आठ वर्षांपूर्वी अण्णांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवशी रमेश, मी व डोंबिवलीचे आमचे मित्र चाटीकाका असे तिघेही सोमवार पेठेतील त्यांच्या घरी सकाळी गेलो होतो. अण्णा भेटले, त्यांना मिठाईचा बाॅक्स देऊन शुभेच्छा दिल्या. आमच्या भरपूर गप्पा झाल्या. त्याचवेळी अॅडव्होकेट प्रमोद आडकर देखील अण्णांना भेटण्यासाठी आले होते. काकूंनी पोहे केले, दोन वेळा चहा झाला. नंतर आम्ही अण्णांचा निरोप घेऊन निघालो.
त्यानंतर जेव्हा जेव्हा चाटीकाका पुण्यात आले, आम्ही अण्णांकडे जायचे ठरवून सुद्धा जाणे झाले नाही. दरम्यान आठ वर्षे निघून गेली आणि काल सायंकाळी अण्णा गेल्याचं समजलं. फार वाईट वाटलं. एका हरहुन्नरी कलाकाराने ‘एक्झिट’ घेतली…..
पंचेचाळीस वर्षांपूर्वी मी रोज सकाळी पर्वती चढायला जात असे. त्यावेळी अण्णादेखील पर्वतीच्या पायऱ्यांवरुन उतरताना दिसायचे. हातात एक टर्किशचा रूमाल घेऊन ते दोनवेळा पर्वती चढून उतरायचे. त्यावेळी एक नाट्यकलाकार म्हणूनच मी त्यांना ओळखत होतो.
एकदा भरत नाट्य मंदिरात ‘अश्रूंची झाली फुले’ नाटक पाहिलं. तेव्हा काशिनाथ घाणेकरांच्या ‘लाल्या’ सारखाच अण्णांचा ‘धर्माप्पा’ देखील कायमस्वरूपी लक्षात राहिला.
जेव्हा नाटक चित्रपटांची डिझाईन करु लागलो तेव्हा अण्णांचे फोटो काढून डिझाईन करण्याची संधी मिळाली. भक्ती बर्वेच्या ‘डबल गेम’ नाटकाची डिझाईन करीत होतो. तेव्हा सर्व कलाकारांचे फोटो काढून अनेक डिझाईन्स केली. तेव्हा अण्णांशी खूप जवळून संपर्क आला. नाटक तुफान गाजले. दरवेळी मी नाटक पहात होतो, अण्णांच्या संवादफेकीत मला कधी सुईचाही फरक जाणवला नाही, त्यांचं टायमिंग आणि बेअरिंग हे प्रत्येकवेळी अचूकच असायचं.
त्यांच्याच एका नाटकात मधु कांबीकर होत्या. त्या नाटकाचे फोटो व डिझाईन केली. फत्तेलाल बंधूंच्या ‘स्त्रीधन’ चित्रपटात अण्णांनी सावकाराची भूमिका साकारली होती. व्ही. के. नाईक यांच्या ‘खिचडी’, ‘गोंधळात गोंधळ’ चित्रपटात त्यांनी कानडी माणसाची विनोदी व्यक्तीरेखा साकारली होती.
दादा कोंडके यांच्या ‘वाजवू का’ चित्रपटासाठी मी स्थिरचित्रणाचे काम करीत होतो. अण्णांची त्यामध्ये इन्स्पेक्टरची भूमिका होती. त्यातील प्रत्येक प्रसंगाचे चित्रीकरणावेळी अण्णांनी धम्माल केली होती.
नेव्हीमध्ये जाण्याची इच्छा असताना अण्णांना रंगदेवतेनं बोलावून घेतलं आणि त्यांनी आपल्या अभिनयाने चार दशकांहून अधिक काळ रसिकांना मंत्रमुग्ध केलं. अश्रूंची झाली फुले, करायला गेलो एक, पुढारी पाहिजे, स्वयंसिद्धा, चोरीचा मामला, रायगडाला जेव्हा जाग येते, रखेली, बंदिनी, बेलभंडार, इ. अनेक नाटकांतून व झपाटलेला, माहेरची साडी, गोंधळात गोंधळ बरोबरच दादांच्या अनेक चित्रपटांतून अण्णा रसिकांना आनंद देत राहिले.
दोन वर्षांपूर्वी अण्णांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे सुंदर मानपत्र करुन देण्याची संधी मला मिळाली होती.
आमचे परममित्र विनोदी अभिनेते दिलीप हल्याळ यांना घडविणारे तीन महागुरू होते. निळू फुले, राजा गोसावी व राघवेंद्र कडकोळ! त्यातील दोघेजण काही वर्षांपूर्वीच गेलेले, परवापर्यंत अण्णा होते…काल तेही गेले..
आलेला प्रत्येकजण जाणारच आहे, तरीदेखील अण्णांच्या जाण्याने रंगभूमी निशब्द झालेली आहे….
– सुरेश नावडकर ५-२-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे
Leave a Reply