माझी लाडकी माझी आई झाली होती, कोवळ्या हातांनी मला थोपटू लागली. ती आठवण मग उतरवली मी कागदावर.
कधी तरी अगदीच कधी तरी
‘सौ‘ काही दिवस नसायची घरी…
सोनुली माझी मजेत रहायची
हौस मला तिची आई होण्याची…
पण…
झोपायची वेळ झाली की
कावरे बावरे व्हायची…
म्हणायची मग, मम्मी कुथे गेली
पप्पा, मम्मी कुथे गेली ?…
मी म्हणायचो,
येइल बघ आता ती कधीपण…
चल, खोटं खोटं झोपायचं का आपण…
मग ती घ्यायची
खोटं खोटं डोळे मिटून…
माझे डोळे मात्र जायचे
आसवांनी भिजुन…
आणि मग त्या रात्री
थोड्या वेळाने पुन्हा
तिने हळूच डोळे उघडले…
माझे ओलावले डोळे
नाही मला लपवता आले…
म्हणाली, पप्पा खरं खरं सांग ना
तुला पण मम्मीची आठवण येतेय ना ?…
आणि मग
कोवळ्या हाताने
मलाच ती थोपटू लागली…
पप्पा जो जो म्हणत
अलगद झोपी गेली.
– डॉ. सुभाष कटकदौंड, खोपोली.