आठवणींच गाठोडं
मनाच्या चोर कप्प्यात ठेवलेलं
छोट्या अनुने हट्ट केला
तेव्हा पहिल्यांदा बाहेर काढलेलं
अनु नेहमी हट्टानं विचारत
काय आहे पप्पा गाठोड्यात…?
मग मीही सगळ्या आठवणी
ओतायचो तिच्या पुढ्यात
आठवणी मग घेवून जात
तिला माझ्या भाव विश्वात
तिला गाढ झोपवुनच
परतायच्या त्या गाठोड्यात
वेळ आहे तिची आता
तिच्या विश्वात रमण्याची
सवय झालीय मला
गाठोडं उशाशी घेऊन झोपण्याची
जेव्हा अनु नसते घरी
गाठोड्याची गाठ सुटत नाही
आठवणींची घूसमट तेव्हा
माझ्याच्याने बघवत नाही
काल अनु आली होती घरी
अचानक तिला गाठोडं आठवलं
काढल मी बाहेर पटकन
अन् पुढ्यात तिच्या ठेवलं…
विचारलं तिला, माझ्या माघारी
गाठोड्याच काय होइल ग अनु ?
डोळ्यात पाणी तरळलं तिच्या
म्हणाली,
पप्या, नको ना रे असं म्हणु
डबडबलेले डोळे पुसले तिने
अन् गाठोडं उराशी आवळलं…
मला न विसरण्याच वचन ते
शब्दांविनाही मला कळलं.
– डॉ. सुभाष कटकदौंड