्हणत असत त्यांनी लिहिलेला गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथराज तर सगळ्यांनाच परिचित आहे जुन्या पिढीतल्यांना लोकमान्यांचे हे ग्रंथ ठाऊक आहेत पण बहुतेकांनी ते वाचलेही नसतील हल्लीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ते ऐकनूही माहीत नसावेत
लोकमान्य टिळक हे प्राचीन भारतीय ग्रंथांचे दीर्घ काळ अभ्यासक होते त्यांचा सखोल आणि विस्तृत अभ्यास ‘गीतारहस्य’च्या वाचकाला थक्क करून टाकतो ‘
गीतेच्या १० व्या अध्यायात, अर्जुनानं ‘हे देवा, तुमचं चिंतन करताना मी तुम्हाला कशाकशात पाहावं?’ असं विचारल्यावर भगवान श्रीकृष्णानं ‘प्रत्येक वस्तुमात्रात मी प्रथम, मध्य आणि शेवट आहेजसं, पर्वतांमध्ये मी मेरू आहे, ऋतूंमध्ये मी वसंत आहे,’ असं सांगताना
‘मी महिन्यांमधला मार्गशीर्ष आहे, ’(अध्याय १०, श्लोक ३५) असं म्हटलं आहे अर्थातच, मार्गशीर्ष हा काही भारतीय वर्षाचा पहिला महिना नाही; मग कृष्ण असं का म्हणाला असावा? कारण, कधीकाळी मार्गशीर्ष हा वर्षाचा पहिला महिना मानला जात असावा, असं समजून अभ्यास करताना लोकमान्यांना असं आढळलं,
तेंव्हा वेद हे केवळ दंतकथा नाहीत, तर ते मानवाच्या बुद्धीच्या विकासाचे आलेख आहेत हे पटतं यावरून तो अनामिक म्हणजे महाभारतातील कथेवरून किंवा रामायणातील कथेवरून आहे याची जाणीव होते तेंव्हा ग्रंथ वाचल्यास तो अनामिक कोण याचे उत्तर आपल्याला मिळू शकते
भारतीय संस्कृती व संस्कारांच्या ज्या प्राचीन परंपरा आहेत त्या सर्व कल्याणकारी आहेत आणि या साऱ्या ब्रह्माण्ड स्वरूपीच असून अनामिक, अतर्क्य अगम्य वाटणाऱ्या भगवंताच्या साक्षात्काराचा सुलभ मार्ग दाखविणारा असून कर्ताकरविता तो एकची अनामिक दयाघन आहे याचीच याची देही याची डोळा साक्ष देणारा आहे
मानवी जीवनातील अंतिम एकच इछ्या असते जेंव्हा मृत्यू येईल तेंव्हा अनामिक भगवंता समोरच यावा जसे महाभारतात पितामह भीष्म यांच्या मृत्यूच्या वेळी साक्षात भगवान श्रीकृष्ण समोर होते त्यांचे दर्शन झाल्यानंतरच भीष्माचा देहांत झाला होता हा दृष्टांत आहे!
तसेच दशग्रंथी रावणला प्रभुरामचंद्रानी सागरकिनारी केलेल्या एका धार्मिक कार्याची दक्षिणा काय देवू असे विचारल्यावर ” रावण म्हणाला प्रभू माझ्याकडे चौदाचौकड्याचे राज्य आहे, सुवर्णलंका आहे मला कशाचीच अपेक्षा नाही,पण हे प्रभुरामा मला मृत्यू मात्र तुझ्याच हातून यावा ही माझी इछ्या आहे! ती तू पूर्ण कर!!
यातूनच सर्वशक्तिमान अशी जी अतर्क्य, अनामिक, अदृष्य शक्ती आहे ती म्हणजेच केवळ ईश्वर!!!
म्हणुनच या खालील प्रार्थनेने मी या लेखांकाचा समारोप करीत आहे
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णम शुभांगं
लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिर्भिध्यानं
वंदे विष्णू भवभयहरं सर्वलोकैकनाथं।।
अर्थ :-
जे रूप अत्यन्त शांत आहे जो शेषनागाच्या शय्येवर विराजमान आहे ज्याच्या नाभीमध्ये कमलपुष्प आहे आणि जो देवांचाही देव आहे संपूर्ण ब्रह्माण्ड व्याप्त असून त्रैलोक्याचा अखंडित शाश्वत आधार आहे स्वामी आहे उत्पत्ती, स्थिती, लय याचा अधिपती आहे अशा कल्याणकारी भगवान विष्णूला मी नमस्कार करतो आहे.
(इती लेखन सीमा)
— वि ग सातपुते.
9766544908
दिनांक :- २० जानेवारी २०२२
पुणे.
Leave a Reply