नवीन लेखन...

अथांग…..

तशी सुट्टीत दोन महीने भरपूर मज्जा करून झाली होती मुलांची ,
पण आता शाळा सुरू व्हायला काही मोजकेच दिवस शिल्लक होते.
म्हणून तो आपल्या मुलांना मुंबईला फिरायला घेऊन गेला.
दिवसभर मनमुराद भटकून शेवटी सूर्यास्ताला मरीन ड्राईव्ह गाठलं.
कितीही जीवाची मुंबई केली तरी क्वीन्स नेकलेसचा मोह होतोच.
सूर्यास्त बघण्यासाठी राणीच्या हारात गुंफली गेलेली अनेक हिऱ्यासारखी माणसं.
प्रत्येक जण आपपलं कोंडाळं करून आपल्याच कोंदणात रमलेले.
कुठे नातेवाईकांच्या किंवा मित्र मैत्रीणींच्या मोठ्या ग्रुपचं हसणं खिदळणं,
काही ज्येष्ठ नागरिक, काही प्रेमी युगुलं, काही परिवार, छोटे दोस्त,
ईव्हीनिंग वॉकला आलेली स्थानिक उच्चभ्रू मंडळी ,
त्यातल्या काही जणांसोबत शान मध्ये मिरवणारी त्यांची श्वान मंडळी,
आजूबाजूला फिरणारे चहा, पाणी, कुल्फी, साबणाचे फुगे विक्रेते .. वगैरे.
जो तो आपल्याच विश्वात आणि सेलफ्या-फोटो काढण्यात मशगुल.
समोर चमकणारा समुद्र , त्यापलीकडे दिसणारं मुंबईचं दुसरं टोक.
आणि किनाऱ्यावर समस्त मुंबईकरांच्या मनासारखेच एकमेकांत गुंतलेले दगड.

त्याची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती.
तो बालहट्ट पुरवत मुलांचे वेगवेगळ्या पोझेस मधले फोटो काढण्यात दंग होता.
मध्येच आपल्या कॅमेऱ्यात मावळतीचा सूर्य आणि मुंबईचं देखणं रूप टिपत होता.
इतक्यात त्या सगळ्या किलबिलाटापेक्षा काहीसं वेगळं त्याच्या कानावर पडलं.
“हॅप्पी बर्थ डे टू यू ss .. हॅप्पी बर्थ डे टू डियर ……!!”
नेहमीच्या चालीत असलं तरीही अगदी हळू आवाजात.
म्हणून त्याने कुतुहलाने लगेच बाजूला बघितलं.

कठड्यावर बसलेला एक ९-१० वर्षाचा लहान मुलगा.
साधारण मावाकेकच्या आकाराचा केक तो छोट्या प्लॅस्टिकच्या चमच्याने कापतोय.
त्याच वेळेस त्याच्या बाबांकडे बघत अगदी गोड हसतोय.
त्याचे बाबा भली मोठी बॅग सांभाळत, वाढदिवसाचं गाणं म्हणत त्याचा व्हिडियो करतायत.
बाजूला बसलेली आई कडेवर झोपलेल्या धाकट्या मुलीसह त्या आनंदात सहभागी होतेय.
केक कापून झाल्यावर खायला म्हणून समोर आईस्क्रीमचे ३ कप दिसतायत.
ते छोटंसं कुटुंबं आपल्या परीने लेकाचा वाढदिवस अगदी मस्त साजरा करत होते.
तेही मुंबईच्या प्रसिद्ध समुद्र किनारी, सूर्याच्या साक्षीने.
या सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे त्या लहानग्याच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद.
ते दृश्य बघून त्याला आजवर बघितलेल्या वाढदिवसांचे समारंभ आठवले.
भरगच्च सजावट, दोन तीन मजली केक, जोरजोरात गाणी वगैरे.
इथे ते सगळं काही नसूनही मुलगा मात्र एकदम खुश होता.
एकंदरीत त्यांचा पेहेराव , राहणीमान वगैरे बघता ते सुस्थितीतले वाटत होते.
पण तरीही आईवडिलांनी आपला वाढदिवस असा उरकून टाकलाय ;
किंवा पार्टी करायची सोडून हे कुठे घेऊन आलेत आपल्याला ?
असे भाव त्या मुलाच्या चेहऱ्यावर अजिबातच नव्हते.
अगदी मनापासून सगळं “एंजॉय” करत होता तो.
मुळात छोटेखानी समारंभ करण्यासाठी तुम्ही गरीबच असायला हवं आणि निखळ-भरघोस आनंद मिळवण्यासाठी तुम्ही श्रीमंतच असायला हवं असं थोडंच आहे ?
इच्छा असल्यास कमीत कमी पैशात जास्तीत जास्त समाधान मिळवता येऊच शकतं.
त्या कुटुंबाकडे बघून तर ते अगदीच अधोरेखित होत होतं.

ते सगळं साजरं करून त्या सगळ्यांनी आता आईस्क्रीमकडे मोर्चा वळवला होता.
ते एकमेकांशी काय आणि कुठल्या भाषेत बोलत होते ते ऐकू सुद्धा येत नव्हतं गोंगाटात.
पण तो अनोखा वाढदिवस बघितल्यानंतर ते कसे होते ? त्यांची परिस्थिती ? त्यांची भाषा ?
उपनगरात राहणारे होते की बाहेरगावाहून मुंबई बघायला आले होते ? वगैरे
असे तर्क किंवा प्रश्न पडण्याची गरज भासलीच नाही त्याला.
कारण ते दृष्य, त्यांचं समाधान खूप काही सांगून जात होतं.
अगदी या सगळ्याच्या पलीकडचं ..

एव्हाना सूर्याने स्वतःला ढगांच्या पांघरूणात गुरफटून घेतलं होतं.
आजूबाजूला पाहिलं तर अजूनही जो तो आपल्याच नादात ..
सगळे अगदी मंत्रमुग्ध झालेले.
पण त्याला मात्र नजरेसमोर आता दोनच गोष्टी अगदी प्रकर्षाने दिसत होत्या.
कधी शांत तर कधी खळाळत सर्वकाही सामावून घेणारा विलोभनीय समुद्र …..
अगदी “अथांग”

आणि त्या लहानग्याच्या चेहऱ्यावर उमललेला निरागस आनंद …..
तोही तितकाच .. “अथांग”

©️ क्षितिज दाते, ठाणे
आवडल्यास text शेअर/फॉरवर्ड करायला माझी काहीच हरकत नाही …

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..